श्रावण
श्रावण
कधी सर पावसाची,कधी लहर उन्हाची...
नभी कमान इंद्रधनू लकाकी किरणांची...
डोईवर सावली त्या सावळ्या ढगांची....
पानांआड किलबिल चालू धुंद पाखरांची....
सर सुखाची बरसता वृक्ष न्हाऊन निघाली...
पसरला असा रंग सूर्य वाहे रंगाच्या पखाली...
थेंब पानांवर जसे हिऱ्यामोत्यावाणी सजली....
भासे सृष्टी ही सगळी हिरवा शालू पांघरली....
नाचे मयूर रानांत धुंद पिसारा फुलवुनी...
वनी कोकीळ मधूर गातो आनंदाने गाणी...
दऱ्याखोऱ्यातून खळखळ वाहे पावसाचे पाणी....
मृग पळतो वनात त्याच्या सुखाची पर्वणी....
थेंब अंगावर पडता अंग जाई शहारून
हर्ष दाटतो उरात मन जाते हे मोहून...
असे क्षण जगताना दुःख जाते विसरून...
नयन सुखावती रम्य नजारे पाहून...
कधी विक्राळ रूप ते गर्जनाऱ्या त्या नभाचे...
मनी भय साठलेले लखलखत्या विजांचे...
जाई वाट हरवुनी पाणी साचलेले पावसाचे...
भासे रूप गोजिरे त्या ओल्याचिंब धरतीचे....
येतो घेऊन श्रावण सण व्रत वैकल्याचे.....
नित्य चालू उपवास क्षण सारे मांगल्याचे.....
मंदिरातला सुगंध जाते काळजा भिडून....
घरी देव्हारे पुजती प्रातः स्नान ते करून...
मासामध्ये मास श्रावण जो साऱ्यांना भावते...
वाहत्या मनाला श्रावण भुरळ घालते....
आनंदाने जगण्याची मना खुराक टाकते....
श्रावणाच्या सौन्दर्यातुन मग सुख डोकावते....
