STORYMIRROR

Gauspasha Shaikh

Abstract

3  

Gauspasha Shaikh

Abstract

भानशा

भानशा

7 mins
14

मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं ते माझ्या शाळेत.नेहमीप्रमाणे सकाळी परिपाठ चालू होता तेंव्हा तो झुलत झुलत गेटमधून आत आला.पेसा हॉलच्या समोरील रिकाम्या जागेत आमचा परिपाठ व्हायचा.तो आला आणि बदामाच्या झाडाला टेकून उभा राहिला. पोपटासारखे पुढे बाक आलेले नाक,खोल गेलेले डोळे,विरळ होत चाललेले डोक्यावरचे मागे वळलेले केस, विरळच मिशा आणि विरळच पण थोडीशी वाढलेली दाढी अशी त्याची चेहऱ्याची ठेवणं होती.कृश शरीरयष्टी, काळा रंग,अंगात मळकट पांढरा शर्ट,निळी जीन्स,पायात छिन्नविच्छिन्न झालेले स्पोर्ट शूज,त्या शुजचे मोकळेच लेस मी पाहतच राहिलो.दाढीचे अर्धवट पिकलेले केस त्याचं वय सांगत होते.संपूर्ण परिपाठ होईपर्यंत तो अगदी शांत उभा होता.परिपाठ संपताच तो आमचे मुख्याध्यापक श्री दीपक सरांकडे आला आणि म्हणाला,

" गुर्जी मला रहिवासी दाखला दे "

दीपक सर अतिशय शांतपणे त्याला म्हणाले,

" चला ऑफिसमध्ये, देतो रहिवासी दाखला."

तो निमूटपणे दीपक सरांच्या मागे मागे ऑफिसकडे निघाला.

मी चमकलोच!शाळा कधीपासून रहिवासी दाखला देऊ लागली?असे मला वाटून गेले.मग मी ही जिज्ञासेपोटी त्यांच्या मागे मागे ऑफिसमध्ये गेलो. दीपक सरांनी त्याला बसायला खुर्ची दिली.तो लांब पाय करून खुर्चीत बसला.दीपक सरांनी कॉम्प्युटरच्या टेबलाच्या उजव्या खणातून एक कागद काढला.मी चपापलो! कारण त्या खणात आम्ही मिस प्रिंट किंवा एक्स्ट्रा प्रिंट झालेली निरुपयोगी कागदे ठेवत होतो.दीपक सरांनी त्या कागदाच्या एका कोऱ्या कोपऱ्यावर त्याचे नाव लिहिले.... भानशा.तो कागद त्यांनी हाताने फाडून ज्याच्यावर त्याचे नाव लिहिलेले होते तेवढा भाग त्याला दिला.त्याने तो कागदाचा तुकडा घेतला,थोडा वेळ त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि खुर्चीवरून उठून थेट ऑफिसच्या बाहेर निघाला.मी त्याला गेटमधून बाहेर पडेपर्यंत आश्चर्याने पाहत होतो.

        भानशा निघून गेल्यावर मी दीपक सरांना विचारले,

" ही काय भानगड आहे?"

तेंव्हा त्यांनी इट्रेस्टिंग गोष्ट सांगितली.

" हे भानशा भाऊ आहेत.ते आपले पालक आहेत.यांचा मुलगा आपल्या शाळेत शिकतो.तुमच्याच वर्गातच आहे तो.ते ताडीच्या संपूर्ण आहारी गेलेले आहेत."

" मग ही रहिवासी दाखल्याची काय भानगड आहे ? "

माझी जिज्ञासा अजूनही तृप्त झाली नव्हती.

" त्यांना दररोजच्या जीवनात काही दाखल्यांची गरज लागतच असते.हे महाशय चोवीस तास नशेत असतात.ह्यांच्याने काही काम होत नाही.त्यांची आई त्यांची असली सगळी कामे स्वतःच करून घेते.पण ह्यांना एखादेवेळी जबाबदारीचे भान आले की आपणही काहीतरी काम करून दाखवावे असे त्यांना वाटत असेल.पण कोणता दाखला कुठे मिळतो आणि तो कसा असतो हे त्यांना काही माहीत नाही त्यामुळे ते थेट शाळेत येतात आणि कोणत्याही दाखल्याची मागणी करतात.आम्ही पहिल्यांदा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की अमुक दाखला अमुक ठिकाणी मिळतो तिकडे जा पण ते काही ऐकायला तयार नव्हते. आमच्याशीच हुज्जत घालू लागले.दाखला तुमच्याकडेच मिळतो,सगळी लोकं तुमच्याकडेच दाखला घ्यायला येतात,मी बघत असतो.मला सगळे समजते,तुम्ही माझी अडवणूक करीत आहात असे म्हणू लागले. आम्हाला कामचुकार ठरवू लागले.मी त्यांची अवस्था समजतो त्यामुळे त्यांना समजूनही घेतो. पण त्यांच्यामुळे शालेय कामकाजात अडचण येऊ नये याचीही काळजी घ्यावीच लागेल असं मला वाटले.मग एके दिवशी मी ही अशी आयडिया करून बघितली आणि गंमत म्हणजे ती चालून गेली.तेंव्हापासून सगळं सुरळीत चालू आहे. आता भानशा भाऊ येतात,एखादा दाखला मागतात आणि आम्ही त्यांना असा दाखला देतो आणि ते निघून जातात."दीपक सरांनी रहस्याचा उलगडा केला.

 आता मला रहिवासी दाखल्याचे सगळे गुपित समजले.माझी जिज्ञासा तृप्त झाली.पण भानशा भाऊ माझ्या पक्के लक्ष्यात राहिले.

          दहा वर्षांच्या सेवेनंतर माझी बदली खराडपाडा शाळेवरून शिपाईपाडा शाळेवर झाली पण मला फारसे दडपण वाटत नव्हते. शाळा कशी असेल ? विद्यार्थी कसे असतील ? त्या शाळेवरील शिक्षक कसे असतील ? त्यांचे आपल्याशी जमेल का ? असे प्रश्न मला काही पडले नाहीत.कारण खराडपाडा शाळेपासून शिपाईपाडा शाळा जवळच होती आणि तेथील शिक्षकांना मी वैयक्तिक ओळखत होतो.परंतु तो पाडा मात्र माझ्यासाठी नवीन होता.तेथील लोकं कशी असतील?पालक मंडळी कशी असेल?आपला त्यांचाची खराडपाड्यातील लोकांप्रमाणेच सहज संवाद साधला जाईल का?असे विचार माझ्या मनात घोंगावत राहायचे आणि त्यातच ह्या पाड्यावरील पहिल्या माणसाशी माझी ओळख झाली ती भानशाशी!शाळेत ताडी,दारू वगैरे पिऊन येणारी लोकं मला फारशी आवडत नाहीत कारण माझ्या जुन्या शाळेचा अनुभव याबाबतीत फार कटू आहे.शाळेत अध्यापन चालू असताना अशी ताडी प्यायलेली माणसे त्या शाळेतही कधी मधी यायची आणि शालेय कामकाजात अडचण आणायची.पण त्यांना ताडी प्यायला दहा विस रुपये दिले की ती निघून जायची.मला वाटले भानशा भाऊंचा मुलगा माझ्याच वर्गात शिकतो म्हणजे कधी न कधी त्यांची गाठ माझ्याशी पडणारच.त्यांच्या मुलाचा वर्गशिक्षक म्हणून काही ना काही संवाद आमच्यात घडण्याची शक्यता होतीच.आता हे महाशय नेमके कसे आहेत हे मला माहीत नव्हते पण एखादा प्रसंग पडलाच तर दीपक सरांसारखी एखादी आयडिया आपल्याला करावी लागेल असा विचार मनात येताच मी हसलो.

       भानशा भाऊ असे दाखले घेण्यासाठी येतच राहायचे. मी पण आता भानशा भाऊला विविध दाखले द्यायला शिकलो.कधी रहिवासी दाखला,कधी जातीचा दाखला असे आमच्या अखत्यारीत नसलेले अनेक दाखले मी त्यांना दिले.ते ही मला आता ओळखू लागले.मी त्यांच्या मुलाचा वर्गशिक्षक आहे हे त्यांना एव्हाना माहीत पडले होते.मी एकदा वर्गात मराठीचे अध्यापन करीत होतो तेंव्हा भानशा भाऊंचा स्वारी आली.आता हे त्यांच्या मुलाच्या अभ्यासाच्या बाबतीत विचारतात की एखाद्या दाखल्याविषयी विचारतात याबाबत मी जरा गोंधळलो.ते वर्गाच्या खिडकीजवळ आले आणि खिडकीच्या सळईला धरून उभे राहिले.

 " काय काम काढलं भानशा भाऊ " मी शिकवणे थांबवून मध्येच त्यांना विचारले.

त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.ते वर्गात नजर फिरवू लागले.कदाचित ते त्यांचा मुलगा रमेशला शोधत असतील.रमेश नजरेला पडताच ते म्हणाले,

" गुर्जी हा माझा मुलगा आहे,ह्याला इंग्रजी शिकवा, ए बी सी डी एक्स वाय झेड "

" ठीक आहे " मी म्हणालो.

एवढंच बोलून ते ए बी सी डी एक्स वाय झेड म्हणतच निघून गेले.

" तुझे बापा कधीपासून ताडी प्यायला लागले रे? " मी रमेशला विचारले.

" माझी आजी म्हणते माझी आई मरली तेंव्हापासून हा दारू प्यायला लागला.माझ्या आईच्या मृत्यूनंतर त्याने कामावर जाणेही बंद केले.आता काही काम करत नाही त्यामुळे त्याच्याकडे पैसेही राहत नाहीत मग आजीकडून पैसे घेतो आणि ताडी पितो" रमेश खाली पाहत बोलला.

 " असं का ? तू काही चिंता करू नको आणि बापाची लाज बाळगू नको बेटा,कसाही असला तरी बाप हा बापच असतो,त्यामुळे त्यांचा आदर कर " मी रमेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले.

         भानशा ह्या प्रकरणाशी आता माझी खासच तार जुळली.इतर दारुड्या व्यक्तिंसारखा हा त्रासदायक नाही याची खात्री मला झाली.जीवनात पहिल्यांदाच मला कुणा नशेबाज व्यक्तीविषयी सहानुभूती पण वाटू लागली.आमची शाळा रोडला लागूनच आहे त्यामुळे सहजच येणारे जाणारे लोक दृष्टीस पडतात.त्यामध्ये भानशा भाऊ पण कधी मधी दिसायचे.कधी हातात एखादी मळकी पिशवी घेऊन तर कधी एखादी छडी घेऊन दिसायचे.एकदा तर आमच्या शाळेसमोर घर असणाऱ्या पाटकर भाऊंच्या घरी झाडे तोडण्यासाठी आलेल्या टीममध्ये मला ते दिसले.त्यांच्या सोबत कधी कुऱ्हाड मार,कधी दोरी ओढ अशी कामे करताना दिसले.प्यायलेले पण वाटत नव्हते.बहुतेक हे आता मिळेल ते काम करायला लागले असतील असे मला वाटले.मी मनोमन सुखावलो.मग दुपारची जेवणाची सुट्टी झाली तेंव्हा पाहतो तर काय? ते गायब!माझा भ्रमाचा भोपळा फुटला.आमची अशीच भेट अधून मधून होत राहायची पण काही खास असा संवाद कधी घडला नव्हता.हा माणूस आतून कसा असेल? त्याच्या व्यसनामुळे त्याने शरीर तर बर्बाद करून घेतलेच होते पण मनाचे काय? नितीमुल्यांचे काय? ह्या व्यसनाचे चोचले पुरविण्यासाठी त्याने स्वतःचे किती नैतिक अधःपतन करून घेतले असेल? आईकडून ताडी पिण्यासाठी पैसे घेताना त्याचा स्वाभिमान त्याला दुखावत असेल काय? त्याची आई त्याला रोज रोज पैसे देत असेल का?आई पैसे देत नसेल त्या दिवशी तो काय करत असेल?असे कित्येक प्रश्न माझ्या डोक्यात घोंघावत होते.

       शुक्रवारचा दिवस असेल बहुधा.मी वर्गात अध्यापन करीत होतो.इतक्यात भानशा भाऊ आले.ते खिडकीतून काहीतरी बोलतील असे मला वाटले पण ते थेट माझ्या वर्गात शिरले.त्यांच्या हातात एक कापडी पिशवी होती.

" काय काम काढलं भानशा भाऊ " मी त्यांना विचारले.

त्यांनी पिशवीतून एक पिकलेला फणस बाहेर काढला.

" गुर्जी हे फणस तू विकत घेशील का ? " त्यांनी काहीसे कचरत विचारले.

मी स्मित केलं.मला कळून चुकले की ह्या माणसाला ताडी पिण्यासाठी पैशांची गरज असेल म्हणून त्याने आज हा जुगाड केला आहे.

" मला फणसाची गरज नाही,कालच मी एक फणस विकत घेतला संजानवरून तोच अजून संपला नाही " मी खरंच बोललो.

" घे ना अजून एक, मुलं खातील तुझी" त्यांनी थोडा आग्रह केला.

" ठीक आहे.किती रुपये देऊ या फणसाचे?" मी त्यांना विचारले.

" शंभर रुपये"त्यांनी फणसाची किंमत सांगितली.

मी विचार केला अशी तर आपण भानशा भाऊंची कधीही मदत केली नाही.आयतीच संधी आली आहे तर त्यांची मदत करू.मी दिलेल्या पैशांचे ते काय करणार आहे हे माहीत असूनही माझ्या मनात असा विचार आला,याचे मला आश्चर्यही वाटले.मी खिशातून पाकीट काढले आणि पाचशे रुपयांची नोट त्यांना देत म्हटलं,

" द्या मला फणस"

" माझ्याकडे सुट्टे नाहीत,शंभरचीच एक नोट दे ना." ते म्हणाले.

" ठेऊन घ्या ही पाचशेची नोट.मी तुम्हाला ह्या फणसाचे पाचशे रुपये देतो"मी त्यांच्या हातात नोट कोंबत म्हटले.

" नाही नाही गुर्जी,ह्या फणसाची एवढी किंमत नाही,तू फार भोळा दिसतोस,तुला कुणीही फसवील."त्यांनी पाचशेची नोट वापस माझ्या हातात कोंबत म्हटले.

" मी स्वतःच ह्या फणसाची किंमत पाचशे करून देतोय तुम्ही घ्या ना" मी त्यांना आग्रह केला.

" नको गुर्जी,हे फणस पाचशे रुपयांचे नाही तर मी हे पाचशे रुपये कसे घेऊ शकतो,ही तर फसवणूक होईल."त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत म्हटले.

मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो.

" मी स्वखुशीने देतोय घ्या ना" मी पुन्हा आग्रह करून पाहिला.

" जे आपल्या हक्काचं नाही ते कधी घ्यायचं नाही,अशी माझी आई सांगते.शंभर रुपयाच्या फणसाचे पाचशे रुपये घेऊन मी आईला माझे तोंड कसे दाखवेन.मला शंभर रुपयेच द्या"त्यांनी हात जोडत म्हटले.

मी त्यांच्या स्वाभिमानावर फिदा झालो.त्यांचा नशेखोरपणा त्यांच्या नैतिक मूल्यांवर हावी झाला नव्हता.मी आनंदाने त्यांना शंभर रुपयाची नोट काढून दिली आणि तो फणस घेतला. भानशा भाऊ शंभर रुपयाची नोट घेऊन वर्गाबाहेर पडले.मी त्यांना गेटच्या बाहेर जाईपर्यंत पाहतच राहिलो.ते मला फणासासारखेच वरून काटेरी आणि आतून गोड भासत होते.

                                          ~ गौसपाशा शेख

                                                 पालघर


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract