प्रेमाचा चहा
प्रेमाचा चहा
चहा दोन अक्षरी शब्द आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान टिकवून आहे. आपल्या भारतामध्ये चहाचे अनेक चहाते आहेत. भारतातच काय पण साऱ्या जगभरात चहाचे चहाते असतील. त्यात पण साखरेपेक्षा गुळाचा आले किंवा सुंठ घातलेला आणि नंतर उकळलेला तो सोनेरी रंगाचा सोनेरी कपात ओतलेला चहा त्याचा तो सुगंध आणि असं ते सोनेरी रूपडं पाहूनच मन प्रसन्न होतं तृप्त होतं.
तो भारतात आणला इंग्रजांनी, पण आता तो आपल्याला परका वाटतच नाही. त्या काळी म्हणे इंग्रज घरोघरी जाऊन फुकट चहा वाटायचे. त्यावेळी आपले भारतीय लोक सकाळी उठल्यावर म्हणे दूध प्यायचे. ते पण अगदी गोठ्यात जाऊन निरसे दूध प्यायचे. त्यामुळे चहाचे दुष्परिणाम तेव्हापासून आजपर्यंत खूप सांगितले जातात पण तरीही कोणी चहा सोडत नाही. आता कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर तो वाईटच.
आल्यागेल्या पाहुण्यांच्या स्वागताला चहासारखे उत्तम पेय नाही."ऑल टाईम अॕण्ड एनी सीजन " एखाद्याकडे काहीच नाही मिळालं तर म्हणण्याची पद्धतच आहे साधा घोटभर छान नाही विचारला," हे काय देणार बाकीच्या गोष्टी".
एखाद्या गोष्टींची काही बोलणी करायची असतील तरी समोरचे कॅन्टीन नाहीतर चहाची टपरी . पहिल्यांदा एकमेकांला भेटल्यावर चला, जरा चहा घेऊया असंच म्हटलं जातं.
तर, असा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला चहा त्यातूनही पावसाळा पावसात भिजले तरी घोटभर चहा पाहिजे असतो. थंडी आली, थंडीने काकडलो तरी घोटभर चहा पाहिजे असतो. असंही चहा पिण्याला कोणते कारण लागत नाही. रात्रपाळी ची ड्युटी आहे, चहा मागवा. रात्री एखादी मैफिल गाजवायची आहे, चहा मागवा. तल्लफ आली चहा मागवा.
बरं चहाचे प्रकार तरी किती, मसाला चहा ,स्पेशल चहा, ढाब्यावरचा चहा, कोरा चहा, तंदूर चहा, साधा चहा, कटिंग चहा, ग्रीन टी मसाला , वेलची टी, गवती चहा. अजून एक चहासाठी कोडवर्ड आहे तो असा वापरला जातो "नाना चहा आणा ! म्हणजे नाही, आणि "अण्णा चहा आणा !म्हणजे आणा. सर्वात मस्त तिच्या उष्ट्या कपातला अमृताची चव असणारा चहा त्याच्यापुढे सारे चहा फिके. अजून एक राहिला ना! तो म्हणजे चाळिशीनंतर चा शुगर-फ्री चहा असं हे चहाच पहिलं प्रेम आणि चहापुराण आता संपवते.