आयुष्याच्या सारीपटावरी
आयुष्याच्या सारीपटावरी
गोड पापा आईबाबांचा
स्पर्श प्रेमळ आजीचा
ताई दादा मांडीवर घेता
पट सुरु आयुष्याचा
रम्य बाल्य आनंदाचे
गाणी खेळ नि गप्पांचे
गाड्या खेळणी नि फुगे
पट हलकेच सरे
शाळा बाई अभ्यासाने
मन प्रसन्न आनंदाने
नाच कथाकथनाने
पट नाचतसे मोदाने
शैशव हसरे खुलवी
मुग्ध यौवन खुणवी
मित्र मैत्रिणी हवीशी
पट हर्षे बहरवी
प्रीतीबंध जन्मोजन्मी
रममाण राजा राणी
कर्तृत्वाची निगराणी
पट सरके जोमानी
संथ लय मध्यमवयी
स्पर्धा तुलना मागे राही
प्रौढत्वाची झाक येई
पट संथ पुढे जाई
कांचनसंध्या येता दारी
दिसू लागे पैलतीरही
षडरिपू सोडूनी देई
पट हलके पुढे जाई
