सावराया हवे आता
सावराया हवे आता
खचलेली भिंत उभी
मोडलेले घर दार
तूटलेले बांध रस्ते
गावसारा गप्प गार ॥ 1॥
शांतशांत काळा डोह
नदीघाट सुकलेला
मंदिरात देव उभा
विचारात पडलेला ॥2॥
गाईगुरे दूर कुठे
रानीवनी सोडलेली
खपाटीला पोट गेले
कंबर ही मोडलेली ॥3॥
गरिबीचा असा फेरा
हातातले सारे गेले
पापण्यात थोडे अश्रू
रडण्यास कामी आले ॥4॥
सूर्यालाही येणे आहे
मावळून जाता जाता
जिंदगानी बाकी आहे
सावराया हवे आता ॥5॥