भाग्यवान मी
भाग्यवान मी
हा भाग्यवान मी | जन्मलो सजीव ||
नसावी उणीव | जगताना ||१||
नशीब कठोर | देतो मी परीक्षा ||
सोसतो मी शिक्षा | आनंदाने ||२||
काळ हा कठीण | जाऊया सामोरे ||
यशाचे मनोरे | रचूनिया ||३||
कष्टाची शिदोरी | लागते चवीला ||
असावी ठेवीला | संदुकात ||४||
भाग्य लिहिताना | ठेवावी तयारी ||
नशीबाची स्वारी | हातामध्ये ||५||
सातत्य तुटता | भाग्य डगमगे ||
भीती मना लागे | निराशेची||६||
नको कुचराई | कामात रोजच्या ||
विचार पुढच्या | भविष्याचे||७||
सांगते सुप्रिया | मूलमंत्र पाळा ||
वाद सारे टाळा | जीवनात||८||
