Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

अविस्मरणीय स्मृतींचं गाव

अविस्मरणीय स्मृतींचं गाव

2 mins
278


   आपल्या आईचं माहेर हे आपलं हक्काचं आजोळ असतं. लहानपणी आपण आजोळी मनसोक्त धमाल करतो.माझ्या आईचं माहेर पुण्यापासून ३६ कि मी. वर असलेलं फुलगाव.

    माझे आजी-आजोबा दादरला रहात होते. दरवर्षी पौष शुद्ध अष्टमीला आजोबांचे पणजोबा रामचंद्र स्वामी ह्यांनी समाधी घेतली असल्याने, त्यांच्या पुण्यतिथीसाठी माझे आजी आजोबा मामा मावश्या आईचे काका काकू चुलतभावंडे असे सर्वजण जात असू.

   फुलगावला जायला पुण्यापासून एस टीने जायला लागायचे. तुळापूर फाट्याला उतरावे लागे. हा तासाचा प्रवास गप्पागोष्टी गाणी ह्यात पटकन जायचा.नंतर अर्धा तास पायवाटेने चालत जायला मजा यायची. हातात हरबरा , बोरं असायची. सोबत गोळ्या , चाँकलेटंही. आजूबाजूला पसरलेली हिरवी शेते , रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक बागा नेत्रसुख द्यायच्या.कुठेतरी शेतावर मोट चालू असायची.ती बघायलाही गंमत वाटायची.मी तर अगदी शाळकरी वयापासून कॉलेजमधे जाईपर्यंत दरवर्षी जात असे. माझी माधुरीमावशी दोनच वर्षांनी मोठी असल्याने, आई नाही आली तरी मी मावशीबरोबर जात असे.

     तिथे पोचल्यावर आईच्या काका काकूंना नमस्कार करायचो." अगं बाई जयू मोठी झाली की आता!!" असे कौतुकाने काकू म्हणायच्या.चहा नाष्टा झाल्यावर आम्ही गावात चक्कर मारायचो.

    पूर्वीचे फुलगाव छोटे होते.तिथे लाल गोड गाठी चांगल्या मिळतात माहित होते. त्या भरपूर खायचो.पूर् येथे पेशवेकालीन बाजारपेठ होती.दर बुधवारी बाजार भरत असे.येथे पेशवेकालीन कमानीघाट आहे.पेशवे तिथे हत्ती घोडे बांधायचे.येथे महादेव मंदिर आहे.त्याचेही दर्शन घ्यायचो.येथे आईचे चुलते शेती करत असत.फुले , धान्य लावत असत.त्या शेतातून फिरण्याचा बालवयात मला मिळालेला आनंद मी कधीच विसरु शकणार नाही.

   दुस-या दिवशी पुण्यतिथीला बरीच माणसे असत.आम्ही भाजी निवडायला , कोथिंबीर निवडायला खारीची मदत करायचो चुलीवरची आविलावर भाजलेली खरपूस भाकरी आणि आविलावर खमंग भाजलेले वांग्याचे भरीत अगदी चटकदार , अविस्मरणीय!!.पंगतीत साडी नेसून कसे वाढावे हे मला तिथे शिकायला मिळाले.संध्याकाळी गप्पागोष्टी गाणीह्यात वेळ मस्त जायचा.आईच्या काकू , आत्या मोठी मोठी गाणी पाठच्या पाठ म्हणायच्या.ह्याचे आत्ता आम्ही साठी ओलांडल्यावर जास्त कौतुक वाटते.

   दुस-या दिवशी आम्ही तुळापूरला जायचो.इथून ३ कि.मी. वर तुळापूर आहे. गप्पा मारत , सकाळच्या गार हवेत चालायला खूप मजा यायची.कोणाकोणाच्या नवीन नवीन बातम्या कळायच्या.पण नंतर कळायचे की आम्हांला कोणीतरी गंडवले.निम्म्या बातम्या टाईमपास व फेक असायच्या.तुळापूरवा संभाजी महाराजांचे पवित्र दर्शन घ्यायचो.तेव्हाही वाटायचे की फंदफितुरी नसती तर , संभाजीमहाराज सापडणेच शक्य नव्हते.

   मग नदीकाठाने फिरतफिरत परत यायचो. तेथे बैलांच्या शर्यती बघायला सगळेजण यायचे .खूप मजा यायची. मामा आम्हांला पलीकडच्या तीरावरच्या गाभूळलेल्या चिंचा द्यायचे. मग पुन्हा सगळ्यांच्या गप्पांचा फड बसे.चेष्टा विनोद ह्यात घड्याळाचा काटा पुढे सरके.आमची खुसखूस चालूच असे.मग काकू , आत्या " पोरांनो झोपा रे आता " असे म्हटल्यावर झोपायचो.

    दुस-या दिवशी परत येताना सर्वांचीच मने जडावलेली असत.तेव्हा फोन नव्हते.परत पुढच्या वर्षी भेटू ह्या आश्वासनावरच निरोप घ्यावा लागे.

    आता फुलगाव बरेच सुधारले आहे.आता सगळेजण कारने जाऊ शकतात.तेथे स्वरुपानंद स्वामींचा मठ आहे. माझ्या भावविश्वातील पूर्वीचे जुने फुलगाव , तेथे सर्व जमल्यावर केलेली मौजमजा काही आगळीच!!

   असे आठवणीतले फुलगाव आठवून सर्व स्मृतीपट डोळ्यासमोर उभा राहिला व परत जाण्याची इच्छा उफाळून आली.


Rate this content
Log in