STORYMIRROR

Gauspasha Shaikh

Children Stories Inspirational

4  

Gauspasha Shaikh

Children Stories Inspirational

ईदी

ईदी

9 mins
38


      कातरवेळ संपत आली होती. आकाशात अंधार दाटायला सुरूवात झालेली होती. सायरा,मुश्ताक आणि त्यांचा दहा वर्षाचा मुलगा अमीन अंगणात उभे होते.त्यांची नजर आकाशात भिरभिरत होती. बराच वेळ झाल्यावर अमीन ओरडला,

" अम्मी वो देखो चाँद"

सायरा आणि मुश्ताकने त्याने बोट केलेल्या दिशेकडे निरखून पाहिले.चंद्राची एक बारीक कोर त्यांना चमकताना दिसली.दोघांनी पण माशाल्लाहचा जप केला. एकमेकांना चाँद मुबारक म्हटले.सायराने ओढणी डोक्यायला गुंडाळली.मोठ्या दाराच्या बाहेर डोके काढत ओरडली.

" चाँद नजर आ गया,चाँद नजर आ गया "

सगळ्या मोहल्ल्याने सायराच्या अंगणाकडे धाव घेतली. त्यांच्या अंगणात मोठी गर्दी जमली.जो तो विचारू लागला,

" कहाँ है चाँद ?"

सायराने आकाशाच्या एका दिशेकडे बोट दाखविले. काही लोकांना चंद्रकोर स्पष्टपणे दिसली.ते माशाल्लाहचा जप करू लागले.त्यातील काही लोकांनी आपल्या लहान बाळाला उचलून घेतले. चंद्रकोर पाहिली आणि बाळाचा चेहरा पाहत माशाल्लाह म्हटले. पुरुष मंडळीनी चाँद मुबारक म्हणत एकमेकांची गळाभेट घेतली. काही लोकांना अजूनही चंद्रकोर दिसली नव्हती.ते चंद्रदर्शनासाठी आतुर झाले होते.त्यांची नजर आकाशात अजूनही संघर्ष करत होती.चंद्रकोर पाहिलेले लोकं त्यांना मार्गदर्शन करत होते.अखेर सर्वांना एकदाची चंद्रकोर दिसली आणि सर्वांनी एकमेकांना चाँद मुबारक,रमजान का चाँद मुबारक म्हटले.आता महिनाभर रोजे धरायचे आणि अल्लाहची भक्ती करायची असे एकमेकांना आनंदाने म्हणत मुश्ताकच्या अंगणातील गर्दी हळू हळू पांगली.आज पहाटे पहिली सहेरी होणार होती त्यामुळे मुश्ताक आपल्या सायकलला टांग मारून बाजारला निघाला.सायराने सहेरीसाठी लागणाऱ्या भांड्याकुंड्यांची,मसाल्यांची व्यवस्थित मांडणी सुरू केली.अमीन आपल्या अभ्यासाला लागला.काही वेळाने मुश्ताक सहेरीसाठी आवश्यक साहित्य घेऊन परतला.सर्वांनी मिळून रात्रीचे जेवण केले.मुश्ताक तराविहच्या नमाज साठी निघून गेला.चंद्रदर्शनानंतर घरातील वातावरण अतिशय उत्साही झाले होते.उद्यापासून आता महिनाभर सहेरी आणि इफ्तारची मज्जाच मज्जा म्हणत अमीन घरभर नाचू लागला. ईशांची नमाज पठण करून अमीन आणि सायरा झोपी गेले.

         पहाटे तीन वाजता सायरा उठली आणि स्वयंपाक सुरू केला.स्वयंपाक झाल्यावर अमीन आणि मुश्ताकला उठवले. इतक्यात बाहेरून इस्माईल चाचाची आरोळी ऐकू आली,

" रोजादारों ...सईरी करो उठो ....."

आरोळी ऐकताच अमीन त्यांना पाहायला घराबाहेर धावत सुटला.लांब पांढरी दाढी,अंगात कुर्ता पायजमा,एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात एक छोटीशी काठी पाहून अमीन आनंदला.असे तो दरवर्षी करायचा.इस्माईल चाचांनी अमिनला पाहून म्हटले,

" ऊठ गए क्या बेटा सब लोग ?"

" हाँ ऊठ गए " अमिनने त्यांना उत्तर दिले.

इस्माईल चाचा आरोळी देत पुढे निघून गेले

सायराने दस्तरख्वान सजवले.सर्वांनी दुआ पठण करत जेवायला सुरूवात केली.मुश्ताकने रात्री आणलेले मटण,बाजरीची भाकरी आणि दही असा मेन्यू होता.

" रमजानच्या सहेरी आणि इफ्तारीचा महिनाभरातील खर्च बराच होईल,झाली का पैशांची सोय ?" सायराने तोंडात घास घेत म्हटले.

" मी कालच उचल रक्कम घेतली आहे माजीद शेठकडून" मुश्ताकने तोंडात घास घोळवत म्हटले.

" जाईल का महिना त्या रकमेत" सायराने शंका व्यक्त केली.

" जाईल बहुतेक,घालवू आपण" मुश्ताकने निर्धार व्यक्त केला.

" रमजानचा महिना तर निघून जाईल,मग ईदच्या खर्चाची जोड कशी होईल"सायराने अमिनच्या ताटात रस्सा वाढत म्हटले.

" ईसाक भाईंशी बोलून बघतो,ते करतील मदत " मुश्ताक विचार करत बोलला.

जेवण झाल्यावर तिघेही अंगणातील खाटेवर जाऊन बसले.हवेतील गारवा त्यांना सुखावत होता.इतक्यात मस्जिदवरील लाऊडस्पीकर वरून सूचना देण्यात आली.

" सहेरी का वक्त खत्म होने मे दस मिनट बाकी है"

 सूचना ऐकून सायरा खाटेवरून उठली.चहा टाकला.मुश्ताक आणि सायराने चहा पिला.चहाचा कप ठेवताच मस्जिदच्या लाऊडस्पीकर वरून पुन्हा एक सूचना आली.

" सहेरी का वक्त अब खत्म हुआ"

तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.आज त्यांचा पहिला रोजा होता.

         मुश्ताक माजीद भाईंच्या किराणा दुकानावर काम करायचा. त्याची पत्नी सायरा गृहिणी होती पण रमजान ईद चांगली साजरी व्हावी म्हणून ती कामाच्या शोधात होती.तिने शेजारच्या महेमुदाकडे याबाबत विचारणा केली.महेमुदाने तिला अफजल भाईंच्या बेकरीमध्ये टोस्ट पॅकेजिंग करण्याचे काम आहे असे सांगितले.सायराने मुश्ताकशी सल्लामसलत करून बेकरीमध्ये काम करायचे ठरवले.ती रोज कामावर जाऊ लागली.दिवस सरत होते.रमजानचे पंधरा रोजे सरले होते.दररोज मुश्ताक इफ्तारी आणायचा.आजची इफ्तारी तिने आणायचे ठरवले.चार वाजता तिचे काम संपायचे.काम संपल्यावर ती बाजारात गेली.अर्धा किलो पेंड खजूर,एक मोठे टरबूज,छोटेसे खरबूज,अर्धा डझन संत्री,एक डझन केळी घेतली आणि घरी आली.घरी पोहोचताच स्वयंपाक सुरू केला.तोपर्यंत इफ्तारची वेळ होत आली होती.तिने दस्तरख्वान सजवला.बाजारातून आणलेली फळे व्यवस्थित चिरून ठेवली.तेवढ्यात मुश्ताक घरी आला.वुजु करून तो दस्तरख्वान समोर येऊन बसला.अमीन घरातच अभ्यास करत बसला होता.तो ही आला आणि दस्तरख्वान समोर येऊन बसला.सायरा पण वुजू करून आली.ते तिघेही दस्तरख्वानच्या गोल बसले.मस्जिदमधून इफ्तारची वेळ झाल्याची घोषणा झाली.

बिस्मिल्ला म्हणत तिघांनीही खजूर तोंडात घातला.त्यानंतर फळांचा आस्वाद घेतला.दिवसभर पाण्याचा एक घोटही न घेतलेल्या अमीनला इफ्तार करण्यात फार आनंद वाटत होता.मुळात दिवसभर उपवास करणे,संयम ठेवणे आणि संध्याकाळी आई वडिलांसोबत इफ्तार करणे त्याला खूप आवडायचे. इफ्तारच्या वातावरणाने तो भारावून जायचा.रमजान हा फक्त महिन्याभरापुरता का असतो?तो वर्षभर का नसतो?असे त्याला वाटायचे.त्याने शांतपणे इफ्तार केला आणि वडिलांसोबत मगरीबची नमाज पठण करायला निघून गेला.

    मगरीबची नमाज पठण करून मुश्ताक आणि अमीन घरी आले. सायराने स्वयंपाक करूनच ठेवला होता. तिघेही जेवायला बसले.

" आज मला अफजल भाईंनी पंधरा दिवसांची मजुरी दिली आहे.ठेवून घ्या.उद्या ईदसाठी कपडे खरेदी करायला जाऊ" सायराने काही रक्कम मुश्ताकपुढे करत म्हटले.

मुश्ताकने डाव्या हातानेच ती रक्कम घेत खिशात ठेवली.

" अम्मी मला ह्या ईदला दोन ड्रेस पाहिजेत " अमीनने मध्येच घास थांबवत म्हटले.

" दोन ड्रेस? ते शक्य नाही अमीन" सायराने अमीनला दरडावले.

" मला पाहिजे " अमीन अडून बसला.

" बेटा, पैसे झाडाला लागत नाहीत, आपण अशी चैन करू शकत नाही,माणसाने आपली परिस्थिती पाहून वागावे" मुश्ताकने हात धुवत म्हटले.

" मग मी स्वतः पैसे कमवून घेईन " अमीन ठाम होता.

" अगोदर मोठा हो,पैसे कमाव आणि घे दोन दोन ड्रेस स्वतःला" सायराने मुश्ताकची साथ देत म्हटले.

" मला ह्याच ईदला पाहिजेत दोन ड्रेस " अमीनने निर्धार व्यक्त केला.

" एवढीच घाई आहे तर उद्यापासून चल माझ्या बरोबर कामाला " सायराने दस्तरख्वानवरून भांडी उचलत म्हटले.

" हो येतो,खरंच येतो अम्मी "अमीनला ही आयडिया भारी वाटली.

" असा हट्ट बरा नाही बाळा,तुझं काम करण्याचं वय आहे का हे?" मुश्ताक अमीनला समजावत म्हणाला.

" नाही,येऊ द्या त्याला कामाला,तिथं भट्टी जवळ बसून टोस्ट भरताना किती घाम निघतो,कशी तहान लागते आणि रोजा असल्याने पाणी पिता येऊ न शकल्यामुळे कशी घुसमट होते हे अनुभवू द्या त्याला"सायरा रागात बोलली.

"काय बोलतेस तू सायरा,शाळेला जाऊ दे त्याला" चर्चेला गंभीर वळण लागत असल्याचे पाहत मुश्ताक मध्येच बोलला.

" शाळा करून काम करेन ना मी" अमीन वेगळ्याच उत्साहात बोलला.

" सोप्प वाटतंय का तुला शाळा करून काम करणं?"मुश्ताकने अमीनला प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हटले.

" सोप्प नसेल तरी मी करीन" अमीन हट्टालाच पेटला होता.

" त्याला येऊच द्या आता कामाला,त्याला कळू द्या पैसे कमावण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते" सायरा झटक्याने दस्तरख्वान उचलत म्हणाली.

" जाऊ दे, घेऊ आपण दोन ड्रेस त्याला,आपल्या कापडात थोडी ऍडजस्टमेंट करू" मुश्ताकने सायराचा आणि अमीनचा वाद मिटविण्याचा प्रयत्न करून पाहिला.

" त्याला आपली परिस्थिती समजून घ्यायची ना

ही ना? मग होऊ द्या ना त्याला थोडे कष्ट, मगच अक्कल ठिकाणावर येईल त्याची" सायरा अमीनकडे पाहत म्हणाली.

   सायरा इरेला पेटली होती.तिचा हा अवतार मुश्ताकला माहीत होता पण अमीन असा हट्ट का करतोय हे त्याला समजत नव्हते.तो अत्यंत समजदार मुलगा आहे हे तो जाणत होता.चर्चा थांबविण्यासाठी त्याने सायराचे म्हणणे मान्य केले.फक्त एक ड्रेस घेण्यापुरते पैसे मिळाल्यावर काम सोडण्याच्या अटीवर त्याने अमीनला काम करण्याची परवानगी दिली.दुसऱ्या दिवशी सगळे मिळून कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारात गेले.मुश्ताकच्या शेटने त्याला सुट्टी दिली होती त्यामुळे सगळा दिवस त्यांच्याकडे.अमीनला दोन ड्रेस घेण्याविषयी मुश्ताकने सायराला विणवून पाहिले पण काही उपयोग झाला नाही.सायरा तो एक्सट्रा ड्रेस त्यानेच स्वतः घ्यावा ह्या मतावर कायम होती त्यामुळे अमीनला एकच ड्रेस घेतला. बाजारात तोबा गर्दी होती.तिघांचे कपडे घ्यायला त्यांना संध्याकाळ झाली.

      अमीन दररोज संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत कामाला जाऊ लागला.रमजानचे जादुई दिवस संपत आले होते. चाँद रात्रीला अमीनला त्याची मजुरी मिळणार होती.तो चंद्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहू लागला.अखेर चंद्रदर्शन झाले.सगळा मोहल्ला खुश झाला.उद्या ईद साजरी होणार म्हणून सगळे खुश होते.अमीन मात्र मजुरी मिळाली म्हणून खुश होता. त्याने लगेच मुश्ताकला त्याच्यासोबत बाजारात चलण्याची विनंती केली.

" उद्याच्या ईदसाठी तर आहे ना ड्रेस,दुसरा नंतर घेऊ" मुश्ताकने सहजपणे बोलला.

" मला आजच ड्रेस घ्यायचा आहे, चला ना माझ्यासोबत" अमीनने चेहऱ्यावर आतुरता दाखवत म्हटले.

" चाँदरातला किती गर्दी असते बाजारात माहीत आहे ना?" मुश्ताकने अमीनचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.

" होऊ द्या ना उशीर, चला ना माझ्यासोबत" अमीनने हट्ट केला.

" ठीक आहे चल " मुश्ताकने अमीनचा हात धरत म्हटले.

पिता पुत्र ड्रेस खरेदीसाठी बाजारात गेले.चाँदरात असल्यामुळे रात्रीचा दिवस झालेला होता.सगळीकडे चकाचक लायटिंग होती.ऐनवेळी खरेदी करणाऱ्यांनी एकच झुंबड केली होती.ड्रेस खरेदी करून यायला दोघांना रात्रीचे दहा वाजले.

   ईदचा दिवस उजाडला.सगळ्यांनी पहाटे उठून फजरची नमाज पठण केली.आंघोळी करून नवीन कपडे घातले.अत्तर लावला.सायरा शिरखुर्मा बनविण्यात व्यस्त झाली. मुश्ताक ईदगाहला जाण्यासाठी निघाला.त्याने अमीनला आवाज दिला पण अमीन घरात नव्हताच!दोघांचीही नजर चुकवून तो घराबाहेर कधी गेला त्यांना कळलेच नाही.मुश्ताकने थोडा वेळ त्याची वाट पाहिली.ईदगाहला जाण्यासाठी उशीर होतोय म्हणून शेवटी एकटाच घराबाहेर पडला. मोहल्ल्यातील सगळे पुरुष,लहान मुले एकत्रच ईदगाहकडे निघाले.घोळक्यातून चालताना मुश्ताकची नजर अमीनला शोधत होती पण तो त्या घोळक्यातही नव्हता.अचानक तो मकबूलच्या घरात शिरताना त्याला दिसला.त्याच्या मनात धस्स झाले.तो मकबूलच्या घरात कशाला गेला असेल?आता लोकं त्याला पाहतील तर काय बोभाटा करतील?असे विचार त्याच्या डोक्यात घोळू लागले. घोळक्यातील कुणीही काहीच बोलला नाही म्हणजे अमीनला मकबूलच्या घरात जाताना कुणी पाहिलं नाही.आता बाहेर पडताना कुणी पाहू नये म्हणजे झालं!असा विचार करून त्याला थोडे हायसे वाटले.मुश्ताक आपल्या विचारांच्या तंद्रीतच होता.इतक्यात घोळक्यातून एक जण ओरडला.

" लाहौल बिलाकुव्वत,हा मुलगा मकबूलच्या घरात काय करतोय?"

मुश्ताक हादरला.व्हायला नको होते तेच झाले होते.सगळा घोळका अचानक थांबला आणि मकबूलच्या घरातून बाहेर पडणाऱ्या अमीनकडे डोळे वटारून पाहू लागला.घोळक्याने आपल्याला पाहिलंय हे लक्षात येऊन अमीन भेदरून मकबूलच्या दारातच उभा राहिला.

" तुमचा मुलगा मकबूलच्या घरी काय करतोय मुश्ताक,त्याला माहित नाही का की हे घर आपल्या मोहल्ल्याने बहिष्कृत केलेले आहे?" रफिक भाईंनी मुश्ताककडे पाहत म्हटले.

" मला काहीही माहीत नाही,मला पण आश्चर्य वाटतंय "मुश्ताक घाबरत म्हणाला.

" चला विचारू त्यालाच" घोळक्यातुन एक जण बोलला.

सगळे मकबूलच्या घराकडे वळले.मकबूलच्या दारात उभा असलेल्या अमीनपुढे जाऊन उभे राहिले.

" काय करतोस इथे अमीन" रफीक भाईंनी अमीनला दटावत म्हटले.

अमीन काहीच बोलला नाही.मान खाली घालून उभा राहिला.

" बोलता क्यूँ नहीं कमबख्त" मुश्ताकने अमीनवर हात उगारत म्हटले.

" ये मेरे लिये ड्रेस ले आया था, कहेता है ईदी है मेरे लिये" मकबूलचा दहा वर्षांचा मुलगा रहीम घराबाहेर पडत म्हणाला.

सगळे अवाक झाले.काय बोलावं हे कुणालाच सुचेना.

" फार छान काम केलेस बेटा तू,जे करण्याची हिंमत आमच्यात नव्हती ते तू करून दाखवलंस,शाब्बास!"घोलक्यातून समोर येत बुजुर्ग इस्माईल चाचा बोलले.

" हे काय म्हणताय इस्माईल चाचा? मोहल्ला कमेटीने ह्या कुटुंबाला बहिष्कृत केलेले आहे ना?तुम्ही पण होतात ना त्या मीटिंगमध्ये" रफिक भाईंनी इस्माईल चाचाकडे डोळे रोखत म्हटले.

" त्यावेळी मी शांत होतो पण आता शांत राहणार नाही?"इस्माईल चाचा निर्धाराने म्हणाले.

मकबूलच्या घरासमोर काहीतरी घडतंय म्हणून मोहल्ल्याच्या स्त्रियाही तेथे जमा झाल्या.अमीनची आई पण आली.तिला सगळी हकीकत समजली.ती अमीनच्या चिंतेत व्याकूळ झाली.

" मकबूलला आतंकवादी म्हणून पोलिसांनी पकडून नेलंय हे आठवतंय ना तुम्हाला" रफिक भाईंनी इस्माईल चाचाला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला.

" सगळं आठवतंय रफिक. संपूर्ण रमजान महिन्यात सहेरीसाठी तुम्हा सर्वांना जागे करण्यासाठी मी मोहल्ल्यात पायपीट करताना ह्या घरासमोरून जायचो.मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेत ह्यांचे हाल. आपण सगळ्यांनी फक्त महिनाभर रोजे केलेत पण मकबूलच्या बायकोने आणि पोराने वर्षभर रोजेच केलेत रे! " इस्माईल चाचा भिजल्या डोळ्याने बोलत होते.

जमलेल्या गर्दीतून कुणीच काही बोलत नव्हता.सगळ्यांना अपराध बोध होत होता.

" मकबूल निघाला आतंकवादी,यात त्याच्या बायको आणि पोराचा काय दोष आहे.मकबूलला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि तो शिक्षा भोगतोय पण त्याचे कुटुंब कोणत्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय? का ह्या निष्पाप जीवांना आपण बहिष्कृत केलंय? आम्ही मकबूल सारखे नाहीत हे जगाला दाखविण्याच्या दबावाखालीच आपण त्यांना बहिष्कृत केलंय ना? किती स्वार्थीपणाने वागलोय आपण?त्याच्या कुटुंबासोबत अशी क्रूरता करण्याचा आम्हाला काय अधिकार आहे?" इस्माईल चाचा डोळ्यांच्या ओल्या कडा पुसत म्हणाले.

गर्दीतला प्रत्येकजण आत्मपरीक्षण करू लागला.

" तुमची हृदये कठोर झाली असतील तर तुमच्या बायकांना, आयांना आणि बहिणींना विचारून बघा.एका महिलेवर आणि निष्पाप मुलावर होत असलेला हा अन्याय त्यांना बघवतोय का?आपण घेतलेला बहिष्काराचा निर्णय त्यांना पटलेला आहे का?" इस्माईल चाचा स्त्रियांच्या गर्दीकडे पाहत म्हणाले.

स्त्रियांच्या घोळक्यात धुसफुस झाली.ओढणी तोंडाला लावत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती.

" आज अमीनने फक्त राहिमलाच ईदी दिली नाही तर ह्या कुटुंबाच्या काळजीची ईदी आपल्याला दिली आहे.ह्या समंजस मुलाच्या पवित्र कृतीचा स्वीकार करा!मकबूलच्या कुटुंबाचा स्वीकार करा!" इस्माईल चाचा पोट तिडकीने बोलत होते.

स्त्रियांच्या घोळक्यातून अमीनची आई सायरा बाहेर पडली.तिने डोळे पुसले आणि थेट मकबूलच्या घरात शिरली. घरातील खाटेवर रडत बसलेल्या मकबूलच्या बायकोला बाहेर आणले.

"नसीमाला आणि रहिमला मी माझ्या घरी घेऊन जात आहे.आम्ही सगळे मिळून ही ईद साजरी करू" सायराने आपला निर्धार व्यक्त केला.

" फक्त तुम्हीच नाही तर सगळा मोहल्ला आज मकबूलच्या घरी ईद साजरी करेल. चला तयारी करा महिलांनो सगळ्या मोहल्ल्याचा शिरखुर्मा आज मकबूलच्या घरी शिजेल" गर्दीतून बाहेर पडत मोहसीन भाई बोलले.

काही महिलांनी बाजारातून नवीन ड्रेस आणून नसीमाला दिला. काही महिलांनी तिच्या घरी भांडी,दूध,साखर,मेवा वगैरे आणून भल्या मोठ्या पातेल्यात शिरखुर्मा बनवायला सुरूवात केली. सायराही कामात जुंपली.काम करता करता ती फक्त अमीनकडे पाहत होती.अभिमानाने तिचा उर भरून आला होता.

                                                


Rate this content
Log in