बासरी...!
बासरी...!
आला कान्हा स्वप्नी माझ्या
अन् बासरी वाजू लागला
स्वप्नातच त्या बासरीचा
नाद मज लागला
सुरेल सुरावट कानी
स्पर्श जणू मृदू मोरपंखी
काय हवे त्या क्षणी
मंत्रमुग्ध होण्या आणखी
लोभस मिश्किल कान्हा
दावीतसे लिलया लीला
पाहता पाहता सरली निशा
उरली नाही काही आशा
तृप्त कान अन् तृप्त मन
पुलकित झाले अंग अंग
उठले भक्तीचे निर्मळ
अंतरात माझ्या गोड तरंग
कान्हा कान्हाच आहे
त्यासम दुजा कोणी नाही
डोळे भरूनी मी पाहता त्याला
आशा कोणतीच उरत नाही
नाही असे काहीच नाही
सर्व स्वयंभू साक्षात तो ईश्वर
माझे खरेच हे सौभाग्य
पाहिले त्याला असूनी मी नश्वर
कृपा जयाची होई
तो जीव ठरे भाग्यवंत
त्याच्या सुखास मग जीवनी
नाही उरत कोणता अंत
अनुभवले हे सारे स्वप्नी
होउनी मी तल्लीन निद्रेत
जाग येता अनुभूती विलक्षण
जाणवली ती सुखे उदरात
माया ममता स्नेह सारे
जाणले एकाच हृदयात
तेच अनुभवले मी कवळीता
कान्हा मज प्रेमाने मिठीत...!!!
