चांदण्याचे पाश
चांदण्याचे पाश
चांदण्याचे पाश सारे, आज मी तोडून आले
त्या जगाला पार मागे, आज मी सोडून आले
उंबर्याला पाय माझे, का बरे सांगा अडावे
रीत सारी त्या घराची, आज मी मोडून आले
मोह माया वा कशाचा, या मनाला दंश नाही
नाव यादीतून माझे, काल मी खोडून आले
या मनाचा त्या मनाशी, खुंटला संवाद होता
भिंत ती होती शिशाची, आज मी फोडून आले
मी जयाच्या पायरीची, धूळ माथी लावली रे
आज त्याला शेवटाचे, हात मी जोडून आले