चतुर प्रधान
चतुर प्रधान
एक राजा असतो, राजा खूप भोळा असतो. त्याची हजामत करायला एक हजाम येत असे, तो फार चतुर असतो. तो प्रधानाबद्दल नेहमी राजाचे कान भरत असे. प्रधान प्रामाणिक होता तो नेहमी दरबारातील सर्व काम बरोबर करायचा. राजा प्रधानाबद्दल समाधानी होता, राजा प्रधानाला आपल्या प्रमाणे वागत असे.सेवकांना पण प्रधान खूप आवडत असे. प्रधान सर्वांची प्रामाणिकपणे कामे पूर्ण करायचा. त्या गावात एक कामचुकार होता तो ह्या हजामाचा मित्र असतो. त्याला प्रधानाची जागा हवी असते म्हणून तो हजामाकडून प्रधानाबद्दल राजाचे कान भरत असे. राजा इकडे ऐकून तिकडे सोडून द्यायचा.
त्याने एक युक्ती केली, राजाच्या वडिलांचे श्राद्ध जवळ येत होते. त्याने राजाला सांगितले मोठे राजा म्हणजे राजा चे वडील मला स्मशानात भेटले व त्यांनी सांगितले मला पंचपक्वान्नाचे जेवण हवे आहे. त्यांनी प्रधानास सोबत पाठवून द्यायचे सांगितले आहे, राजा म्हणतो ते कसे जातील? हजाम सांगतो त्यांना लाकडावर पंचपक्वनांचे ताट घेऊन बसवा खालून लाकडे पेटवून त्यावर ते मोठ्या राजाजवळ पोहचतील. राजाने प्रधानाला वडिलांचा निरोप सांगितला व त्यांनाच त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचे ताट घेऊन जायला सांगितले. प्रधान राजाची आज्ञा पाळत असे, प्रधान विचारात पडला. नदीकाठी अस्वलाचे मोठा वाडा असतो ते अस्वल प्रधानाचे चांगले मित्र असतात. प्रधानाने आपल्या वरील प्रसंग अस्वलाला सांगितले अस्वल म्हणतात आम्ही आहोत तू बिनधास्त लाकडांवर बैस.
राजा चिंतेत होता कारण त्यांना माहित होते की लाकडांच्या जाळ मधून मनुष्य येऊ शकत नाही. मग दुसऱ्या दिवशी सायंकाळी प्रधानाला त्या लाकडाच्या ढिगावर बसवले व खालून आग लावण्यात
आली.आग लागताच धुर झाला. मग अस्वलाने एक दिवस अगोदर लाकडांच्या ढिगा पर्यंत त्याच्या वाड्यापासून भुयार केले होते. अस्वल भुयारी तून जातो व प्रधानाला घेऊन येतो. प्रधान मजेत राजाने दिले पंचपक्वान अस्वला सोबत खातो. इकडे हजामाला वाटते प्रधान मेला. राजा प्रधानाची वाट पाहत होता. एका आठवड्यानंतर प्रधान सामसूम असताना पहाटे राजवाड्यात जातो, राजा प्रधानाला बघतो प्रधान आलेत, कसे काय आहेत मोठे राजाजी? प्रधान सांगतो मजेत आहेत, त्यांना आपण पाठवलेली पंचपक्वान्न खूप आवडली परंतु त्यांना ते खाताना खूप त्रास होत होता. राजा विचारतो कसला त्रास? प्रधान सांगतो केसांचा. पंचपक्वान खाताना तोंडात घ्यायचे पण केसांमुळे त्यांना खाता येत नव्हते, त्यासाठी त्यांनी हजामाला बोलवले आहे.
राजा हजामाला बोलवायला शिपायांना पाठवतो. हजाम आनंदात राजाकडे जातो तिथे प्रधानाला बघून हजाम आश्चर्यचकित होतो, राजा सांगतो तुम्ही आताच्या आता आमच्या वडिलांची हजामत करून या. हजाम म्हणतो ते कसं शक्य आहे, राजा सांगतो जसे प्रधान गेले होते, तसे आपण सुद्धा हजामत करायला जा. हजाम राजाला नकार देऊ शकत नव्हता, शेवटी राजआज्ञा म्हणून हजाम जातो. हजाम लबाड होता म्हणून त्याला कायमची प्रधानने अद्दल घडवायची होती. हजाम गेला तो गेला परत आलाच नाही. हजमाची बायको पोरं हजाम केव्हा येणार ? म्हणून विचारू लागली. प्रधानाने सांगितले स्वर्गात हजाम नसल्याने मोठ्या राजाजींनी त्यांना त्यांच्या जवळ ठेवून घेतले, तुमच्यासाठी त्यांच्या पगार दर महिन्याला तुम्हास भेटणार. प्रधानजी दर महिन्याला न चुकता हजामाकडे पगार पाठवायचे.
तात्पर्य - जो दुसऱ्यासाठी खड्डे खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो. दुसऱ्याबद्दल द्वेष करू नका तो पण आपल्याबद्दल द्वेष करणार नाही.