Manisha Awekar

Abstract Children

3  

Manisha Awekar

Abstract Children

शहाणा झेब्रू

शहाणा झेब्रू

2 mins
335


एका जंगलात झेब्र्यांचा कळप रहायचा. त्यांच्यामधे एक लहान पिल्लू झेब्रू नावाने ओळखले जायचे. ते दिसायला खूप गोड आणि गप्पागोष्टी पण छान करायचा. आईवडिलांबरोबर तळ्यावर आंघोळीला गेला की तिथल्या गेंडोबांशी खूप वेळ गप्पा मारत बसायचा. शेवटी आई बाबांनाच त्याला ओढून घरी न्यावे लागे.

    

एक दिवस आई बाबांना दुसरीकडून खाद्य आणायला जायचे होते. त्या दिवशी सगळे मिनी झेब्रू डोंगरावर जाणार होते. आई बाबा म्हणाले, "झेब्रू तू आपल्या कळपाबरोबर डोंगरावर जाऊन ये. तुला बरे वाटेल." पण झेब्रू म्हणाला, "नाही, मी नाही कळपाबरोबर जाणार. मला तळ्यावरच जायचे आहे. गेंडोबांशी गप्पा मारायच्या आहेत. आई म्हणाली, "रोज आम्ही बरोबर असतो तुझ्या. अरे आज तू एकटाच कसा जाणार? मधल्या जंगलात वाघ सिंह कोल्हे आहेत. त्यांनी तुला काही केले तर... त्यापेक्षा तू आपला कळपाबरोबर रहा. आम्हालाही काळजी नाही." पण झेब्रू आगदी हट्टाला पेटला होता. तो म्हणाला, "नाही. मी तळ्यावरच गेंडोबांकडे जाणार." शेवटी आई बाबा त्याला, "सांभाळून जा रे बाबा." असे सांगून बाहेर गेले.

  

झेब्रू आपण जिंकलो ह्या आनंदात तळ्यावर पोचला.त्याला गेंडोबा कुठेच दिसेना. त्याला एक खडक दिसला. तो त्यावर उभा राहिला. तेवढ्यात तो खडक हलतो आहे असे त्याला वाटले. झेब्रू पुरता घाबरला. लटलट कापू लागला. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. तेवढ्यात पुढून गेंडोबांनी आपली शिंगे बाहेर काढली. गेंडोबा झेब्रूची फजिती बघून हसू लागले. "कशी मजा केली! आज तू एकटा कसा?" असे विचारल्यावर झेब्रू काही बोलणार तोच पलीकडे वाघाची डरकाळी ऐकू आली.


  गेंडोबा एकदम सावध होऊन तळ्याच्या मध्यभागी आले. वाघ झेब्रूला बघून जिभल्या चाटत होता पण त्याला तिथपर्यंत येता येत नव्हते. एक तास बसून बसून कंटाळल्यावर वाघ गुरगुरत निघून गेला. वाघ गेल्यावर झेब्रू म्हणाला, "मी कळपाबरोबर डोंगरावर जायला हवे होते. मी उगाच हट्टाने येथे आलो. माझे चुकलेच. मला दादा तुम्ही वाचवलेत म्हणून बरे झाले. मी तुमचा खूप आभारी आहे."


  तेवढ्यात झेब्रूचे आई बाबा त्याला न्यायला आले. झेब्रू आईला घट्ट बिलगला. "मी आता सगळे तुमचे ऐकीन,"असे म्हणून रडू लागला. गेंडोबांनी सगळी कहाणी सांगितली. आई बाबांनीही गेंडोबाला धन्यवाद दिले. भरपेट जेऊन झेब्रू आईजवळ जे झोपला, ते चार-पाच तास उठलाच नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract