देवा, सांग ना रे
देवा, सांग ना रे
देवा सांग तू रे मला
काय अपराध केला
दिले कारे नाही मला
एक घर राहायला?
बालपण हे कोवळे
दिस आहे खेळायचे
खेळ खेळावयासाठी
सांग कोठे मी जायचे?
आई बाबा गेले दूर
काम करी पोटासाठी
नाही कोणी मजपाशी
मला सांभाळण्यासाठी
आलं आलं आता ध्यानी
तुझ्या हाती काही नाही
केले तुला बंदिवान
बसविले एका ठायी
माझा मीच शोधीयला
माझ्या जीवाला आसरा
इथे पुलाखाली किती
आहे मोकळा निवारा
किती मोकळे जीवन
इथे खेळाया मिळते
उंच हिंदोळ्या वर मी
सुख दुःखाला झेलते
