अशीच फुलूनी यावी कविता
अशीच फुलूनी यावी कविता
कवितेला नसते कधी
कुणाची भिती
कवितेची वही असते
हमेशा रिती ॥1॥
कवितेला प्यारा असतो
भुकेला गांव
कविताच उलगडते
काळजातील घाव ॥2॥
कवितेला नसतो काही
सवतासुभा
कविता व्यापून टाकते
संपूर्ण नभा॥3॥
कविता अलगद टिपते
पाखरांचे दाणे
कविता गुणगुणत राहते
निसर्गाचे गाणे ॥4॥
कविताच करते
बापाचा भार हलका
कविताच उलगडते
मायचा हुंदका ॥5॥
कविताच बनते
शेतातल्या पिकांच पाणी
कविताच गुणगुणते
सासुरवाशीणीची गाणी॥6॥
अशीच फुलुनी अनंत काळे
यावी कविता
तुझ्या नि माझ्या मनी
रुजावी कविता ॥7॥
