निज शांत रे लडिवाळा...
निज शांत रे लडिवाळा...


गोमाईच्या गळ्यामध्ये, वाजे घंटा किणकिण..!
रावळात महाराजांच्या, बिन वाजे झिणझिण..!
गोड तशी बाळा तुझ्या, पैंजनाची रुणझुण..!
निज शांत रे लडिवाळा, पदर माझा पांघरून..!१!
दत्त देऊळी डोंगरी, टाळ वाजे घुनघुन..!
अंगणात वृंदावनी, जळे दिवा मिणमिण..!
गाय चाटते वासरा, फिरवूनी मागे मान..!
निज शांत रे लडिवाळा, पदर माझा पांघरून..!२!
वारा वाहे परसात, झाडे वेली भिरभिर..!
दृष्ट काढीते पदराने, नको करू किरकिर..!
पक्षी निजले खोप्यात, फिरुनिया रानोरान..!
निज शांत रे लडिवाळा, पदर माझा पांघरून..!३!
झोप येईना बाळाला, भुकेजलं माझं तान्ह..!
दूध पाजीते मायेनं, नको करू उणदुण..!
उबदार कुस माझी, जोजविते मी प्रेमानं..!
निज शांत रे लडीवाळा, पदर माझा पांघरून..!४!
नदीकाठी झाडाखाली, काजव्यांची चमचम..!
तुझ्या मुखाला दुधाचा, वास येई घमघम..!
चंद्र झोपला अंबरी, गेल्या चांदण्या निजून..!
निज शांत रे लडिवाळा, पदर माझा पांघरून..!५!