फराळाचे संमेलन
फराळाचे संमेलन


दिवाळीच्या पदार्थांचे होते
ताटात भरले संमेलन
अध्यक्षपदासाठी लागले
त्यांच्यात भांडण
लाडू म्हणाला मी करायला
सोपा चवीला देखील गोड
माझ्यामध्ये काढायला
नाही कोणती खोड
चकली म्हणाली मी काटेरी
पण चवीला खुसखुशीत
दिवाळीच्या फराळात
मान माझा मोठा
खातात मला खुशी खुशीत
अनारसा म्हणाला मी
करायला थोडा कठीण
पण दिवाळी इतकाच
अधिक महिन्यात
असतो माझा मान
जावयाला अनारशाचे
देतात वाण
आणि करतात
माझा सन्मान
करंजी म्हणाली मी
बाई नाजूक
मला तळायला
लागते तूप साजूक
माझ्याशिवाय रुखवताची
असते अधुरी पंगत
गौरी गणपतीच्या सणाला
माझ्याशिवाय नाही रंगत
पुरी चिरोटे कडबोळे
शंकरपाळे
यांनी केला एकच कल्ला
दरवेळी तुमचाच मोठेपणा
यावेळी अध्यक्ष पद
पाहिजे आम्
हाला
मग आला सर्वांचा दादा
दिसायला लहान
चवीला महान
तो म्हणजे चिवडे भाऊ
तो म्हणाला
किती वर्षे तुमचेच
गुण गाऊ
वर्षभर असते आम्हाला डिमांड
सगळेच करतात खाऊ खाऊ
आमच्या विना अधुरी
आहे फराळाची पंगत
आमच्या विना येत नाही
कोणालाच रंगत
फराळाचे पाहुण्यांना
भरून दिले ताट
पाहुणा फक्त लावतो
चिवड्याला हात
बाकीचे पदार्थ
तो नाही खात
तुमचे खाणे मधुमेहींचा
करील घात
पण माझे तसे नाही
पैसेवाल्याला मी आवडतो
गरिबाला मी आवडतो
इतकेच काय दारुड्या माणसाला देखील मी जवळचा वाटतो
पोहे शेंगदाणे काजू खोबरे
सर्वांच्याच आरोग्याला बरे
एकत्रच असतो आम्ही
करतो वज्रमूठ
आमच्यापुढे सारे फिके
साऱ्या चवी एकदम झूठ
तेवढ्यात आला बंडू त्याने
भरला चिवड्याचा बकाणा
बाकीचे सारे करू लागले बंडू च्या नावाने ठणाणा