भिंती कच्च्या, त्यावर..
भिंती कच्च्या, त्यावर..
भिंती कच्च्या, त्यावर पत्रे तुटके फुटके आठवले
पाउस म्हटल्यावर डोळ्यांना केवळ इतके आठवले
जसे पाहिले शिस्तबद्ध मी, परिपाठाचे विद्यार्थी
तुझ्या हातच्या रांगोळीचे, आई ठिपके आठवले
थेंब थेंब साचतांना हवा, सागराप्रमाणे संयम
खळखळ तुमची पाहुनी, मला गढूळ डबके आठवले
सगेसोयरे मित्र वगैरे, स्टेटस ठरतो पैशांनी
म्हणुनी स्टेटसला जपतांना, त्याला परके आठवले
आयुष्याचे चित्र काढले कॅनव्हासवर स्वप्नांच्या
रंगवतांना सिगारेटचे, काही झुरके आठवले
स्मशानातल्या खांद्यावरचे, गळते मडके आठवले
परिस्थितीच्या दाहकतेचे, वास्तव चटके आठवले
