चला जपुया संस्कृती
चला जपुया संस्कृती
खासरात बसून जात होतो मामाच्या गावाला
आता खासर अन मामाचा गाव दोन्ही उरले नावाला ...
मामा झाला श्रीमंत त्याची झाली माडी
दारासमोर उभी राहते चारचाकी गाडी ...
प्रथा परंपरा कोणी पाळत नाहीत आता
आधुनिकतेचे लेबल जो तो लावते येताजाता ...
एकत्र होती कुटूंब तेव्हा संस्कार आपोआप घडत
आजीआजोबा नातवासंगे सारे खेळ खेळत ...
पडताझडता शिकत होते लेकरं सा-या गोष्टी
वडीलधा-यांच्या सानिध्यात फुलायची बालसृष्टी ...
आता बदलला काळ सारे विभक्त झाले
प्रत्येकाच्या हाती मोबाईल नावाचे यंत्र आले ...
कसे होईल संवर्धन आता संस्कृतीचे
भोवताली पसरले जाळे विकृतीचे ...
चला जपुया संस्कृती करूनी आदर थोरांचा
खेळ आणि व्यायामात वेळ जाईल मग पोरांचा ...
