आयुष्य -- एक रांगोळी
आयुष्य -- एक रांगोळी
आयुष्य ही एक ठिपक्याठिपक्यांची रांगोळी आहे।
ह्यातला प्रत्येक ठिपका खास वैशिष्ट्यपूर्ण आहे।
देवाने दिले जीवन तेव्हाच ठरवले; किती ठिपके, किती ओळी।
आता ह्या ठिपक्यांमधून सजवायची आहे तुमची रांगोळी॥
चित्र कोणते, रंग कोणते, किती करावी कलाकुसर।
कशी घडवावी बहारदार रांगोळी, आणि कसे सजवावे जीवन सुंदर ॥
हे सर्व माणसाच्या हाती, नियम फक्त एकच आखीव।
प्रत्येक ठिपका जोडून-जोडून रांगोळी करावी रेखीव॥
मधला ठिपका सुटला, तर आयुष्याचे गणित चुकेल।
नशीबाने दिलेली , एखादी मोठी संधी हुकेल॥
बालपणाची पहिली रेघ काढावी आईचा धरून हात।
नकळत तुम्ही पोहू लागाल , आयुष्याच्या प्रवाहात॥
यौवन, तारुण्य, प्रौढत्व, पुढच्या प्रत्येक टप्प्यावर।
ठिपके जुळवताना तुमची राहील उत्कर्षावर नजर॥
अंतिम ठिपका वृद्धत्वाचा देईल आनंद अपार।
सफल, संपन्न, आयुष्यासाठी, मानाल ईश्वराचे आभार॥
कधी मग प्रसन्नतेने पाहाल ह्या रांगोळीकडे।
हसून तुम्हीच म्हणाल मग, " देवाने कसे सोडवले हे आयुष्याचे अवघड कोडे?"॥
