Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

कर्तव्यदक्ष डॉक्टर

कर्तव्यदक्ष डॉक्टर

3 mins
137


     "शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्" असे जे म्हणतात , ते अगदी खरे आहे. तुमचे शरीर व्यवस्थित असेल तरच तुम्ही काम करु शकता. आपल्याला बरे वाटत नसेल तर आपण डॉक्टरकडे धाव घेतो. ते आपल्याला नुसते औषध नाही तर, धीरही देतात.त्यांच्या उपचाराने आपल्याला बरे वाटले की आपल्याला हायसे वाटते.


    संपूर्णपणे विचार केला तर मेडीकलचा कोर्स हा सर्वात जास्त काळ चालणारा. ख-या अर्थाने विद्यार्थ्याची परीक्षा पहाणारा. जबाबदारीचे काम असणारा. ह्यात हयगय नाहीच, कारण रुग्णाच्या जीवाशी खेळ असतो. बुद्धिमत्ता, संयम, धीटपणा, समयसूचकता ह्या सर्व गुणांचा मिलाफ डॉक्टरमधे बघायला मिळतो. सेवाभावी वृत्तीनेच डॉक्टरी पेशात उतरावे लागते . डॉक्टरचे खाजगी जीवन व्यवसायात व्यस्त असते. दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस त्यांच्या वेळावर रुग्णांचा हक्क सर्वप्रथम असतो. त्यामुळे जीवनसाथी शोधताना डॉक्टरला आधिक सतर्क रहावे लागते.

डॉक्टरच डॉक्टरच जीवनसाथी ख-या अर्थाने समजून घेऊ शकतो.कधीकधी काही कार्यक्रम चालू असला, आणि इमर्जन्सी आली तर, लगेचच डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागते कारण रुग्णाचा जीव टांगणीला लागलेला असतो. डॉक्टरची तब्बेत किरकोळ बरी नसली तरी डॉक्टर दवाखान्यात येऊन आपले काम करत असतो , ह्यात डॉक्टरची सेवावृत्ती आणिव्यवसायाप्रती निष्ठा दिसते.तुम्ही नुसतीच औषधोपचार करुन थांबत नाही तर, रोग्यांना धीर , दिलासाही देता. रोगी गंभीर असेल तर नातेवाईकांना परिस्थितीची स्पष्ट कल्पना देता.रोग्याचा मृत्यू झाल्यास सॉरी म्हणून क्षमायाचना तर करताच पण त्यांच्या दुःखात सहभागीही होता. एखादी व्यक्ती जिवंत राहिली तर, तिला कोणकोणत्या गंभीर स्थितीला सामोरे जावे लागले असते , तेही शांतपणे समजावून सांगता.डॉक्टर म्हणजे धन्वंतरी नव्हे. तेही एक माणूसच असतात. काही मूर्ख लोक रुग्णाच्या मृत्यूसाठी डॉक्टरला जबाबदार धरुन त्यांनाच नाही नाही ते बोलतात. हे संपूर्णपणे चूक आहे.


   कोविडच्या काळात तुम्ही जे सेवाभावाने रुग्णांसाठी कर्तव्य पार पाडले आहे ,त्याबद्दल शब्द / अक्षरे अक्षरशः माझ्याभोवती फेर धरुन नाचत आहेत. 

कशी निवड करु शब्दांची आणि कोणत्या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करु तेच कळेनासं झालंय.


  हे जे अचानक आलेले कोरोनाचे संकट आहे , ह्याची भीषणता , वैद्यकीय ज्ञानामुळे डॉक्टरांनाच माहित. लोकांना जरी लॉकडाऊनमधे घराबाहेर न पडण्याचे आदेश असले तरी , हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या रोग्यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना ड्युटीसाठी बाहेर पडावेच लागले. डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता , तहानभूक विसरुन रात्रंदिवस कार्यरत राहिले.गंभीर रोग्याला वाचवताना कधी वेळ बघितली नाही.


  डॉक्टरी व्यवसायच सेवाभावाच्या बेसवर उभा आहे.रात्री अपरात्री फोन आला तरी , तुम्ही हॉस्पिटलमध्ये धाव घेता.डॉक्टरांप्रती सर्वांच्याच मनात नित्य आदरभाव आहे. कोविडचे आव्हान तर त्सुनामीसारखे घोंघावत आले, पण सर्व डॉक्टरांनी एकदिलाने , सेवाभावीवृत्तीने लढा दिला व देत आहात. ह्या काळात अनंत अडचणींनातोंड द्यावे लागले.कोविडचे किट तर सुरक्षिततेसाठी घालायलाच हवे. ते किट घातल्यावर प्रचंड उकडायचे , नाक तोंड चेहरा पूर्ण झाकल्याने श्वास घेताना त्रास व्हायचा.कधी पेशंटसची संख्या वाढल्यावर दिवसा ड्युटी करुनही घड्याळ न बघता रोग्याला वाचवायचे कसे ते बघावे लागायचे. किती त्रास झाला!!


   सर्वसामान्यपणे इतर रोगात पेशंटबरोबर एक कोणीतरी घरचे असायचे.डॉक्टर त्या व्यक्तीला नर्सना सूचना देऊ शकत होता,पण हा कोरोना रोगच भयंकर आहे.ह्यामधे पेशंटजवळ कोणीही थांबू शकत नसल्याने , सर्व सूचना नर्सेसना द्यायला लागायच्या. ह्या काळात नर्सेसनीही जीवापाड कष्ट करुन डॉक्टरांना सहकार्य करुन रोग्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.


  डॉक्टर व नर्सेसच्या ह्या बहुमोल कार्याची आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी दखल घेऊन डॉक्टरांना फोन करुन , विचारपूस करुन ,धन्यवादही दिले.बहुमोल कार्य करणारे डॉक्टर महान आहेत आणि जाणीव ठेवून धन्यवाद देणारे आदरणीय पंतप्रधान मोदीजीही तितकेच महान आहेत. सध्या डॉक्टर देवाच्या रुपातच वावरत आहेत हॉस्पिटलमध्ये.


पेशंटला तुम्ही दिसलात की देवदूतच आला असे वाटायचे. पेशंटच्या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे देऊन त्यांना धीर दिलात, दिलासा दिलात.

तुमच्या आशावादी विचारांनी त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा वाढून अनेक रोगी बरे होऊन घरी परतले. त्यांचे व त्यांच्या नातेवाईकांचे दुवे डॉक्टरांना सतत चांगली साथ देतील.

  

तुम्ही जीवापाड केलेल्या ह्या कार्याची जाण, सर्वसामान्य जनतेलाही आहे.आजचा लेखप्रपंच डॉक्टरप्रती अनंत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आहे. डॉक्टरांनी मानवता धर्मातून केलेल्या सेवेच्या पुण्याची नोंद चित्रगुप्तानेही त्याच्या खातेवहीत नक्कीच केलेली आहे. पुनश्च, डॉक्टर्स नर्सेसचे आणि झटलेल्या सर्व मेडिकल स्टाफचे कोटी कोटी आभार मानते.शेवटी एकच म्हणावेसे वाटते 

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती,

  तेथे कर माझे जुळती "


सर्वांना सादर कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद !


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract