आला श्रावण
आला श्रावण
आला श्रावण श्रावण
सर सुखाची लेवून
बहरला आसमंत सारा
किरणे सोनेरी लेवून
धुंद सरी बरसल्या
ढग मोकळे करून
वृक्ष वेली तरारली
गेली मोत्यांनी न्हाऊन
पानांवर जसे मोती
हिऱ्यावानी लकाकती
रंगीबेरंगी सूर्यकिरणे...
पानांतून डोकावती....
नभी फुलला इंद्रधनू
नयना घालते भुरळ
वाटे ताजेतवाने मन
झटकून मरगळ....
जशी धरती नटली
तिचा साज वधुवानी
शालू हिरवा नेसली
कुंकू भांगात भरुनी
रानामध्ये मोर नाचे
धुंद पिसारा फुलवून
मधुर कोकीळ हा गातो
ताल सूर जुळवून...
नभामध्ये मेघ तरंगतो
जातो धुंद बरसून...
वाहे खळखळ पाणी
वाट मोकळी करून...
आला श्रावण हा मास
व्रतवैकल्ये उपवास...
देतो मनाला आनंद..
नित्य अनंताचा ध्यास...
