सांजभूल
सांजभूल
खोल खोल अंतरातली चाहूल
ओढ अनामिक लागून वळे पाऊल
काहूरल्या या डोळ्यांत उतरते काय
का कातरवेळी पडते सांजभूल
रेखली कुणी ही आभाळावर नक्षी
सांजेला शोधे वाट एकटा पक्षी
ही शांत झोंबते हवा देतसे हूल
का कातरवेळी पडते सांजभूल
ती पैलावरती साद कोणती येते
अन् छातीची धडधड वाढत जाते
अदृश्य काहीसे करते मन व्याकुळ
का कातरवेळी पडते सांजभूल
वाळूत पावले ठसे सोडती मागे
उसवत जाते वीण विस्कटी धागे
परतीच्या वाटेवर उरते ती धूळ
का कातरवेळी पडते सांजभूल
घरी पोहोचते बाहुली ती गात्रांची
जणू संहिता कुणी विना पात्रांची
संदर्भांचा तो पुन्हा मोडतो पूल
का कातरवेळी पडते सांजभूल
अंधार मनाच्या कोनेडीतून शिरतो
मंतरलेली कोणी काया पांघरतो
बांधावर रडते एक रानबाभूळ
का कातरवेळी पडते सांजभूल