Gauspasha Shaikh

Abstract Classics

3  

Gauspasha Shaikh

Abstract Classics

कागदाची होडी

कागदाची होडी

6 mins
178


नुकताच श्रावण महिना सुरु झाला होता.निसर्ग वसुंधरेवर हिरवळीची मुक्त उधळण करीत होता.सृष्टीच्या चराचारांमध्ये चैतन्य पेरणाऱ्या श्रावण मासात काव्या मात्र काहीशी उदासच होती.क्षण आनंदाचा असला तरीही तिच्या मनाप्रमाणे सर्व काही घडत नव्हते.तिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायची होती.परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ती या नोकरीवर रुजू व्हायला तयार झाली होती.रात्री अकरा वाजता मुंबईहुन त्यांनी प्रवासाला सुरुवात केली.खेड गेल्यानंतर काव्याच्या वडिलांनी काव्याला झोपेतून उठवले.वशिष्टीच्या तटाच्या एका बाजूने नागमोडी वळणे घेत सळसळत कोकण कन्या बेधुंद धावत होती.काव्या खिडकीच्या काचा उघडून थंडगार वाऱ्याची झुळूक श्वासात सामावून घेत होती. पहाटे चार वाजता ट्रेन चिपळूण रेल्वे स्थानकावर पोहोचली.काव्या आणि तिचे वडील ट्रेन मधून खाली उतरले.प्लॅटफॉर्मवर फारशी गर्दी दिसत नव्हती.पाण्याचे सूक्ष्म तुषार कुणीतरी जाणीवपूर्वक उडवल्यासारखा हलका हलका पाऊस पडत होता.काव्याचे अंग शहारले.तिने आपली छत्री उघडली आणि पाण्याचे छोटे छोटे डबके चुकवत,तोल सावरत चालू लागली.तिचे वडील दोन हातात बॅगा घेऊन भिजतच तिच्या मागे मागे येत होते.स्टेशनच्या मुख्य द्वाराजवळच लाल अक्षरात 'महाराष्ट्र शासन' लिहिलेली महिंद्राची गाडी दिसली. तिने तिच्या वडिलांकडे मागे वळून पाहिले,तसे ते भराभरा चालू लागले.वितेश धावतच गेला आणि काव्याच्या वडिलांच्या हातातील बॅगा घेऊन गाडीत आणून ठेवल्या.तो गाडीचा चालक होता.गाडी निघाली.बहाद्दूर शेख नाक्याला वळसा घालून बराच वेळ चालत राहिल्यानंतर गाडी थांबली.दोघेही वितेशच्या मागे मागे चालू लागले.वितेश त्यांना एका बंगल्यात घेऊन गेला.सगळे सामान ठेऊन वितेश परत निघाला.काव्या आणि तिच्या वडिलांचा सोफ्यावरच डोळा लागला.

       सकाळचे सात वाजून गेले होते.काव्या बाल्कनीत उभी होती.चोही बाजूने हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला तो परिसर आणि त्या डोंगरातून कोसळणारे पांढरे शुभ्र छोटे छोटे धबधबे पाहून तिच्या मनात चैतन्य स्फुरले होते.तिच्या बंगल्याच्या दोन तीन फर्लांग अंतरावरच एक स्वच्छ आणि संथपणे वाहत असलेला ओढा तिला दिसला.आजूबाजूला सुंदर सुंदर बंगले दिसत होते.सर्वत्र निरव शांतता होती.मुंबईच्या गोंगाटाचा लवलेशही तिथे दिसत नव्हता. रात्री धड दिसतही नसल्यामुळे तिला परिसराचा अंदाज आला नव्हता.पण आता सकाळचे ते मनोहर दृश्य पाहून ती रोमांचित झाली होती.

"किती सुंदर आहे हा परिसर !" काव्याचे वडील बाल्कनीतून ओढ्याकडे पाहत म्हणाले.

"हो ना!अगदी स्वप्नातल्या नगरीसारखा" काव्या म्हणाली.

"बरं,चल आटोप लवकर आपल्याला ऑफिसला जायचंय" काव्याचे वडिल मनगट वर करून घड्याळाकडे पाहत म्हणाले.

   सकाळचे दहा वाजले होते.चिपळूणच्या तहसील ऑफिसमध्ये लगबग चालू होती.गाडीचा आवाज येताच ऑफिसची सगळी मंडळी धावत बाहेर आली.गाडीच्या पुढच्या सीट वरून काव्या उतरली.सर्वांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सर्वांचे आभार मानत ती आपल्या कॅबिनकडे निघाली.कॅबिनच्या दारावरची पाटी पाहून तिथेच थबकली.काळ्या पाटीवर सोनेरी अक्षरांत लिहिलेले होते -

        काव्यांजलि म.शिरसे

तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी

         काही दिवसांनंतर काव्या आपल्या नोकरीत रमली होती.वडिल एक आठवडा राहून मुंबईला परत गेले होते.ऑफिसवरून परत आल्यावर संध्याकाळी ती बंगल्याच्या बाल्कनीतून दिसणाऱ्या त्या ओढ्याजवळ जाऊन बसू लागली.ओढ्याजवळ बसून एक असीम आनंदाची अनुभूती तिला मिळायची.एके दिवशी अशीच बसून ती ओढ्याचे सौंदर्य न्याहाळू लागली तेंव्हा तिच्या थोड्याच अंतरावर शांतपणे बसलेली एक गोड मुलगी तिला दिसली.काव्या तिच्या जवळ गेली.हलक्या भुरकट रंगाचे केस,गोरा रंग, लोभस डोळे आणि गुबले गाल असलेली ती मुलगी पांढऱ्या रंगाच्या चमकदार फ्रॉकमध्ये एखाद्या बाहुली सारखीच दिसत होती.

"इतका काय विचार करतेस गं परी?"काव्याने तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला.

त्या मुलीने डोकं वर करून पाहिलं आणि पुन्हा ओढ्याकडे पाहू लागली.

"नाव काय आहे तुझं?" काव्यानं पुन्हा प्रयत्न केला.

" प्रिशा नाव आहे तिचं " पाठीमागून एका स्त्रीचा आवाज आला.काव्याने मागे वळून पाहिले एक साठी ओलांडलेली महिला उभी होती.

"मी तिची आजी आहे " तिने बोलणे चालूच ठेवले.

" मी काव्या आहे.मी ..." काव्याचे वाक्य अर्धवटच राहिले.

" मला माहित आहे.तुला पाहते मी ऑफिसला जाताना " आजीबाई मध्येच बोलल्या.

"फारच शांत स्वभावाची दिसते प्रिशा " काव्या त्या गोड मुलीकडे पाहत म्हणाली.

"बाळा तू बस, आम्ही जरा त्या झाडाखाली बसतो" आजीबाईंनी प्रिशाला सूचना केली.

काव्या आणि आजीबाई थोड्याशा अंतरावरील एका झाडाखाली जाऊन बसले.

" प्रिशाचा मूळ स्वभाव असा नाही.ती खूप दंगा मस्ती करायची.तिच्या आईला ह्या ओढ्याचे फारच आकर्षण होते.ती दररोज संध्याकाळी प्रिशाला घेऊन येथे येऊन बसायची.खूप प्रेमळ स्वभावाची होती पण गेल्या वर्षी तिचा ब्लड कॅन्सर ने मृत्यू झाला."

काव्याला खूप वाईट वाटले.काव्याने प्रिशाकडे एक नजर टाकली.ती गुमसुम बसलेली होती.

"आम्ही सर्वजण हळू हळू सावरलो पण प्रिशा आपल्या आईला विसरू शकली नाही.ती दिवसरात्र तिच्या आठवणीतच राहते.तिची समजूत घालण्यासाठी तिच्या पप्पाने म्हटले कि तुझी आई ऑफिसच्या कामानिमित्त त्या कृष्णाकडे गेली आहे.येईल परत तिचे काम झाले की! आता ती दररोज आईच्या येण्याची वाट पाहत असते." आजीबाईच्या डोळ्यांत अश्रू तरळले.काव्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सांत्वन केले.

   काव्या घरी आल्यानंतर प्रिशाचाच विचार करत होती.तिला खूप उशीरा झोप लागली.दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांची ओढ्यावर भेट झाली.काव्या प्रिशाजवळ जाऊन बसली.तिने एक रंगीत आणि जाडजूड कागदाचा एक छोटासा गठ्ठा आणला होता.

" आपण कागदाची होडी बनवूया?" काव्या रंगीत कागदे तिच्यापुढे नाचवत म्हणाली.

प्रिशाने स्मित केले.काव्याने तिच्याकडे एक कागद दिला.काव्याप्रमाणे कृती करत प्रिशाने एक होडी बनवली.दोघींनी आपल्या होड्या ओढ्यात सोडून दिल्या.प्रिशाला खूप आनंद झाला.ती टाळ्या वाजवू लागली.परंतु थोड्या वेळानंतर पुन्हा गुमसुम झाली.

       काव्या आणि प्रिशाची आता रोजच भेट होत होती.दोघींची चांगलीच गट्टी जमली होती.त्यामुळे प्रिशाला एकटीला काव्यासोबत ठेऊन आजीबाई निघून जायच्या. परत जाताना काव्या प्रिशाला तिच्या घराच्या गेटजवळ सोडून जायची.ओढ्याच्या किनारी जाऊन बसण्याचा आणि कागदाची होडी बनवून ओढ्याच्या पाण्यात सोडण्याचा त्यांचा खेळ रोजच होऊ लागला. प्रिशाला पण काव्यासोबत खेळायला,बोलायला आवडू लागले होते.परंतु तिच्या आईचे विस्मरण तिला होतच नव्हते.ती नेहमी दुःखी आणि व्याकुळ दिसायची.एके दिवशी त्यांचा होडीचा खेळ चालू असतानाच प्रिशाची नजर वरच्या अंगाने येत असलेल्या एका कागदाच्या होडीवर पडली.

"ते बघ अजून एक होडी" प्रिशा किंचाळली.

 जवळ येताच काव्याने ती होडी अडवली.पिवळ्या रंगाच्या जाडजूड कागदाची ती होडी फारच सुंदर दिसत होती.त्या कागदावर काहीतरी लिहिलेले दिसत होते.काव्याने उत्सुकतेने त्या होडीची घडी उलगडली.

 " हे तर एक पत्र आहे कुणीतरी प्रियाचे प्रिशु साठी" काव्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.

" प्रिया माझ्या आईचे नाव आहे" प्रिशा आनंदात किंचाळतच म्हणाली.

काव्याने ते पत्र मोठ्याने वाचायला सुरुवात केली.

 " प्रिय प्रिशु,

      कशी आहेस तू? मला तुझी फार फार आठवण येते.मला माहीत आहे माझ्या अचानक जाण्याने तू माझ्यावर रागावली आहेस.पण मी तरी काय करू बेटा? कृष्णा मुरारीने मला अचानक बोलवून घेतले. त्यांनी एक नवीन महाल बांधायला घेतला आहे.इंटिरियर डेकोरेशन साठी त्यांनी माझी निवड केली आहे.तुला तर माहीतच आहे हेच तुझ्या आईचे काम आहे.हो ना ? मग आपल्या प्रिय कृष्णा मुरारींना मी नकार कशी देऊ शकले असते.त्यांच्या महालाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत मला परत येता येणार नाही बेटा.त्यामुळे माझी वाट पाहू नको.तुझ्या पप्पा आणि आजी आजोबांसोबत तू आनंदी राहा.

मी सदैव तुझ्या सोबतच आहे.

     

                                 तुझीच आई

                                    प्रिया...

प्रिशाचा आनंद गगनात मावत नव्हता.तिच्या डोळ्यांत विलक्षण चमक जाणवत होती.त्या दिवशी तिला तिच्या आईशी साक्षात संवाद साधल्याचा अनुभव आला.आता दररोजच कागदाची होडी येऊ लागली होती.काव्या प्रिशाला ते पत्र वाचून दाखवत होती.प्रिया पत्रातून कृष्ण देवाच्या महालातील गमती जमती सांगायची.ती खूपच दूर असल्यामुळे येऊ शकत नाही असे पण सांगायची.होडीच्या रूपातील पत्रवाचन आता नित्याचेच झाले होते.

         दिवसामागून दिवस जात होते.प्रिशा आता दहा वर्षांची झाली होती.आई सोबत नसल्याच्या दुःखातून आता ती सावरली होती. परंतु काही दिवसांपासून अचानक काव्याचे ओढ्यावर येणे बंद झाले होते.प्रिशाला फार एकटे एकटे वाटायचे म्हणून ती काव्याच्या घरी गेली.पण घराला कुलूप दिसले.ती अनामिक भीतीने शहारली! तिने शेजारी विचारपूस केली तेंव्हा कळले की काव्याची बदली झाली होती.काव्या पण तिच्या आयुष्यातून अचानक निघून गेली होती तिच्या आईसारखीच!

उदास मनाने ती नेहमीप्रमाणे ओढयाजवळ बसलेली होती.शांत वाहत असलेल्या पाण्यात तिला अचानक कागदाची एक होडी

येताना दिसली.प्रिशाच्या आशा पल्लवित झाल्या.होडी जवळ येताच अधीरतेने भराभरा घड्या खोलून वाचू लागली.

" प्रिय प्रिशु,

   कशी आहेस तू?मला माहीत आहे माझ्या अचानक जाण्याने तू माझ्यावर रागावली आहेस.पण खरं सांगू ? मी जाणीवपूर्वकच तुला न बोलता निघून आले.

              प्रिशा,आयुष्य हे श्रावण महिन्यासारखं रंगबिरंगी असतं. ऊन-पावसासारखा सुख- दुःखाचा लपंडाव चालूच असतो.कधी संकटांचे काळे ढग दाटून येतात तर कधी काळ्या ढगांना सारून निळ्या चमकदार आभाळातून सूर्य चकाकतो.माणसे आपल्या जीवनामध्ये येतात.आपण त्यांच्यावर खूप प्रेमही करतो पण मग अचानक ते आपल्या पासून दुरावतात.तेंव्हा आपण आपले आयुष्य उध्वस्त करून घ्यायचं नसतं,तर इंद्रधनुष्याप्रमाणे ते रंगीत करायचं असतं. काही गोष्टी आपल्या हातात मुळीच नसतात.तेंव्हा दुःख चघळीत बसण्याला काहीच अर्थ नसतो.श्रावण आपल्याला जगण्याचे तत्वज्ञान देऊन जातो.

तू समजदार आहेसच!

                                          तुझीच

                                          काव्या

 

प्रिशाच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिला कळून चुकले होते कि ती सगळी पत्रे काव्यानेच लिहिली होती आणि कुणाच्या तरी मदतीने

ती होडीच्या रुपात तिच्यापर्यंत पोहोचवत होती.प्रिशाला तिने दुःखातून सावरून जगण्याचा मंत्र शिकवला होता.प्रिशा ओढ्याच्या नितळ आणि संथ पाण्याकडे पाहत विचारांत मग्न झाली होती.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract