वंदनीय गुरू
वंदनीय गुरू
प्रथम वंदन आई
तुच गुरू जीवनाचा
श्वास देऊन आपला
जन्म दिला मानवाचा..१
धीर गंभीर आवाज
बापाची हिंमती साद
गुरुमंत्र रक्षणाचा
वाटे आजही प्रसाद...२
समाजातून शिकले
चालायला बोलायला
रिमझिम पावसात
गायला व नाचायला...३
शाळेत झाली ओळख
गुरूजी, फळा, खडूची
पुस्तकिय अभ्यासाने
वाढली बौद्धिक उंची...४
मित्रमैत्रिणींचे धडे
बंधुत्वाने राहण्याचे
घासातला घास कसा
एकमेका वाटण्याचे...५
मार्कांसाठी अभ्यासाची
जिद्द मनी बाळगली
हेवे दावे होऊ लागले
हुशारी रंगू लागली...६
रस्ताही देतो शिक्षण
कसे चालावे वागावे
वळण येता जीवनी
खाच खळगे टाळावे ...७
निसर्ग मोठा शिक्षक
सोबत याच्या रहावे
उन्हाळ्यात पावसाला
बोलवून खुष व्हावे...८
बालके आज मलाही
वाटती गुरू सारखे
विकसित तंत्रज्ञान
शिकते मनासारखे...९
जगद्गुरू वंदनीय
देती शील सदाचार
शांती समता बुद्धांची
विशाल महासागर...१०
