होय मी शाळा बोलतेय
होय मी शाळा बोलतेय
होय मी शाळा बोलतेय करोनाच्या दुष्ट राक्षसाने निष्पाप लोकांचे जीव तर घेतलेच पण सोशल डिस्टन्सिंग पाळणे शाळा, मॉल प्रार्थनालये सिनेमा थिएटर्स , रंगमंदीरे ह्या ठिकाणी शक्य नसल्याने ह्या ठिकाणांवर निर्बंध आले.
रोज सकाळी स्वच्छता कामगार येऊन ६.३० लाच झाडून घ्यायचे.रोज घंटा स्वच्छ केली जायची. टीचर्स रुम , मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका सुपरिंटेंडेंट ह्यांच्या रुम्स उघडून सुवासिक जंतुनाशकाने स्वच्छ केल्या जायच्या. दशरथदादा तिथे छान गुलाबाची फुले फ्लाँवरपाँटमधे आणून ठेवायचे.किती छान वाटायचे मला!!
तेवढ्यात रिंगटेनिस , थ्रोबॉल , लंगडी खेळायला मुली यायच्या.आमच्या शाळेत फक्त मँचपुरते नाही तर, फिटनेस आणि खेळ आधिक चांगला व्हावा म्हणून नियमित प्रँक्टिस चालू असे.मग सकाळची शाळा भरे.मुली घाईघाईने दप्तरे सावरत पळतपळत शाळा गाठायच्या.कुणी पडले तर मलाच खूप वाईट वाटायचे.मुख्याध्यापिका कडक शिस्तीच्या. दारावर उभ्या असत.नेहमी उशीरा येणा-यांना कारण विचारुन समज दिली जायची.
सकाळची शाळा संपल्यावर दुपारची सुरु व्हायची.दिवसभर शाळेत गजबज असायची संध्याकाळी मुली आवडीने खेळ खेळायच्या.6.30 ला दशरथदादा सर्वांना घरी पाठवून सर्व दिवे , दरवाजे बंद करुन ७ वाजता शाळा बंद होई.किती व्यस्त जीवनक्रम होता माझा!! जीवनात ही घडी अशीच राहू दे असेच मी नेहमी म्हणायची.पण........
पण जसे कोरोनाचे सावट आले तसे मुली शाळेत येणे बंद झाले.तशा सूचनाच लाँकडाऊनमधे आल्याने , तसेच करावे लागले.सर्व वर्ग सुनेसुने झाले.खेळांची गजबज एकदम शांत झाली.मला वाटले १/२ महिन्यात निवळेल , पण कसले काय नि कसले काय!!आता सव्वा वर्षे झाली ह्या गोष्टीला पण अजून पेशंटस निघतायतच.आणि तिसरी लाट लहान मुलांना घातक असल्याने माझ्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. आता शिक्षक वर्ग मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका यायला सुरवात झाली आहे , त्यामुळे थोडेतरी बरे वाटते आहे.
ही आँनलाईन शाळा तात्पुरता टेकू देते आहे.मुलींना काहीतरी घरबसल्या शिकायला मिळते आहे.शिक्षक विषय समजावून देण्याची पराकाष्ठा करत आहेत.गृहपाठ करुन तपासायला मागत आहेत.मला त्यांचे कष्ट कौतुकास्पद वाटतात.पण......
हा पणच जिथे तिथे नडतो आहे.मुली शाळेत आल्यावर मुली एकाग्र चित्ताने विषय समजून घ्यायच्या.ते एकाग्रचित्त घरी बसून होणे कठीण जात आहे.मुली शंका विचारताना कुकरच्या शिट्टया , घरच्यांचे बोलण्याचे आवाज दोन्हीकडून आल्याने दोन्ही बाजूंचे चित्त विचलित होत आहे.मुली घरी असताना मधेच आँफलाईन झाल्या किंवा उठल्या तर शिक्षकांना प्रत्येकीच्या मागे लागून कारणे विचारणे अशक्य आहे.
एकंदरीत विचार करता शाळेत मिळणारे शिक्षण , होणारी जडणघडण , संस्कार लागणारी शिस्त , शिकण्यासाठी लागणारी एकाग्रता ह्या सर्व गोष्टींची उणीव आँनलाईन शिक्षण पद्धतीमधे येत आहे.कोणाकडे नेटचा प्राँब्लेम येतो , मग नेट मिळेपर्यंत थांबणे भाग येते.नेट मिळते तेव्हा आँनलाईन शाळा संपलेली असते.
वरील सर्व गोष्टींमुळे मी मनात खूप उदास झाले आहे.आता मुलांचे लसीकरण व त्याचे परिणामांची चाचणी सुरु आहे.ती पूर्ण झाल्यावर मुलांना डोस मिळतील व जेव्हा लसीकरण पूर्णतेच्या टप्प्यात येईल व कोरोनाचाही समूळ नायनाट होईल तेव्हाच माझे आवार , वर्ग ,क्रीडांगण गजबजून जाईल.
मी त्याच सुवर्णक्षणांची अत्यंत आतुरतेने वाट बघत आहे.तो दिवस लवकरात लवकर येवो हीच माझी सरस्वती देवीला मनापासून प्रार्थना!