आमच्या येथे कविता पाडून मिळतील
आमच्या येथे कविता पाडून मिळतील
आमच्या येथे कविता पाडून मिळतील
ऑर्डर प्रमाणे कविता घडवून मिळतील
कोणताही सांगा विषय
कसलाही असूद्या आशय
याद्या सार् या झाडून मिळतील
आमच्या येथे कविता पाडून मिळतील
प्रसंग असो कोणताही
व्यासंग असो कोणताही
असो नेत्याची जन्मतिथी
वा थोरामोठ्यांची पुण्यतिथी
साच्यात कोणत्याही टाकून मिळतील
आमच्या येथे कविता पाडून मिळतील
शांत, करूण, अद्भुत, वीर, रौद्र
शृंगार, हास्य, भक्ती वा बिभत्स
पाहिजे सांगा कोणता रस
कविता लिहून देऊ भसाभस
पाहिजे त्या रसात बुडवून मिळतील
आमच्या येथे कविता पाडून मिळतील
पाहिजे का पंचाक्षरी की हवी षडाक्षरी
नाहीतर घ्या ती अष्टाक्षरी
पर्याय आमच्याकडे आहेत भारी
हवी तेवढी अक्षरे घालून मिळतील
आमच्या येथे कविता पाडून मिळतील
मुक्त छंदातील हवी की हवी छंदोबद्ध
कोणते हवे सांगा वृत्त, कोणता हवा छंद
हवे तसे जुळवून मिळेल यमक
आपले समाधान हेच आमच्या यशाचे गमक
जसे हवे तसे मात्रा, छंद, वृत्त जुळवून मिळतील
आमच्या येथे कविता पाडून मिळतील
कवी आहेत आमच्याकडे एकुण साठ
अन् कवयित्री सुद्धा आहेत एकशे आठ
प्रतिभा सगळ्यांत भरलीय काठोकाठ
ऑर्डर प्रमाणे मिळतील कुशाग्र आणि माठ
मात्र प्रत्येकाचे दर वेगवेगळे पडतील
आमच्या येथे कविता पाडून मिळतील
