बाबा आत्महत्या करू नका!
बाबा आत्महत्या करू नका!
कित्येकदा मलाही वाटतं
बायकोसंग पावसात भिजावं
सिनेमातलं एखादं गाणं
कधीतरी तिच्यासाठी गावं..
असं नाही,
की पाऊस आलाच नाही
तो तर कित्येकदा बरसला
अन् जाता जाता थोड्या सरी
आमच्याही पापण्यांत ठेऊन गेला..
कर्ज काढून पेरलं बियाणं
तर पाऊस चाट देऊन जातो
पिक कापणीला आलंच कधी
तर धो धो बरसून सडवतो...
पाऊस आला नाही तेव्हा
सारं पिक करपून गेलं
तर कधी मुसळधार पावसानं
होतं नव्हतं वाहून नेलं...
काळ्या आईची तुकडी करून
याच्यामुळ कित्येकवेळा विकली
कधी बँकेची तर कधी
सावकाराची कर्ज फेडली...
नव्या कापडा साठी लेकरं
रडून रडून थकली
अन् किती तरी राती
त्यांनी भाकरिविना काढली...
तशी, लेकरं गुणी आहेत माझी
अन् बायको होते कणा
पाठीशी खंबीर उभी राहून, म्हणे
आता सावरा धनी..,मी आहे ना!!
अहो! लेकरं माझी म्हणतात मला,
वेळ कधी पडली बाबा.., तर
नांगर आमच्या खांद्यावर जुंपा
पण पदरी निराशा आली म्हणून
आत्महत्या करू नका...!!!
