चमत्कार की सकारात्मक विचार
चमत्कार की सकारात्मक विचार


एक माणूस वाळवंटातून प्रवास करत करत थकला होता. त्याला पाण्याची खूप तहानही लागली होती.त्याच्या जवळ असलेले पाणीदेखील संपले होते. तो पाण्यासाठी इकडेतिकडे भटकू लागला. अचानक त्याला दूरवर एक झोपडी दिसली. तो त्या झोपडीत गेला. त्या झोपडीत त्याला एक पाण्याचा हौद दिसला पण दुर्दैवाने त्या हौदात पाण्याचा एक थेंबही नव्हता. हौदाच्या बाजूलाच त्याला एक पाण्याची बॉटल दिसली. पाण्याची बॉटल पाण्याने भरलेली होती . हे पाहून तो खूप आनंदी झाला. त्याला पाण्याची तहान खूप लागलेली असल्याने त्याने ती पाण्याची बॉटल चटकन उचलली आणि पाणी पिण्यासाठी झाकण उघडणारच तेव्हढ्यात त्याला बॉटल वर असलेली चिपकवलेली चिट्ठी दिसली. ती चिट्ठी त्याने वाचली. त्यात लिहिले होते की, "झोपडित असलेल्या हौदात बाटलीतील पाणी टाका व हवे तेव्हढे पाणी प्या व पाणी पिऊन झाल्यावर बॉटल पुन्हा भरून जागी ठेवा"
प्रथमतः त्या व्यक्तीने विचार केला की, या
चिट्ठीत लिहिले आहे ते खरे आहे की खोटे. चिट्ठीत लिहिलेले खरे असले तर आपल्याला भरपूर पाणी मिळेल. परंतु जर खोटे असले तर जे पाणी आपल्या हाती आले आहे ते देखील वाया जाईल. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. त्याला समजत नव्हते काय करावे ? शेवटी त्याने निर्णय घेतला की, आपण हे बाटलीतील पाणी हौदात टाकूया. नंतर जे काही होईल ती परमेश्वराची इच्छा.
त्याने बाटलीतील पाणी हौदात टाकले व पुढच्याच क्षणी हौद पाण्याने तुडुंब भरले. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तो फार आश्चर्यचकित झाला पण त्याला पाण्याची तहान खूप लागलेली असल्याने तो पाणी पिऊ लागला. पोटभर पाणी पिऊन त्याने स्वतःजवळ असलेले सर्व भांडे पाण्याने भरून घेतले व चिट्ठीत लिहिल्या प्रमाणे ती बॉटल पुन्हा भरून ठेवली. जातांना त्याने त्या चिट्ठीत त्याचा स्वतःचा एक संदेश लिहिला, तो असा "विश्वास ठेवा पाणी नक्की येतच." असे लिहून तो व्यक्ती त्याच्या पुढच्या प्रवासाला निघाला.