धागा
धागा

1 min

561
अशी लाट वेडी उधाणून येता
कसा शांत राही विरागी किनारा
नसे शाश्वती या अशा भेटण्याची
उगी भावनांचा कशाला पसारा
उरी शांततेच्या जरा खोल डोही
कुण्या आठवांची अशी साद जावी
तळाशी असा एक उद्रेक व्हावा
समाधिस्थ मौनासही जाग यावी
कुणी सांज अश्रू असे ढाळते की
फुलातून अस्वस्थ हुंकार येतो
जरा केशरी रंग ये सांत्वनाला
उदासीन अंधार आकार घेतो
कधी ओळखीचे कुणी नाव घेता
जिवातून काही सणाणून जाते
मुके बोल माझे मुक्या भावनांना
जुने गंध हे कोण आणून देते
किती रात्र राहील कोषात जागी
किती उष्ण श्वासातली ही उकाळी
उरे फक्त मागे जुनी वाफ सारी
स्वतःचाच धागा स्वतःला विटाळी