स्वागत नववर्षाचे
स्वागत नववर्षाचे
स्वागत नववर्षाचे म्हटले की मला आदरणीय शांताबाई शेळकेंची ' स्वागत नववर्षाचे ' ही समुद्राला उद्देशून केलेली कविता आठवते. समुद्राची वाळू येणा-या लाटांबरोबर कणाकणाने खचत असली तरी, समुद्र जसा येणा-या नवीन लाटांचे भरभरुन स्वागत करतो, तसेच येणा-या नवीन वर्षाबरोबर आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी होत असले तरी, आपण नवीन वर्षाचे आनंदाने , उत्साहाने स्वागत केले पाहिजे.
'सारखा काळ चालला पुढे' ह्या काव्यपंक्तीप्रमाणे, काळ सारखा पुढे पुढेच जात असतो. जीवनाच्या वाटेवर आपणही सतत पुढची वाटचाल करत असतो. आपण मागे कधीच जाऊ शकत नाही.ज्येष्ठ कविवर्य केशवसुत म्हणतात
' जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
' सावध ऐका पुढल्या हाका'
आता 2022 साल जवळजवळ संपत आले आहे. आता 2022 मधील कटू घटना , मोडलेले संकल्प ह्यांचा विचार करण्यापेक्षा , मला येणा-या नवीन वर्षात काय करता येईल , ह्या नवीन वर्षाची काय काय आव्हाने आहेत ह्याचा विचार करणे श्रेयस्कर ठरेल.
नवीन वर्ष हे नेहमीच आनंद, उत्साह , नवचैतन्य घेऊन येते. ह्यावर्षी कामाच्या गर्दीमुळे येऊ न शकणारी मुले , आई वडीलांना " मी नवीन वर्षी नक्की येईन "असे सांगतात
त्यामुळे आईवडीलांच्या चेह-यावर हसू फुलते.
नवीन वर्ष नवसंकल्पांचे असते. आपली सामाजिक बांधिलकी आपण जपली पाहिजे. वृद्धाश्रमात रहाणा-या वृद्ध आई वडीलांना विरंगुळा मिळावा म्हणून दरवर्षी माझ्या मिस्टरांचा 28 फेब्रुवारीला येणारा वाढदिवस आम्ही पुण्यात असल्यास मातोश्री वृद्धाश्रमात करतो. सकाळी सर्वांना नाश्ता दिला जातो. ते सर्वजण आमच्या कुटुंबासाठी शुभेच्छा देतात. दुपारी मी सिंथेसायझरवर मराठी - हिंदी गाण्यांचा एक तासाचा कार्यक्रम सेवाभावी वृत्तीने करते. त्यांच्या चेह-यावरील समाधान , मला आगळेच समाधान देऊन जाते. सर्वांचीच नवीन वर्षाची सुरवात आनंदात , उत्साहात होते.
येणारे नवीन वर्ष कोणाचे 10 वी , 12वीचे तर कोणाचे डिग्री मिळवणारे तर कोणाचे पोस्ट ग्रँज्युएशनचे तर कोणाचे पी एच. डी. पूर्ण करणारे असते. मुलांचे जोरदार अभ्यासाचे संकल्प सुरु होतात. आईवडीलांचे डोळेही त्यांच्या परीक्षांकडे त्यांच्या उज्वल यशाकडे लागलेले असतात. हे येणारे नववर्ष त्यांच्या आशा - आकांक्षापूर्तीचे असते. हँपी न्यू इयरचा फोन करताना , दोन्हीकडून उत्साह ओसंडून जात असतो. नवनवीन सहलींच्या बेतांना पूर येतो.नवे प्लँन्स उत्साह वर्धित करतात.
व्यावसायिक लोकांना नवीन वर्षात कोणते आडाखे बांधावेत? जुने हितसंबंध जपून ठेवण्याबरोबर , ओळखी वाढवून व्यवसाय कसा वृद्धिंगत करावा याचे आडाखे बांधणे चालू असते.
नवीन वर्षाचे आगमन तरुणाई जल्लोषात करते. बारा वाजेपर्यंत जागून पार्टी करुन , एकत्र जमून एकमेकांना शुभेच्छा देतात. मागील वर्षातील गैरसमजांची जळमटे झटकून , सगळे एकत्र जमतात. एकमेकांना शुभेच्छा देतात.
येणारे नवीन वर्ष फक्त संकल्प आणि मौजमजेचे नसते , तर ते काही आवघड आव्हानेही घेऊन येते. येणारी आव्हाने हसतमुखाने स्विकारुन , कर्तव्यपूर्तीतच माणसाचे कर्तृत्व दिसून येते.कधी वृद्ध आईवडीलांच्या तब्बेतीचे आडाखे , खर्चाचा अंदाज डाँक्टरने सांगितलेले असतात. कधी पत्नी नवीन वर्षातील खर्चाची कल्पना देते. अशावेळी त्या कर्त्या पुरुषाला मनावर प्रचंड संयम ठेवून मुलांच्या नववर्षाच्या स्वागतात आनंदाने सहभागी व्हावे लागते. ह्या नववर्षाच्या सुरवातीसच चीनमधे 3 कोटी कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे. आखिल जगतालाच हादरा देणारी ही गोष्ट आहे. सर्वांनीच सावधपणे राहून , काळजी घेणे आवश्यक आहे.आता एकदा कोरोनाचा फटका बसल्याने सर्वजणच सावध राहतील आणि आवश्यक खबरदारी घेतील ह्याची निश्चितच खात्री आहे.
काहीही असले तरी , नववर्ष हे नेहमीप्रमाणेच हर्ष , उल्हास , उत्साह , आनंद आणि तरुणाईचा जल्लोष घेऊन येईल. युवावर्ग त्याच उत्साहाने नाचून , हसून खेळून येणा-या वर्षाचे स्वागत करणार ह्यात शंकाच नाही. आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक उत्साहाने फोन करतील , खुशाली विचारतील आणि गप्पांमधे रममाण होतील. नवीन वर्षाची जादूच अशी काही भारी आहे की , सर्वजण आनंदाने , उत्साहाने नववर्षाचे स्वागत करतील. मला नवीन वर्षाच्या सुरवातीला सर्वांसाठी एकच प्रार्थना करावीशी वाटते.
सर्वेपि सुखिनः सन्तु
सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःखमाप्नुयात्