बळीराजा...!!
बळीराजा...!!
नाण्याची दुसरी बाजू
बळी पिकवतो मोती...!
भेगाळल्या रानी
पडले पावसाचे मोती
धरणी झाली तृप्त
हसली गालात काळी माती
वाफारा घेऊन गाऊ लागली
पेरणी बियाण्याची झाली
वर अमृत शिडकावा होता
बीज सारी अंकुरुन वर आली
राजा सर्जाची जोडी
औत काम करती झोकात
भांगलण खुरपण बळीराजा
आटपे भराभर जोमात
पीक शिवारात डोले
भरून आले हो डोळे
काही मिळो ना मिळो याला
फिकीर नाही त्याची म्हणे मला
जगाचा हा पोशिंदा
पिकवतो मोत्यातून मोती
बीज पेरता मायेने शेतात
कधी कमी पडेल का जीवनात...?
नका करू कोणी कीव
आहे आमच्यातही जीव
स्वाभिमानाची खातो भाकरी
करणार नाही चाकरी होऊन भिकारी...!