अनोळखी मी...
अनोळखी मी...


माझ्या ओळखीच्या जगात,
अशी अनोळखी मी...
सारे काही ओळखीचे,
परी हरवलेली मी...
मीच पाहिलेले स्वप्न,
मीच विणलेला खोपा...
खोप्यात या माझ्या परी
अशी अनोळखी मी...
रोज आलीसे पहाट..,
मग दिस ओळखीचा...
ओळखीच्या वाटेवरी
कशी अनोळखी मी..?
आज आठवतो तरी
बाबा.., तुझ्या हातांचा पाळणा...
रोज खांद्यावरी तुझ्या
सुखे झोपणारी मी...
हात सुटता रे तुझा
पाही तुझ्या डोळां पाणी...
मज आकाश खुणावी..,
वेडे झेपावणारी मी...
दिस गेले दिसांमाजी..,
नवी क्षितीजे मी पाही...
तरी काही हरवले..,
आता शोधणारी मी...
कुठे कुठे शोधू..?
आठवांचा भला डोंगर...
ऊन जाळतसे मला..,
सावली शोधणारी मी...
बाबा.., तरी तुझी लेक
अजून हरलेली नाही...
राखेतूनही उठेन..,
नवी जन्मणार मी..!!!