भेट तुझी माझी
भेट तुझी माझी
निघालास घाईमधे , दूरदेशी तू जाणार
सांग ना सख्या मजला , पुन्हा कधी भेटणार ? //ध्रु//
विद्याभ्यासासाठी आता , जाणे रे तुजला प्राप्त
उच्चविद्याविभूषित , आस मनोमनी सुप्त
प्रगतीचा आलेख तू , सतत उंचावणार //१//
विश्वासाचा मजबूत , आधार मला दिलास
प्रीतफुलात सुगंध , मनोभावे भरलास
समजावले मनास , तरी ना समजणार //२//
प्रीतभारल्या दिनांचे , सदा असावे स्मरण
रेशमाच्या आठवांचे , कधी नको विस्मरण
एकरुपता आपली , कधी न भंगणार //३//
दिन , महिने , वर्ष , सहज उलटतील
वाटेकडे सख्या तुझ्या , आर्त डोळे लागतील
विरहाचा काळ सांग , सख्या कधी सरणार? //४//
