आयुष्यपट
आयुष्यपट
नाही केले जपजाप्य
नाही केल्या तीर्थयात्रा
कांचनसंध्येसमयी
पट उघडते खरा
संस्कारांचे देणे मज
भाग्ये लाभे माहेरीच
ब्रीद सत्याचे जपले
प्रामाणिकपणानेच
परोपकाराचे बंध
आचरणे ठसविले
नित्य सदा खरे बोला
शिकवण देती भले
भले करा बहुतांचे
भाग्य जीवनी लाभते
शुद्ध आचरण ठेवा
शांती मनास लाभते
नित्य चिंतन मनन
सदाचार आचरला
नाही अपशब्द कुणा
मम मुखे उच्चारला
शांत चित्ते न्याहाळते
दूरवर पैलतीर
एक प्रार्थना मनात
सकलांना सुखी कर
