आज पुन्हा एकदा...
आज पुन्हा एकदा...


आताशा दिवस संपत आलाय,
आणि मला ओढ लागलीये तुझ्या भेटीची...
मला ओढ लागलीये तिन्हीसांजेची..
मला ओढ लागलीये सूर्यास्त पाहायची..
आज पुन्हा एकदा... मला ओढ लागलीये...
रोजचा दिवस येतो आणि जातो...
कामाचा व्याप तरी रोजचाच असतो ...
आताशा कशाचाच त्रास होत नाही...
आताशा कशाचाच रागही येत नाही...
आज पुन्हा एकदा... सगळं काही असंच घडलंय...
आताशा सगळं काही सवयीचं झालंय...
आताशा कशानेच मनात वादळं उठत नाहीत...
कशानेच मन बेभान होत नाही...
ओठांवर खळखळून हसू येत नाही...
आज पुन्हा एकदा... सगळं काही असंच घडलंय...
पण आजही हि तिन्हीसांज मला खुणावते...
आजही त्याच समुद्र किनारी मला ओढून नेते ...
मीही निमूट जाते ... आणि सूर्यास्ताला पहात बसते...
कधी तुझा हात हातात येतो कळतच नाही...
कधी मी तुझ्या खांद्यावर डोकं ठेवते कळतच नाही...
ही सांजवेळ आजही फक्त तुझी नि माझी असते...
तुझं माझ्या डोळ्यांत पहाणं.., आणि माझ्यात हरवून जाण्यात असते...
निदान या कातरवेळी तरी तू फक्त माझा असतोस...
आताशा तुलाही कळलंय... कि लाटेसारखं जगणं काय असतंय...
आज पुन्हा एकदा... सगळं काही असंच घडलंय...