सरिता-४ (गंगूचं बालपण ते यौवन)
सरिता-४ (गंगूचं बालपण ते यौवन)
गंगू! संपा आणि सरस्वतीची एकुलती एक मुलगी. अतिशय लाडात, कोडकौतुकात वाढलेली. आई, वडील, यांच्या सोबतच चार चुलते, चुलत्या यांच्या संस्काराने संस्कारित असलेली मुलगी.
मुलींना शिक्षण देण्याचा तो काळ नव्हताच. _'मुलीला काय करायचं शिकवून? चूल आणि मूलच तर संभाळायचंय तिला. रांधा, वाढा, उष्टी काढा यातच तिचं आयुष्य संपणार. मग कशाला पाहिजेत हे शिक्षणाचे चोचले? शेतातलं निंदण, खुरपण आलं, घरात स्वयंपाक करता आला की खूप झालं.'_ अशा विचारसरणीचा तो काळ. तरीही थोडेफार शिकलेले, पुढारलेल्या विचाराचे लोक आपल्या मुलीला शिकवायला तयार असत. परंतु गावात ज्या इयत्तेपर्यंत शाळा असेल तिथपर्यंतच. बाहेरगावी कुणीही शिकवायला मुलीला पाठवायला तयार नसत. गंगूच्या सुदैवानं जांभुळखेड्यात दहावी पर्यंत शाळा होती. गंगू पाच भावांमिळून एकुलती एक मुलगी असल्यामुळं, सर्वांची लाडकी असल्यामुळं आणि गावात दहावी पर्यंत शिक्षणाची सोय असल्यामुळं गंगूला शाळेत जायला मिळालं. त्या शाळेत ज्या काही दहा पंधरा मुली शिकायला येत होत्या त्यात गंगू एक होती.
शाळेत जायला लागल्या नंतर मात्र पहिल्या इयत्ते पासूनच तिने कधीच पहिला नंबर सोडला नाही. अभ्यासात अगदी एकपाठी. एकदा सांगितले की बस्स! दुसऱ्यांदा सांगण्याची बिलकुल आवश्यकताच नाही.
पाचवीनंतर तिच्या शिक्षणाला एक वेगळीच धार यायला लागली. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिवसाच्या सोहळ्यात तिचं भाषण हमखास असायचंच. ते ऐकणं ही शिक्षक वृंद आणि नागरिकांसाठी एक पर्वणी असायची. एक एक मुद्दा स्पष्ट करून सांगण्याची कला तिला जन्मजात दैवी देणगीच होती. इतिहासातले सारे सन, साऱ्या घटना, सारे संग्राम, शूर वीरांच्या पराक्रमांचे वर्णन, सगळे अगदी मुखोद्गत. एखाद्या लढाईचे वर्णन सांगायला लागली की, डोळ्या पुढे ती लढाई, ते रण मैदान, त्या समशेरी, भाले, घोडे, रक्त बंबाळ झालेले सैनिक इत्यादी सारे काही असे उभे राहायचे जसे सर्वां समक्ष ती घटना आत्ता घडत आहे. असे भाषण झाल्या नंतर प्रत्येक वेळी घरी गेल्यावर तिच्या आजीला आणि आजी गेल्यावर आईला तिची हमखास नजर काढावी लागत असे. अशा गंगूच्या आवडीचा विषय होता _'नागरिक शास्त्र.'_ सुजाण नागरिक कसा असावा यावर ती किमान एक तास तरी भाषण द्यायची. ऐकणारा ऐकतच रहायचा. गणितात तर ती वरच्या वर्गातल्या विद्यार्थांच्याही पुढे होती. एखादे वेळी शिक्षक चुकतील परंतु गंगू कडून कधी गणितातली चूक झालेली ऐकिवात नाही. जणू काही भास्करचार्यांची पट्ट शिष्याच. बरं नुसतं गणितच नाही तर साऱ्याच विषयात ती तरबेज होती.
आजी असे पर्यंत रोज किमान दोन तास आजी जवळ बसून पुराणातल्या गोष्टी ऐकायच्या. कधी आजीच्या किंवा त्या काळातल्या स्त्रीयांच्या जीवनातल्या घटना, गमतीदार चुटकुले ऐकायचे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अशा अनेक महिलांच्या चरित्र गाथा ऐकायची. आजोबा जेव्हा जेव्हा तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी किंवा भागवत वाचायला बसत तेव्हा गंगू हमखास तिथे बसलेली असायची. त्यातून तिला जीवनाचे खरे शिक्षण मिळाले. ती जस जशी मोठी होऊ लागली, तिच्या कीर्तीचा सुगंध दरवळायला लागला, तस तशा जवळ पासच्या नातेवाईकांच्या नजरा तिच्या कडे वळायला लागल्या. अशी सुसंस्कारी मुलगी आपल्या घरात यावी अशी इच्छा नातेवाईकांना व्हायला लागली. गावातच असलेल्या तिच्या शांता आत्याही त्यातलीच एक. आत्याचा मुलगा, गणपत त्याच शाळेत दहावी पर्यंत शिकला होता. घरच्या परिस्थिती मुळे त्याला पुढे शिकता आले नाही. घरी जमीनही फारशी नसल्यामुळं रोज मजुरी करून विधवा आईच आणि स्वतःच पोट भरत होता. दोघेही मायलेकरं स्वतःची थोडी फार असलेली शेती आणि रोज मजुरी करून स्वतःचा उदर निर्वाह करायचे. शांता आत्याला वाटत होते, गंगू आपल्या घरात आली तर आपलं घर पवित्र होईल. सुख समृद्धीनं भरेल. परंतु तिला हेही माहीत होतं की आपल्या परिस्थितीला पाहून आपले भाऊच काय आपले वडील सुद्धा तिला आपल्या घरात द्यायला तयार व्हायचे नाहीत. तरीही प्रयत्न करून पहायला पाहिजेच. उद्या असे व्हायला नको की, _'आम्हाला मुलगी आमच्या डोळ्यां समोर रहावी म्हणून गावातच द्यायची होती पण कुणी मागीतलीच नाही तर बळेच कशी द्यायची?'_ म्हणून एक दिवस शांताने गंगूला मागणी घातलीच. तिच्या भाकीता प्रमाणे तसेच घडले सारे. गंगूच्या आजोबांनीच तिला नकार दिला. भावांचा काही म्हणण्याचा प्रश्नच मिटला. ती थोडी नाराज जरूर झाली. पण तिने आपल्या नशिबाचा दोष समजून स्वतःच्या मनाची समजूत काढली. या घटने नंतर बहीण आणि भावा मध्ये थोडासा दुरावा जरूर निर्माण झाला होता. परंतु चारच महिन्यानंतर आई आणि वडिलांच्या तिर्थयात्रेच्या बसला झालेल्या अपघातात दोघेही मृत्यू पावले. आई वडिलांच्या अशा एकत्र अपघाती निधना मुळे शांता आणि भावांना पुन्हा जवळ यावे लागले. पुन्हा सारे काही पूर्ववत होत गेले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यात गंगूचं कोवळं मनही होरपळलं गेलं. परंतु त्याच दोघांच्या तोंडून मृत्यूची संकल्पना तिने अनेकदा ऐकलेली होती. _'आत्मा अमर आहे. मृत्यू म्हणजे केवळ शरीर बदलणे आहे. ज्या प्रमाणे शरीरावरील जीर्ण झालेलं वस्त्र बदलून नवीन घातले जाते अगदी तसंच. आत्मा तर केव्हाच नवीन देह प्राप्तीसाठी निघून गेला असतो. उरतं ते केवळ मृत शरीर.त्यालाच आपण मायेने कवटाळून दुःख करत बसत असतो_ हे सारे तत्वज्ञान ऐकायला सोपे परंतु पचवायला कठीण असते. तिलाही ते काही दिवस कठीणच गेले. परंतु तिने ते इतरांपेक्षा लवकर पचवले. ती दहावीत असल्यामुळे दहावी चांगल्या मार्कांनी पास होण्याचे ध्येय तिच्या पुढे होते. आणि त्या ध्येय प्राप्ती साठी ती थोड्याच दिवसात ते दुःख बाजूला सारून अभ्यासाला लागली होती.
यथावकाश गंगू दहावीत अतिशय चांगल्या गुणांनी पास झाली. शाळेतूनच नव्हे तर तालुक्यातून पहिली आली, जिल्ह्यातूनही पहिली आली. आठ दहा दिवस तर नुसते सत्कारातच गेले. शाळेतर्फे सत्कार, ग्रामपंचायती तर्फे सत्कार, तालुक्याला सत्कार तर कधी जिल्ह्याला सत्कार. आणि प्रत्येक सत्काराच्या ठिकाणी होत असलेली तिच्या पुढच्या शिक्षणाची चर्चा तिला सुखावून जायची. पुढील शिक्षणासाठी शहरात आलेली गंगू, कॉलेजात शिकायला लागलेली गंगू, कॉलेज मध्येही गावातल्या शाळे प्रमाणेच शिक्षणात सर्वांच्या पुढे असलेली गंगू असे अनेक दृश्ये तिच्या डोळ्या समोरून क्षणात तरळून जायचे. परंतु दुसऱ्याच क्षणी आजू बाजूला असलेली परिस्थिती तिला स्वप्नातून जागे करायची. ती थोडीशी निराश व्हायची पण लगेच पूर्ववत व्हायची. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायची क्षमता तिच्या अंगी मुळातच प्राप्त होती.
सत्कारात काही दिवस मजेत गेले. आणि मग विषय सुरू झाला तिच्या लग्नाचा. खरे तर तो पुढील शिक्षणाचा व्हायला पाहिजे होता. पण त्या त्या काळच्या काही अडचणी असतात, काही परंपरागत समाजरीती असतात, खेड्यातील लोकांच्या मुलींना शिक्षण देण्याच्या काही सामाजिक मर्यादा असतात. पुढच्या शिक्षणाची फारशी आवश्यकता वाटत नसल्या मुळेही तिच्या लग्नाचा विचार घरात चर्चिला जाऊ लागला. इतर नातेवाईकां मध्येही या स्थळा संदर्भात चर्चा व्हायला लागली. तिची कीर्ती पसरलेली होतीच. स्थळं यायला लागले. या पाचही भावांना पसंत पडेल असे एकही ठिकाण त्यात येईना._घरी जमीन भरपूर पाहिजे. खानदान चांगले हवे. मुलगा सुंदर पाहिजे. गडगंज संपत्ती पाहिजे. मात्र एवढ्या साऱ्या संपत्तीची भविष्यात ती एकटीच मालकीण असावी, म्हणजे मुलगा एकटाच असावा_ अशा अपेक्षा पूर्ण करणारे स्थळ येई पर्यंत तरी वर संशोधनाचे कार्य पूर्ण होणार नव्हते. एका डॉक्टर मुलाचे स्थळ आले. त्यांना मुलगी पसंतही पडली. परंतु त्याला जमीनच नव्हती. आणि नाते संबंध फारसे जुळत नव्हते म्हणून ते स्थळ नाकारले गेले. त्याच कारणाने एक इंजिनियरचे स्थळही नाकारले गेले. आणि नंतर मग आले जामखेडच्या सरपंचाच्या एकुलत्या एका मुलाचे स्थळ. जवळच्याच नात्यातले सज्जनराव जामखेडचे एक बडे प्रस्थ होते. त्यांना एकुलता एकच मुलगा. पन्नास एकर जमिनीचे मालक आपल्या लाडक्या मुलासाठी गंगूला मागणी घालायला स्वतः चालून आले.
