Sumit Sandeep Bari

Abstract Classics Fantasy

4.0  

Sumit Sandeep Bari

Abstract Classics Fantasy

नागवेलीची जन्मकथा

नागवेलीची जन्मकथा

3 mins
276


आटपाट नगर होते. या नगरात सुखसमृद्धी नांदत होती. सर्व नागरिक सच्छिल होते. स्वधर्माचे पालन करीत होते. आनंदात जीवन व्यतीत करीत होते. अशा या नगरीत दोन सत्त्वशील स्त्रिया नांदत होत्या. एक माळीण व दुसरी बारीण. दोघी शेजारणी होत्या. दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. आपल्या मनाचे हितगुज एकमेकींना सांगत होत्या. दोघीजणी आपल्या प्रेमळ कुटुंबात मानाने, घरंदाजपणाने नांदत होत्या.


दोघी शिवाच्या - देवाधिदेव महादेवाच्या अनन्यभक्त होत्या. दररोज नित्यनेमाने दोघी एकमेकींच्या सोबत महादेवाच्या मंदिरात जायच्या व अनन्यभावाने त्याची पूजाअर्चा करायच्या. दोघी एका बाबतीत समदुःखी होत्या. दोघींना भाऊ नव्हता. त्यामुळे भाऊ-बहिणीचा एखादा सण भाऊबीज,राखी पौर्णिमा किंवा पिठोरी अशा सणाला दोघी आपल्याला भाऊ नाही या विचाराने दुःखी होत. असाच एकदा भाऊबीजेचा सण आला. दोघी मैत्रिणींचे दुःख सकाळपासूनच तीव्र झाले होते. मनातल्या मनात त्या झुरत किंवा भावाबरोबर माहेरी जाणाऱ्या बहिणींना पाहून मनोमन उसासत होत्या. अशा उदास मन:स्थितीतच दोघी नित्यनियमाप्रमाणे शिवपूजेसाठी मंदिरात गेल्या. आज शिवपिंडीला स्नान घालताना त्यांचे अश्रूही जलात मिसळत होते. मनाच्या या भावपूर्ण अवस्थेत आज दोघींनीही नेहमीपेक्षा अधिकच मन लावून देवाची पूजाअर्चा केली. करुणेने ओथंबलेल्या मनाने प्रार्थना केली आणि भारावलेल्या अवस्थेतच दोघी घराकडे परतल्या. वाटेत एक सखी दुसरीला म्हणाली, "आमच्या घरी माझ्या जाऊचा भाऊ आला आहे. ती खूप आनंदात आहे. सकाळपासूनच तिची धांदल उडाली आहे. "


दुसरी म्हणाली, "माझी नणंदही माहेरला आलेली आहे. बाईसाहेबाचा खूपच थाट आहे. भावाने तिच्यासाठी जरीचे भारीपैकी पातळ खण आणले आहे." दोघींनी उसासे सोडले.


दोघींच्या मनात एकाच क्षणी एक विचार चमकून गेला. 'आपण शिवालाच आपला भाऊ म्हणून ओवाळले तर!' आणि दोघींच्या तोंडून एकाचवेळी वरील उद्गार बाहेर पडले.


आता त्यांची उदासीनता पळाली. आता त्यांच्या गप्पांना वार्तालापाला वेग आला. दोघींनी आपसात ठरविले. संध्याकाळी ओवाळणीचे तबक तयार करून मंदिरात यायचे व देवाधिदेव महादेवाला (आपल्या भावाला) ओवाळायचे. वाऱ्याच्या गतीने त्या घरी आल्या. सर्वांशी हसून-खेळून बोलू लागल्या. घरातल्या कामधंद्यात मनापासून रमल्या. पण वेध लागले ते संध्याकाळचे. केव्हा संध्याकाळ होते व केव्हा त्या जिवलग बंधूला ओवाळते असे झाले.. मनाची अधिरता वाढतच होती. आजपर्यंत या हातांनी कुणा भावाला ओवाळले नव्हते; त्यामुळे मन उत्सुक झाले होते.


संध्यासमयाचे आगमन आज खूपच लांबले होते. मुंगीच्या पावलाने दिवस सरकत होता. आता ती अपूर्व आनंदाची घटका जवळ-जवळ येत होती. भावाला ओवाळण्याचा तो आनंदाचा सोहळा आता भगिनी साजरा करणार होत्या. त्यासाठी दुपारपासूनच त्यांची तयारी सुरू होती.दोघींनी पैठणीसारखे महावस्त्र परिधान केले. गर्भरेशमाच्या खणाची चोळी घातली. कपाळावरील बिंदीपासून पाऊलाच्या बोटांपर्यंत अंगावर दागिने घातले. चांदीच्या तबकात सोन्याचे निरांजन लावले. पंचामृत, फळफळावळ, गंधाक्षता, फुले, कलश इत्यादींनी ओवाळणीचे तबक सजवले. एकीची ही धांदल पाहून माहेरपणाला आलेल्या नणदेने टोमणाही मारला. पण मनाच्या या आनंदावस्थेत आज तो जिव्हारी लागला नाही.


सर्व तयारी पूर्ण झाल्यावर एका सखीने दुसरीला साद घातली. दोघी संगतीने निघाल्या. जलद गतीने चालत मंदिरात पोहचल्या. तबकावरचे रूमालाचे झाकण बाजूस सारले. मंदिरातील समईवर निरांजने पेटली आणि दोघींनी पंचामृताने पिंडीला स्नान घातलं. नंतर चंदनाचे गंध, फुले, अक्षता, फळे वाहिली व समोर आपला सखा भाऊच बसला आहे असे मनोमन मानून तबकातील निरांजनासोबत डोळ्यातील निरांजनाने त्या जगदीशाला ओवाळले. ओवाळून तबक खाली ठेवले व डोळे मिटून हात जोडले. मनोभावे प्रार्थना केली. आता या प्रार्थनेत कारुण्य नव्हते; तर आनंदाने सुखाच्या पूर्णत्वाने लाभलेली तृप्ती होती. दोघींनी प्रार्थना संपवून डोळे उघडले तर समोर साक्षात शंकर प्रकटले होते. देव म्हणाले, "बहिणींनी ओवाळले तेव्हा त्यांचे तबक रिकामे कसे राहू देणार? ओवाळणी टाकायलाच हवी! म्हणून मी प्रत्यक्षच आलो" असे म्हणून परमेश्वराने माळीणीच्या तबकांत जाईची वेल ठेवली तर बारीणीच्या तबकात नागवेल ठेवली आणि सांगितले. 'बहिणींनो, तुमचा भक्तिभाव, तुमचे प्रेम पाहून मी प्रसन्न झालो. माझी ही भेट तुमच्या वंशजांना पिढ्यानपिढ्या पुरेल. या दोन वेली समुद्रमंथनावेळी जी चौदा रत्ने निघाली, त्यातील ऐरावत या गजराजाच्या पायाला गुंडाळून आलेल्या होत्या त्या तुम्हाला देतो. त्या आपल्या मळ्यात लावा. "


दोघी घरी आल्या. घडलेली हकीगत सर्वांना सांगितली. त्यांनी समारंभपूर्वक वेली आपल्या मळ्यात लावल्या. बारीणबाईला प्रत्यक्ष शंकराकडून प्राप्त झालेली नागवेल ही आपली देवता आहे. नागवेलीच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत. मानवाला जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक समारंभ- सोहळ्यात नागवेलीची पाने संगत करतात. बारशाच्या समारंभापासून, ताटीवरील मृताच्या शरीरावर बांधण्यासाठी, दशक्रिया, पिंडदान यासाठी नागवेलीची पाने लागतात. एखाद्या कार्यारंभी सुपारीच्या गणपतीची स्थापना होते; ती नागवेलीच्यापानावर, कलश स्थापनेसाठी लागतात ती नागवेलीचीच पाने. अनेक आजारात पानाचा विडा देतात. बाळंतिणीला जेवणानंतर पान खायला देतात. पंचपक्वान्नाच्या जेवणानंतर विड्याशिवाय तृप्ती नाही, पूर्णता नाही. हे बहुगुणी पान म्हणजे नागवेलीचे पान आणि ही आहे नागवेलीच्या जन्माची सुफळ, संपूर्ण कहाणी.”


सदर कथा ही पूर्वजांकडून ऐकण्यात आलेली आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract