मनोरुग्ण नक्की कुठे?
मनोरुग्ण नक्की कुठे?
सकाळी आठच्या सुमारास, घर सोडले मनपा,मनपा वरून विश्रांतवाडी बसने आंळदी रोडवरील मेंटल काॅर्नर च्या,स्टॉपला उतरले तेथून साधारण दीड एक किमी अंतरावरील जातपडताळणी मुख्यालयात निघाले होते मी. गेल्या महीनाभरात पाचव्यांदा.तसा मुख्यालया समोरच बस स्टॉप आहे मात्र पुणे स्टेशनला जाणार्याच बस येतात तिथे. घरापासून गैरसोईचे व स्टेशन वरून दूरूचा वळसा त्यापेक्षा हा मार्ग सोइचा.मनपा बसही लगेच मिळते. मनपा वरून आंळदिला सुद्धा पुष्कळ बसेस असतात.त्यामुळेच इथे मेंटल काॅरनर वर,म्हणजे प्रादेशिक मनोरुग्णालया जवळ मी उतरते त्या कोपऱ्यापासुनच सुरू होणारी लाल गुलाबी मिश्र रंगाची उंच व पुढे दूरवर दिसणाऱ्या भींतीच्या कडेने जाताना दरवेळेस कसे असेल या भीतीपलीकडले जग !!हा प्रश्न स्वतालाच विचारते. भींतीसह सलग पुढे सरकत रहाते मी.भींत आय टी पार्क, काॅमरस झोन पर्यंत जाते तर....... भल्यामोठ्या ऊंचच्या ऊंच तीसेक, फुट लाल रंगाच्या भींतीवरही लोखंडी धारदार तांराचे गोल गोल वेटोळे असलेले कुंपण.त्यापलीकडे मनोरुग्ण म्हणजे चक्क वेडे ?रहातात. वेडयांची बंदिस्त दूनिया....लाल रंगाच्या दूरवर ....पुढे पुढे जाणार्या ऊंच भींतीमागचे वेड्यांचे जग........बाजुने सरळ रेषेत जाणारा मऊशार स्वच्छ, लख्ख, काळाभोर डांबरी मार्ग गुळगुळीत. शहाण्या माणसांसाठी बनविलेला.हिच शहाणी माणसं रस्त्यावर कुठेही निर्लज्जपणे थुंकतात केरकचरा फेकतात यांचे पाळीव प्राणी घाण करतात.....वेल एजुकेटेड,सुशिक्षित,लोकांच्या आयटीपार्क,रूबाबदार, झगमगीत,पाॅश कार्पोरेट जगाच्या इमारतींकडे जातोय ना!हा मार्ग मग लख्ख चकचकीत असणारचं! एकाद्या झोपडपट्टी, तत्सम स्लम वस्ती अथवा खेडयाकडे, आदीवासी पाडयाकडे जाणारा रस्ता असतो,का इतका चकचकीत मउशार लोणयासारखा! तसे तर,तो असतो का?हाच प्रश्न आहे. किमान जरा बरे मार्ग असते, तर वेळेत ऊपचाराअभावी कित्येक गर्भवतींच्या पोटातले अंकुर या जगात येण्याअधिच मृत्यूला कवटाळून इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला बळी पडले नसते. शेकडो रूग्णांनी केवळ वहातुकीचे साधन नाही,धड रस्ता नाही म्हणून उपचाराअभावी प्राण गमवले नसते. शाळेत जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून गाव खेडे पाडयावरच्या शेकडो विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागले नसते इ.इ. विचारासंह मी पुढे जाते.दुरवर डोळ्यांना दिसणारी ऊंचच उंच भींत वरील टोकदार तारेचे कुंपन का?वेडे तीसेक फुट सपाट भींतीवरून उड्या मारून पळुन जाऊ नयेत म्हणून!आणि तसा प्रयत्न केला जरी टोकदार,लोखंडी तारेमुळे तो असफल होईल यासाठी का?हसु च आले मला शहाणपणाचा आव आणून समाजात खुलेआम कितीतरी मुर्ख फिरतात.मलीन प्रतिमेचे कित्येक गुन्हेगार स्वच्छ, कडक कपडयात ताठ मानेने वावरतात.काळे कर्म करून लाखो करोडो रूपयांची संपत्ती जमवतात,त्यांच्यासाठी कोणते, कसले कुंपन असते ?अशा विचारांनी माझ्याच डोक्यावर परीणाम व्हायचा म्हणून क्षणात झटकून सावरले.पलीकडे रांगेत ऊभी,घनदाट डेरेदार विस्तारलेली वडाची झाडे. मधल्या काळयाभोर रस्त्याकडेच्या पदपथावरून छान गार दाट सावलीने ऊष्ण गर्दीतल्या प्रवासाचा शीन काही क्षणातच शोशुन घेतला. गर्द घनदाट विखुरलेल्या फांदया पानांनी उनं अजीबातच जाणवु दिले नाही ऊलट गारवा मोहवतो मनाला.भल्यामोठ्या भींतीच्या कडकडेने जताना अनेक विचारांनी मनं घेरलेय कसे असेल भींतीच्या पलिकडले जग?म्हणे मनोरुग्ण वेडे लोक, डोक्यावर परीणाम झालेले लोक रहातात पलिकडे. खरेतर शहाणे,अतीशहाणे कीतीतरी माणसिक रोगी अलिकडेच, मोकाट सुटलेले पहायला मिळतात. मुजोर, निगरगट्ट,निर्लज्ज विचारांची हिंस्त्र बुद्धीची टाळकी खुलेआम वावरतात इकडे.खुन दरोडे दंगली,माणसांची तस्करी लाचखोर,वृत्ती संपत्तीचा हव्यास,ती मिळविण्यासाठी कोणत्याही नीच पातळीला जाणारे, सुपीक शहाणे म्हणवून घेणारे सामाज विघातक मेंदू सर्रास पहायला मिळतात त्यांचा बुद्धय़ांक कसा कोणी मोजावा भ्रष्टाचार,लाच, लबाडी,चोरी गद्दारी करणार्यांचे डोके नक्की ठीकाणावर असते का?लहान लहान लेकरांचे शारीरीक, मानसिक शोषण, उमलत्या कळयांना कुस्करणारे,सैतान राजरोस फिरतात याच शहाण्या समाजात. स्त्रियांच्या अब्रूशी खेळणारे, पत्नीला निर्जीव संपत्तीचा भाग समजुन,शारीरीक लैंगिक मानसिक छळ करणारे नराधम मानसिक रूग्ण नव्हेत काय?धर्म धर्म करून आकडतांडव करणारे धर्माचे ठेकदार समजुन,धर्म रक्षणाचा बुरखा पांघरून सामिजिक धार्मिक भावना दुखावणे,दंगली घडवून समाजात फुट पाडणे, एक आपलाच समाज श्रेष्ठ बाकी सारेच शूद्र कनिष्ट दुर्जन असली भिकार मानसिकता असलेले विचार खरोखरच नीरोगी आहेत का?झगमगीत कार्यालयात बसून महागडया गाडयात फिरून महागड्या छानछोक कडक इस्त्रीच्या कपडयांमागे किती असभ्यता दडलेली असते हे समाजात कीतीजण पाहू शकतात. फुटकळ उच्च संस्काराचे ढोंग रचुन लज्जास्पद असंस्कृत कृत्यासाठी गरीब बेरोजगार लोकांचा बळी देणाऱ्यांना खरचं शहाणे म्हणावे का? धर्माचा डिंढोरे पीटताना त्याचं धर्माची शिकवण प्रज्ञा, शील करूना,अहिंसा अपरिग्रह, चारित्र्य, समता, बंधुता, सत्य ,सर्व धर्म समभावाचे आचरण,करणारे, स्त्रीला माता भगिनी मानुन आदर मान सन्मान जपणारे खरचं किती लोक दिसतात भोवताली?म्हणे समाज कसला समाज?कोणता समाज? नजरेचे वार शब्दांचे हत्यार घेऊनच वावरावे लागते या समाजात तरीही मुक्त जगणे सोपे आहे का?यापेक्षा ती भींतीपलीकडची निरागस दूनिया बरी जिथं माणसिक अपूर्णता आहे विचारक्षमता जराशी खुंटलीय बाहेरच्या जगाशी अनभिज्ञ स्वत्वाचे अस्तित्वाचे भान नाही आपल्याच विश्वात दंग आहेत ती माणसं मेदूला तान नाही स्वार्थ परमार्थ चांगले वाईट,तुझे माझे,खरे खोटे आपले परके जात धर्म धन दौलत लालसा,यांपासून अनभिज्ञ म्हणूनच कदाचित त्यामुळेच विचारक्षमता बरबटलेली नाही त्यांच्या मेंदूतून रचले जाणार नाहीत कपटी कुटील डाव त्यांच्या डोक्यावर परीणाम झालेत, ते वेडे, मनोरुग्ण, आहेत अलिकडच्या हुषार शहाण्या लोकांच्या,सभ्य शहाण्या समाजाच्या नजरेत.म्हणूनच ते बंदिस्त आहेत त्या भींतीपलीकडच्या विश्वात कैद आहेत.त्यातले काही ऊपचार घेत असतील काही बरे होऊन पून्हा या शहाण्या दुनियेत परततही असतील मात्र इथल्या शहाणे लोक इथला बुद्धिजीवी समाज ऊपचारानंतर बरे होऊन आलेल्या मनोरुग्णांना खरोखर समाज सहज स्वीकारतो का? आपल्यात मिसळवुन घेतो का ?की मानसानं शिवले म्हणून आपल्याच सहकार्याला टोचा मारून काही जमातीचे पक्षी जसे रक्तबंबाळ करतात तसे शब्दांच्या यातनेने मनं घायाळ करत असतील, असे अनेक प्रश्न सोबत घेऊन मी समाज कल्याण च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण, मंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या परीसरात असलेल्या कास्ट सर्टीफिकेट विभागात प्रवेश केला.
