अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
पोट भरण्यासाठी इथे जो तो प्रयत्न करतो ना
कुंडलीत ग्रहदोष दाखवून पोटही आपले भरतो ना
बाधा नसतेच कुठलीही खेळ असतात मनाचे
भिणाऱ्यांना भीती घालण्या, मग तो पुरून उरतो ना
देव कधी मागत नाही प्राण मुक्या जिवांचे
आपल्याच अट्टाहासाने एक जीव नाहक मरतो ना
पाऊस पैशाचा पडत नसतो, ठाऊक असते आपल्याला
तरी मुर्ख बनून आपण खिसे मोकळे करतोच ना
अमावस्येच्या रात्रीचे भय कशाला बाळगावे
रातराणी निशीगंध केवडा अंधारातच बहरतो ना
कार्यभाग साधुन जेव्हा तो पाय काढता घेतो
आपणच मग अंधश्रद्धेचे बळी तेव्हा ठरतो ना