कोण दाखवेल वाट
कोण दाखवेल वाट
मुलगी म्हणून जन्मले
जन्मताच अन्यायाचा घाट
ऊभे काट्यावर पाऊल
कोण दाखवेल मला वाट...।।१।।
रोजची ती टोचणी
कां झालीस मुलगी
वाटे जगावे की मरावे
कुणाशी करावी सलगी...।।२।।
नाहीस वंशाचा दिवा
तु आम्हाला नकोशी
अंधारात रडून घेते
दुक्ख रोज उशाशी...।।३।।
लहान भावास दहीभात
मला कोरडीच भाकर
मी नव्हेच अपत्य
राबतेय जणु चाकर...।।४।।
बंद आहेत माझ्यासाठी
शिक्षणाचे उच्च दार
भावाच्या सेवेसाठी
चालवते मोटर कार...।।५।।
झाली असते मुलगा तर
माझेही गुणगान असते
आज आहे मी नकोशी
तेव्हा हवीहवीशी असते...।।६।।
केव्हा संपेल हा वाद
कधी उगवेल ती पहाट
मुलगी दोन्ही दारी दिवा
कोण दाखवेल यांना वाट...।।६।।
रोजच्याच होते भृणहत्या
जन्माआधीच होते कत्तल
जगणे हेच मरणे आमचे
पुरुषप्रधानतेची शक्कल ...।।७।।
