Gauspasha Shaikh

Drama Crime

3  

Gauspasha Shaikh

Drama Crime

दोम दोम दावल मलिक

दोम दोम दावल मलिक

16 mins
170


"अम्मी,दे ना थोडासा और" अलीने एकच तगादा लावला होता.

" जित्ता दिया उत्ता खा, मसाले मे कम पडता फिर "

आईने नकार दर्शवला.तसा अली दाळवा खिशात टाकून मुकाट्याने घरासमोरच असलेल्या मैदानावर खेळायला निघून गेला.

   जुबेदा मसाला वाटायला घ्यायची तेंव्हा अली तिच्या भोवतीच घुटमळायचा.त्याला दाळवा खूप आवडायचा.पण जुबेदा त्याला जास्त दाळवा देऊ शकत नव्हती.एक तर मसाल्याचा तोल बिघडण्याची भीती असायची शिवाय आठवडी बाजारातून फक्त गुरुवारीच दाळवा घरी यायचा.जुबेदाचा पती हुसेन आठवडी बाजार करायचा तेंव्हाच घरात दाळवा बघायला मिळायचा. हे अलीला पण आता कळले होते.तो बाजार करून परतणाऱ्या हुसेनची वाटच पाहत राहायचा.पण बाजारातून आणलेले पदार्थ काटकसरीने वापरून आठवडाभर पुरवायची जबाबदारी जुबेदाचीच होती.

         हुसेनची आई हलीमा एक कामसू वृत्तीची स्त्री होती. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तिच्या प्रगाढ जीवणानुभवाची साक्षच देत होत्या.आता वय झालं म्हणून घरी बसून कुटुंबावर ओझं होण्याची तिची नितीच नव्हती. साठीच्या आसपास वय झालेलं असलं तरीही ती शेतात मजुरीच्या कामाला जायची.गव्हाळ रंग,मध्यम उंची आणि काटक बांध्याची हलीमा अत्यंत स्वाभिमानी आणि कडक शिस्तीची बाई म्हणून गावात प्रसिद्ध होती.लहान लहान तीन मुले आणि दोन मुली पदरात टाकून तिचा नवरा घर सोडून निघून गेला होता.तो का निघून गेला याविषयी ती फारशी कोणाची बोलत नसायची.तिच्या नवऱ्याचा कोणी उल्लेख जरी केला तर ती फार चिडायची त्यामुळे फारसं कोणी तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारीत नसे.नवरा घर सोडून गेल्यानंतर तिने आपल्या मुलांचा खंबीरपणे सांभाळ केला होता.तिची दोन मुलं आंध्रप्रदेशमधील एका विटभट्टीवर सहकुटुंब कामावर होती.अधून मधून सणासुदीला किंवा विट भट्टीत काम बंद असेल तेंव्हा ते घरी यायचे.तिच्या दोन्ही मुलींची लग्ने झालेली होती.हुसेन सगळ्या भावंडांत लहान होता. तो गावातीलच एका गवंड्याच्या हाताखाली मजुरीच्या कामाला जायचा.त्याला दर गुरुवारी मजुरीचा हप्ता मिळायचा. गुरुवारी सकाळी लवकरच मिस्त्रीच्या घरी जाऊन हुसेन पैशाचा हिशोब करायचा आणि मिळालेल्या पैशातून बाजार करायचा.आठवडाभर पुरेल असा भाजीपाला,किराणा वगैरे घेऊन तो सूर्य मावळण्याच्या आत घरी यायचा.घरी जेमतेम चारच माणसे असून सुद्धा तुटपुंज्या मजुरीमुळे नेहमीच चणचण भासायची.

    हुसेनच्या एकुलत्या एक मुलावर,अलीवर हलीमाचा फार जीव होता. बारा वर्षाच्या अलीला पण आपल्या आजीचा फार लळा होता.तो तिला दादी म्हणायचा.शेतात मजुरी करून थकून भागून घरी आल्यावर हलीमा अंगणात खाट टाकून बसायची. रात्रीची जेवणे झाल्यावर त्याच खाटेवर अंथरून टाकून झोपायची.अली तिच्या सोबतच झोपायचा.आकाशातील चांदण्या न्याहाळत थंडगार हवेत झोपायला दोघांनाही फार आवडायचे.त्यांच्या घरापुढूनच छोटीशी पायवाट गावात जात होती.गावात जाण्यासाठी तो एक जवळचा मार्ग असल्यामुळे खालच्या आळीचे लोक तिथून नेहमी ये जा करायचे.त्या वाटेवरून येणाऱ्या जाणाऱ्या बायकांशी बोलत हलीमा आपला फावला वेळ घालवायची.शिवाय समोरच्या मैदानावर खेळणाऱ्या अलीवरही ती नजर ठेवायची.शाळा सुटल्यानंतर दप्तर खुंटीला अडकवून अली मैदानावर खेळायला जायचा.

      आज अम्मीने दिलेला दाळवा खिशात टाकून अली नेहमीप्रमाणे थेट मैदानावर निघाला.अफजल पण तिथे खेळायला यायचा.ते दोघे वर्गमित्र तर होतेच शिवाय घनिष्ठ मित्रही होते.अफजल अलीच्या शेजारीच राहायचा.अम्मीने दिलेला दाळवा अलीला कितीही कमी वाटला तरी तो अफजल सोबत मिळूनच खायचा.दोघांनाही दाळवा खाण्याची चटकच लागली होती.

  " दालवा भौत म्हंगा रहेता क्या रे,अफजल ?"

अलीने अफजलच्या हातात दाळव्याचे थोडेसे दाणे टाकत विचारले.

"अपने वास्ते तो हर चीज महंगीच रहेती अली,स्कूल में इंट्रोल होता तो सब बच्चे सामने के दुकान पे भागते मगर हम तो क्लासमेच बैठके रहेते" अफजल नाराजीच्या सुरात म्हणाला.

" कबी अपने कु दिल भरके दालवा खाने कु मिलिंगा क्या रे ?" अलीने आभाळाकडे डोळे रोखत म्हटले.

" मैंने खाया था एक बार " अफजलच्या चेहऱ्यावर उमटलेली आनंद छटा स्पष्ट जाणवत होती.

" सच में? तेरी अम्मीने दिया था इत्ता दालवा ?" अलीने आश्चर्य व्यक्त केले.

"नई,अम्मीने नई दिया था,कब्रिस्तान में खाया था मैंने" अफजलने स्पष्ट केले.

" कब्रिस्तान में...? वहाँ कैसे दालवा मिल सकता" अलीची जिज्ञासा जागृत झाली.

" गाँव में जब भी कोई मर जाता तो दूसरे दिन सुबह सब मेहमान जियारत करने जाते कब्रिस्तान में,वहाँ फातेहा पढ़ने के बाद दालवा और खड़ीशक्कर बाटते.मई गया था एक दिन अब्बू के साथ,तब बहोत दालवा खानेकु मिला था" जिभेवर स्वाद रेंगाळल्यागत अफजल बोलत होता.

" बहोत मजा आया होएंगा ना ?" अलीच्या डोळ्यासमोर दाळव्याचे दाणे नाचत होते.

" हाँ बहोत,मगर फिर कभी ऐसा मौका नई मिला " अफजलचा स्वर उदासवाणा होता.

" जो मर जाते हैं उन सबकी जियारत करते क्या रे ?" अलीला गहन प्रश्न पडला होता.

"हाँ फिर " अफजलने खांदे उडवत उत्तर दिले.

    दोघांची चर्चा चांगलीच रंगात आली होती.पण समोरून हलीमाचा आवाज त्यांच्या कानावर आदळला.

" अली...अँधेरा पड़रा आओ घरकु जल्दी"

तसे दोघेही धावत घराकडे निघाले.

     काही दिवसानंतर अफजल रात्री झोपण्याच्या वेळेला अलीच्या घरी आला. त्यावेळी हलीमा अंगणातील खाटेवर अंथरून टाकत होती.दरवाज्याच्या बाहेरूनच अफजलने दबक्या आवाजात अलीला हाक मारली.अली बाहेर आला.

" क्या रे अफजल ..?" अलीने विचारले.

" वो हबीब नाना थे ना उनकी मौत हो गयी आज " अफजलने त्याच्या घरी चाललेली चर्चा ऐकली होती.

 " कैसे ?" अलीने सहजच विचारले.

" अरे वो जरुरी नई है " अफजल झटक्याने बोलला

"फिर" अलीने आश्चर्य व्यक्त केले.

"आज उनके मौतां हुए" अफजलच्या कानात कुजबुजत होता

"तो " अलीला ह्या बातमीत काही नवल वाटत नव्हते.

"अरे तो क्या? कल फजर में उनकी जियारत रहेगी ना" अफजल अलीच्या कानात कुजबुजला.

" मतलब कल कब्रिस्तान में दालवा खड़ीशक्कर बाटी जायंगी क्या ? अलीच्या डोक्यात प्रकाश पडला.

"हाँ, कल हम कब्रिस्तान में जायींगे क्या ?" अफजलने आपला स्वर आणखीनच खाली करत म्हटले.

"मगर हम तो उनके सग्गे नई है ना."अलीने दबक्या आवाजात शंका व्यक्त केली.

"जाके तो देखिन्गे एक बार ?" अफजलने आपली योजना अलीसमोर मांडली.

" ठीक है " अलीने थोडासा विचार करून होकार दिला.

      उद्या पहाटेचा गुप्त बेत ठरवून झाल्यावर अफजल त्याच्या घरी गेला आणि अली हलीमाच्या खाटेवर जाऊन पहुडला.

"क्या बाताँ चलरे थे रे तुमारे ये टेम में ?" हलीमाच्या प्रश्नाने अलीच्या हृदयाची धडधड वाढली.

" कुछ नई " अलीने आवंढा गिळत म्हटले.

" सो जा अब" हलीमाने कूस बदलत म्हटले.

        अलीने आकाशातील चांदण्या न्याहाळत थंडगार गोधडी पांघरून घेतली.त्याला आकाशातील सगळ्या चांदण्या आज दाळव्याच्या दाण्यागत भासत होत्या.जिज्ञासा,भीती आणि उत्साहाचा अजबच कोलाहल त्याच्या मनात चालला होता. त्याला नीट झोप लागत नव्हती.कूस बदलतच त्याची रात्र गेली.पहाटे पहाटे अफजलने हळूच त्याची गोधडी ओढली.अली ताडकन जागा झाला.दोघांनी गुपचूप चोर पावलांनी कब्रिस्तानची वाट धरली.

    पहाटेची फजरची नमाज अदा करून लोकं कब्रिस्तानात गोळा झालेली होती.एका कबरीवर पाणी शिंपडून त्यावर फुलांची चादर टाकण्यात आली होती.कबरीभोवती गोलाकार उभे राहून समोर हात पसरून लोकं उभी होती.गावातील मशिदीतील इमाम दुआ करत होते.बाकी सगळी मंडळी 'आमीन' असे पुटपुटत प्रतिसाद देत होती.कब्रिस्तानच्या काटेरी कुंपणाच्या बाहेर उभे राहून अली आणि अफजल हे सर्व पाहत होते.दुआ संपल्यावर जाळीदार पांढरी टोपी घातलेली दोन माणसे स्टीलच्या छोट्या टोकरीतून सर्वांना प्रसादरूपी पदार्थ वाटत होते.ते त्या प्रसादाला तबरुख म्हणत होते. अली आणि अफजलच्या आशा पल्लवित झाल्या.ते धावतच कब्रिस्तानात घुसले.एका टोकरीवाल्यापुढे हात पसरला.तसा त्या व्यक्तीने त्यांच्या हातात टोकरीतला तबरुख ठेवला.दोघांनीही दुसरा हात पुढे केला.टोकरीवाल्याने स्मित करत त्यांच्या दुसऱ्या हातात पण तबरुख दिला.अलीने दोन्ही हात एकत्र केले.तबरूखने त्याची ओंजळ भरून गेली होती.त्याने ओंजळीत निरखून पाहिले,त्यात दाळवा,फुटाणे,खडीसाखर आणि मुरमूऱ्याचे मिश्रण होते.दोघेही ओंजळीत तोंड खुपसून आधाशीपणे तबरुखवर तुटून पडले.त्यांच्या जीवनातील तो आनंदाचा सुवर्णक्षण होता.तबरुखने मृतकाचा आत्मा तृप्त झाला होता की नाही माहित नाही,पण अली आणि अफजलचा आत्मा मात्र तृप्त झाला होता.

     दिवस सरत होते.अली आणि अफजलची कब्रिस्तानची आनंदी सैर आता नेहमीचीच झाली होती.अफजल आता गावातील लोकांच्या मृत्यूच्या अद्ययावत नोंदी ठेवू लागला आणि अलीसोबत मिळून गुप्त बेत पूर्णत्वास नेऊ लागला.लोकांसाठी दुःखाचा डोंगर आणणारा मृत्यू या दोघांसाठी मात्र आनंदाचा सागर घेऊन येत होता.

        एके दिवशी कब्रिस्तानचा जियारतचा तबरुख खाताना अफजल अलीला म्हणाला," अली, तेरी दादी मरींगी तब बहोत तबरुख खाने कु मिलिंगा नई ?"

   अफजलच्या प्रश्नाने अली हादरला.गावातील लोकांच्या मृत्यूचे त्याला कधीच दुःख वाटले नव्हते.खरे तर मृत्यू म्हणजे नेमके काय याचीच कल्पना त्याला स्पष्ट नव्हती.पण का कोण जाणे,दादीच्या मृत्यूची कल्पना त्याच्या अंगावर शहारे उमटून गेली.त्याच्या मनात विचारचक्र सुरु झाले.पण तबरुखची चटक त्याच्या विचार चक्रावर हावी होत होती.त्याने अफजलच्या प्रश्नाचे काहीच उत्तर दिले नाही.मानवाच्या मृत्यूचा उत्सव करणारी त्यांची निरागस मने किती निष्ठुर झाली होती याची अली आणि अफजलला कल्पनाही नव्हती.

     निसर्गचक्र आपल्या गतीने फिरत होते.गावातील शेतात गहू कापणी आणि मळणीची कामे वेगाने सुरु होती.एके दिवशी संध्याकाळी पोचीराम काठी टेकवत पाटलांचं बोलावणं घेऊन आला.

'तू चल पुढं मी येते लगेच' म्हणत हलीमाने

लाकडाचा भारा अंगणात टाकला.शेतातील काम करून परत येताना ती कधी कधी जळतन घेऊन यायची.तांब्याभार पाणी घशाखाली ढकलून हलीमाने अलीचे बोट धरले आणि अलीला घेऊन पाटलांच्या वाड्यावर गेली.

     दादाराव पाटील जिल्हा परिषदेवर नुकतेच सदस्य म्हणून निवडून आले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या रेसमध्ये त्यांचे नाव एक नंबरला होते.वडिलोपार्जित पांढऱ्या मातीच्या गढीवरच पाटलांनी नवीन वाडा बांधला होता.बऱ्याच पायऱ्या चढून वाड्यावर जावे लागत असे.वाड्याच्या पायऱ्या चढत असताना हलीमाच्या मनात भूतकाळातील तो प्रसंग पुन्हा घोंगावू लागला.

         त्या दिवशी हलीमा जात्यावर धान्य दळून नुकतीच बसली होती. दिवे लावणीची वेळ होत आली होती.हलीमा कंदिलची जळलेली वात चिमटीत धरून वर ओढत होती इतक्यात पोचीराम धापा टाकत आला.

"पाटलांनी वाड्यावर बोलीलय तुम्हास्नी" पोचीरामने पाटलांचं फर्मान सुनावलं.

" असं अचानकच माझ्याकडं कसलं काम काढलय रं पाटलांनी" हलीमाने कंदिलाची काच चढवत विचारले.

" म्हाईत न्हाई "पोचीराम इतकच बोलून शांत उभा राहिला.

   तान्ह्या हुसेनला कडेवर घेऊन हलीमा पोचीरामच्या मागं मागं निघाली.पांढऱ्या मातीच्या ओबडधोबड पायऱ्या चढण्यासाठी तिला चांगलीच कसरत करावी लागली.वाड्याच्या ओसरीत पोहोचताच समोरचे दृश्य बघून तिच्या काळजाचे ठोके वाढले.तिथं तिचा नवरा उस्मान बसला होता.त्याच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या.बाजूलाच दादाराव पाटील आणि एक अनोळखी इसम बसला होता.थरथरत्या पायांनी ती ओसरी चढून उस्मान जवळ गेली.तान्ह्या हुसेनला घट्ट आवळत उस्मानकडे पाहिले.उस्मानने मान खाली घातली.

 " हलीमा, उस्मान यंकट सावकाराकडंच कामाला हाय ना ?" पाटलांनी विचारले.

"व्हय पाटील थितच नौकर म्हणून ठिवलाय आमच्या अब्बानी त्याईला " हलीमाने हळू आवाजात उत्तर दिले.

"उस्माननं यंकट वाण्याच्या दुकानात चोरी केलीय म्हणून सायेबानं पकडलय त्याला,तशी फिर्यादच दिली म्हणं यंकट सावकाराने" पाटलांनी त्या अनोळखी माणसाकडे बोट दाखवत म्हटले.

हलीमाच्या पाया खालची जमीनच सरकली.तिला काय बोलावं हेच सुचत नव्हतं.तिने फक्त एक तिरस्कारयुक्त कटाक्ष उस्मानवर टाकला.

" सायेब वळखीचे हाईत आपल्या.अन मी तुला बी वळखतो हलीमा.तू स्वाभिमानी बाई हाइस तुला हे सहन व्हणार न्हाई. ज्या दुकानात काम करायचं त्याच दुकानात चोरी करायची म्हंजी ? काई उमगंना मला अन ह्यो उस्मान बी तोंड उघडंना" पाटलांनी गंभीर स्वरात म्हटले.

हलीमाच्या डोळ्यात पाणी आले.आतल्या हुंडक्यांचा कल्लोळ तिला काहीच बोलूच देत नव्हता.

" जी व्हत असंल ती शिक्षा द्या साहेब " साहेबांकडे पाहत ती एवढंच कसंबसं बोलू शकली.

" त्यो यंकट सावकार बी काई लई शाना न्हाई,पैशाशिवाय काई दिसत न्हाई त्याला पण चोरी म्हंजी..बरं जाऊ दे,आता हे परकरण गावात कोणाला बी म्हाइत न्हाई,तू हमी घेणार असशील तर उस्मानला काई बी शिक्षा व्हनार न्हाई " पाटलांनी हलीमाला बोलावणं धाडण्याचा खुलासा करत म्हटलं.

"लई उपकार होतील पाटील आपले" हलीमाच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आशेने घेतली.

" पण उस्मानची पुन्हा तक्रार यायला नको,त्याला सुधरण्याची एक संधी दिली जात आहे हे लक्षात ठेवा" साहेबांनी मध्येच उस्मानवर नजर रोखत म्हटले.

" न्हाई येणार सायेब पुन्हा तक्रार" हलीमाने ग्वाही दिली.

" जा उस्मान घरी " पाटलांनी उस्मानकडे पाहत म्हटले.

उस्मान आणि हलीमा ओसरीच्या खाली उतरले.

" अन एक काम कर उद्यापासून ग्राम पंचायतीत ये कामाला जयवंत बरोबर काई तरी काम करशील,देऊ काहीतरी महिन्याला" वाड्याच्या दाराजवळ पोहोचलेल्या उस्मानला पाटलांनी अजून एक संधी दिली.

" बरं पाटील " उस्मानच्या वतीने हलीमानेच उत्तर दिले.

          रस्त्यावर गडद काळोख पसरला होता.हलीमा आणि उस्मान घराकडे निघाले होते.हलीमा तान्ह्या हुसेनला काखेत घेऊन पुढे पुढे चालत होती.उस्मान जड पावलांनी मागे मागे येत होता.दोघांमध्ये काळोखा इतकीच शांतता होती.अंगणात पोहोचताच पायावर पाणी शिंपडून हलीमा घरात गेली.उस्मानही मागोमाग घरात आला.हलीमाने मुलांना बाहेर जाऊन अंगणात टाकलेल्या खाटेवर बसायला सांगितले.

" ऐसी क्या जरुरत पड गयी थी नाक कटाने की" हलिमाच्या बोलण्यात तिरस्कार जाणवत होता.

" वो सावकार तीन तीन महीने तन्खा नई देता कुछ कमी है क्या उसकू" उस्मानने मौन सोडले.

" तो चोरी करिंगे क्या फिर" हलीमाचा राग अनावर होत होता.

" चोर नई हूँ मैं "उस्मान ओरडला.

" उधारी के वसूली में से मैंने कुछ रुपिये रख लिए थे " उस्मानने चढलेला आवाज खाली करून जमिनीवर डोळे गाढत म्हटले.

" किस्कु पुछे बिना पैसे रख लेना चोरी नई तो क्या है?" हलीमाचा राग अनावर होत होता.

" और वो सावकार अपने कु बीना पुछे हमारे हक़ की तन्खा रख लेता वो क्या है ? " जमिनीवर गाढलेले डोळे हलीमावर रोखत उस्मान बोलला.

हलीमाकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.ती उस्मानकडे एकटक पाहत होती.

" हम लोगों कु संभलकेच रहेना पड़ता दुनिया कैसी बी रहेंगी तो बी" हलिमाचा राग कमी झाला नव्हता पण आवाज खालच्या पट्टीत सरकला होता.

"रहने दो छोडो, कल से ग्राम पंचायत मे जाओ काम कु" हलीमा शांत स्वरात म्हणाली.

" मै नई जानेवाला,जयवंता के जैसे चाय के कपाँ नई उठाने वाला मई" उस्मान बंडखोरी करत म्हणाला.

काहीशी शांत झालेल्या हलीमाची तळपायाची आग मस्तकात गेली.पाटलांना दिलेला शब्द तिच्या कानात घोंगावू लागला.तिच्या हातापायांना कंप सुटला.

"हमारे खानदान की नाक कटाकेच मानिंगे तुम,गलती हो गयी मेरी तुमकु यहाँ लाके" हलीमाने उस्मानवर जळजळीत शब्दांचा वार केला.

  उस्मान या शब्दांनी घायाळ झाला.त्याला त्याचे भाईबंद सासरवाडीत जाऊन न राहण्याचा सल्ला होते,तुझा पुरता घरजावाई होऊन जाईल असे बजावत होते, पण उस्मानने त्यांचे काहीएक न ऐकता हलीमाच्या घरात येऊन राहण्याचे ठरविले होते.हलीमाचे वडिल दादाराव पाटलांच्या शाळेत शिपाई म्हणून काम करत होते.त्यांनी हलीमासाठी स्वतंत्र दोन खोल्यांचे घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते.आपल्या मुलांचे भविष्य तिथे सुरक्षित राहील असेच कफल्लक उस्मानला वाटत होते.परंतु दोन वर्षांच्या आतच आजचा प्रसंग ओढवला होता.

" ठीक है, आज के बाद तुम्हारे खानदान की नाक ऊँचीच रहेगी " उस्मानने अचानक संभाषण थांबवत संथपणे म्हटले आणि अंगणात जाऊन खाटेवर बसला.

   हलीमा उस्मानच्या अचानक बदललेल्या सुराने चिंतीत झाली.उस्मानचे बोलणे उपरोधिक आहे की त्याने आपला आग्रह मान्य केला हेच तिला समजत नव्हते.तिने चुलीजवळ बसून भाकरी थापायला घेतली. विचारांच्या तंद्रीत स्वयंपाक कधी झाला तिला समजलेच नाही.तिने उस्मानला जेवायला बोलावले पण उस्मान भूक नई है म्हणून अंगणातल्या खाटेवरच पहुडला.हलीमाने बिछाना करून दिला.उस्मानने तिच्याकडे एका नजरेनेही पहिले नाही.ती मुलांना घेऊन घरात झोपी गेली.काही केल्या तिचा डोळा लागत नव्हता.डोक्यात विचारांनी गर्दी केली होती.मध्यरात्रीला तिने बाहेर डोकावून पाहिले.उस्मान खाटेवर नव्हता.तिच्या काळजाचा ठोका चुकला.बावरल्यागत तिने आसपास फिरून बघितले पण उस्मानचा कुठेच पत्ता नव्हता.तिचे डोके गरगरायला लागले.येईल परत म्हणून तिने संपूर्ण रात्र जागून काढली पण उस्मान काही परत आलाच नाही.

  दिवस सरत गेले.हलीमाच्या कुटुंबियाने त्याच्या घरी चौकशी केली.उस्मान त्याच्या घरीही गेला नव्हता.येईल कधीतरी परत म्हणून तिच्या वडिलांनी धीर दिला होता.वर्षा मागून वर्षे सरत गेली पण उस्मान कधी परत आलाच नाही.

       हलीमा भूतकाळातील विचारांच्या तंद्रीतच होती.ती वाड्याच्या दारातून कधी आत आली तिला कळलेच नाही. पाटील ओसरीत बसून काहीतरी लिहीत होते.हलीमाला पाहून त्यांनी इशाऱ्यानेच तिला लाकडी खुर्चीवर बसायला सांगितले.पण हलीमा अलीचं बोट धरून तशीच उभी राहिली. थोड्या वेळाने मान वर करून चष्मा पुसत पाटील हलीमाला म्हणाले,

" ह्या वर्षी मुलाणी तुमच्या कुटुंबाकडंच हाय ना ?"

" व्हय पाटील" हलीमानं मान हलवली.

" मंग ते दावल मलकाला निवद दाखवायचं तेवडं काम करून घे की,लोकाईच्या घरात घऊ येऊन पडलेत." पाटलांनी सूचना केली.

"बरं पाटील" हलीमा म्हणाली.

" म्हंजी आम्ही पोळ्या खायाला मोकळे " म्हणत पाटील मोठ्याने हसले.

हलीमाने स्मित केले.

" बरं ते,नंदू सावकाराच्या दुकानातून एक लुगडं घे तुझ्यासाठी,त्याला तसं सांगीतलय मी"

" बरं, उद्या जाते दुकानात " हलीमा म्हणाली.

" मंग ह्या बारक्याला बी घे की कापडं" पाटलांनी अलीकडे पाहत म्हटलं.

" ह्याला कशाला उगच,ऱ्हाऊ द्या पाटील" हलीमा ह्यावेळी मोठ्याने बोलली.

" अगं घे,खुश होईल लेकरू,तेवढीच दुआ लागल आम्हाला " पाटीलांनी नम्रपणाने आग्रह केला.

हलीमा होकार देऊन घरी निघाली.नवीन कपडे भेटणार म्हणून अली खुश होता.पण हलीमाच्या स्वाभिमानी मनाला वाटत होते,मी उगाच घेऊन गेले अलीला पाटलाच्या वाड्यावर.

  गावात हजरत दावल मलिक या सुफी संतांची दर्गाह होती.सगळ्या गावाची ह्या दर्गाहवर फार श्रद्धा होती. शेतातील नवे गहू घरी आल्यावर दावल मालिकांच्या दर्गाहवर मलिद्याचा नैवेद्य चढविल्याशिवाय कोणीही नवे गहू खाण्यासाठी वापरत नसत.गावात प्रथा होती की गावातील पाच घरातील गहू गोळा करून त्याच्यापासून मलिदा बनवायचा आणि दावल मालिकांच्या दर्गाहवर फातेहा पठण करून गावाच्या खुशालीसाठी दुआ मागायची,मगच घरातील गहू खायला सुरुवात करायची.गावातील मुलाणी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे हे कार्य पूर्ण करायची जबाबदारी असायची.यावर्षी मुलाणी हलीमाच्या कुटुंबाकडे होती,म्हणून तिला पाटलांनी वाड्यावर बोलावले होते.

  दुसऱ्या दिवशी सकाळी हलीमा दावल मलिकच्या फातेहा पठणच्या कामाला लागली. तिने स्वतःसाठी लुगडं अन अलीसाठी एक पांढरं कापड घेतलं.कापडाच्या दुकानासमोरच शिलाई मशीन घेऊन बसणाऱ्या जाफरला अलीचं माप दिलं आणि संध्याकाळी शिवून देण्याची विनंती करून घरी आली.जाफरने पण दावल मलकाचं काम आहे म्हणून झटपट कापडं शिवून दिली.पांढरा शुभ्र पठाणी ड्रेस पाहून अलीच्या आनंदाला पारावार उरला नाही.नवीन ड्रेस त्याला फक्त रमजान ईदलाच घालायला मिळायचा,पण यावर्षी ईद नसतानाही नवीन कपडे घालायला मिळणार याचा आनंद त्याला सुखावून जात होता.रात्री खाटेवर झोपून मी नवीन ड्रेसमध्ये कसा दिसेन याचीच कल्पना तो करीत होता.आकाशात लख्ख चांदण्या असूनही त्याला आकाश त्याच्या नवीन ड्रेसप्रमाणे पांढरे शुभ्र भासत होते.

    पहाटे मशिदीतून फजरच्या अजानचा सूर घुमू लागला.हलीमा ताडकन झोपेतून जागी झाली.अलीला उठवले आणि घरासमोर दगडे रचून बनविलेल्या न्हाणी घरात आंघोळीसाठी निघून गेली.अलीच्या आईने,जुबेदाने अलीला अंगणातल्या एका पसरट दगडावर बसवून आंघोळ घातली आणि नवीन ड्रेस घातला.डोक्यावर एक पांढरी जाळीदार टोपी घातली.डोळ्याला सुरमा लावला.अली आता तयार होता.अलीचा चेहरा सूर्यासारखा चकाकत होता.दृष्ट लागू नये म्हणून आईने त्याच्या उजव्या गालावर माचीसची काडी काजळाच्या डब्बीत बुडवून हलकासा एक ठिपका काढला होता.हलीमाने एका कापडाची झोळी बनवली आणि स्वतःच्या उजव्या खांद्याला अडकवली.अलीचे बोट धरून ती गावात निघाली.गावातील वेगवेगळ्या गल्लीतील पाच

घरांची तिने निवड करून ठेवली होती. सर्वात आधी ती पाटलांच्या वाड्यावर गेली आणि दारासमोर थांबून मोठ्याने आवाज दिला,

"दोम दोम दावल मलिक, दोम दोम दावल मलिक".पाटलीन बाईंनी दरवाजा उघडला आणि दोन शेर गहू हलीमाच्या झोळीत टाकले.लईच गोड दिसतोय गं तुझा नातू म्हणत अलीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला.हलीमा पुढच्या घराकडे निघाली.कोणाच्या तरी दारापुढं उभं राहून दोम दोम दावल मलिक म्हणणं आणि लोकांचं त्यांच्या झोळीत गहू टाकणं त्याला फारच मजेशीर वाटत होतं.अशी एखादी प्रथा दाळव्यासाठी पण असायला हवी असा विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला.

  चार घरे मागून झाली होती आता शेवटचे घर बाकी होते.हलीमा गावातील एका छोट्या किराणा दुकानात पोहोचली.ते दुकान पद्मिनबाई चालवायची.तिच्या दुकानाच्या बाजूलाच रामाची पिठाची गिरणी होती.पद्मिनबाई हलीमाची बालमैत्रीण होती.शेवटी तिच्या घरी जाऊन थोड्या गप्पा मारण्याचा हलीमाचा बेत होता.दुकानाच्या पुढे उभे राहून हलीमाने आवाज दिला," दोम दोम दावल मलिक,दोम दोम दावल मलिक"

पद्मिनबाई हलीमाला बघून फार खुश झाली.

"लई दिवसानं भेटलीस बाई, ये बस च्या कराय लावते" हलीमाच्या झोळीत थोडे गहू टाकत पद्मिनबाई म्हणाली.

"च्या बी काई नको,उगं बसते थोडा येळ,पण आधी घऊ गिरणीत टाकून येते" म्हणत हलीमा झोळी घेऊन गिरणीत गेली.

  पद्मिनबाईने अलीला बसायला एक छोटा लाकडी स्टूल दिला. गहू दळायला टाकून हलीमा पद्मिन बाईच्या शेजारी जाऊन बसली.दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या.अली शांतपणे स्टूलवर बसलेला होता.त्याला दोघींच्या गप्पांचा काहीसा कंटाळा येत होता.त्याची चुळबुळ सुरु होती.त्याने दुकानात चौफेर नजर टाकली.दुकानात तेलाच्या अनेक रिकाम्या पिपात विविध पदार्थ भरून ठेवलेले होते.त्याच्या डाव्या बाजूला एका पिप्यामध्ये दाळवा भरून ठेवलेला त्याला दिसला.दाळव्याचे पिवळसर पांढरे दाणे पाहून त्याच्या हृदयात आनंदाचे वादळ उठले.त्याने हलीमा आणि पद्मिनबाई वर एक चोरटी नजर टाकली.त्या दोघी गप्पा मारण्यात गुंग होत्या.त्याने हळूच हात लांबवला,मूठभर पिप्प्यातले दाणे उचलले आणि चटकन हात पाठीमागे घेऊन स्टुलवर सावरून बसला.त्याची चुळबुळ बंद झाली पण हृदयाची धडधड वाढली.श्वासाची गती वाढली.तरी आवंढा गिळत निर्विकार चेहऱ्याने तो स्टुलवर बसून राहिला.थोडया वेळानंतर रामा गव्हाच्या पिठाची झोळी घेऊन आला.

 " बरं,निघते बाई घरी जाऊन मलिदा बनवायचा हाय" रामाच्या हातातून पिठाची झोळी घेऊन खांद्याला अडकावत हलीमा म्हणाली.

अली स्टूलवरून उठला आणि हलीमाच्या मागे जायला निघाला.

" इकडं आण कागदात बांधून देते,हातात घामानं भिजून खराब होईल" पद्मिनबाईने अलीच्या वळलेल्या मुठीकडे पाहत म्हटले.

  अलीचा नूरच पालटला.त्याने थरथरत्या हाताने मुठीतले दाळव्याचे दाणे पद्मिनबाईच्या हातातील कागदात टाकले.पद्मिनबाईने दाळव्याची पूडी बांधून अलीच्या हातावर टेकवली.हलीमाच्या चेहऱ्यावर करारी भाव उमटले.तिने अलीकडे रागाने पहिले आणि झपाझपा पाऊले टाकत घराकडे निघाली.अली जवळ जवळ धावतच तिच्या मागे मागे जात होता.अलीची भीतीने गाळण उडाली होती.त्याच्या डोळ्यापुढे भयानक अंधार नाचत होता आणि हलीमाचे डोळे आग ओकत होते.आपल्या प्राणप्रिय दादीला एक शब्दही बोलण्याची त्याची हिम्मत होत नव्हती.पद्मिन बाईच्या दुकानापासून घरी येईपर्यंत हलीमाने अलीकडे ढुंकूनही पाहिले नाही.

   घरी पोहोचताच हलीमाने झोळीतील गव्हाच्या पिठाच्या जाडसर चपात्या बनविल्या.त्या चपात्या कुस्करून मलिदा बनवू लागली.आपली प्रिय दादी आता आपल्यापासून दुरावेल या शंकेने अलीचा जीव कासावीस होत होता.त्याला हलीमाचा स्वभाव चांगलाच माहित होता.ती आता आपल्याशी आयुष्यभर बोलणार नाही अशी भीती त्याला सतावत होती.ज्या दाळव्याच्या दाण्यांनी त्याचे मन मोरसारखे नाचत होते त्याच दाण्यांमुळे आज त्याचे मन खट्टू झाले होते.पुडीतील दाळवा त्याला खड्यांसारखा काळाकुट्ट भासू लागला.त्याने हलीमाची क्षमा मागायचे ठरवले.पण तिच्याकडे नजर उचलून पाहायचीही त्याची हिम्मत होत नव्हती. तरीही सर्व शक्ती एकवटून त्याने बोलायला सुरुवात केली.

" दादी माफ कर दे ना मुझे " अलीच्या डोळ्यांत पश्चातापाचे अश्रू तरंगू लागले होते.

  हलीमाने त्याच्या बोलण्याकडे जराही लक्ष दिले नाही.हलीमा गरम गरम चपात्या अधिकच जोरात कुस्करु लागली.तिच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची तिला मुळीच तमा वाटत नव्हती.चुलीतली आग हलीमाच्या डोळ्यातील अग्नी ज्वालापुढे फिकी वाटत होती.ती दीर्घ श्वास घेत कधी शून्यात पाहत होती तर मध्येच ताकदीने चपात्या कुस्करत होती.तिला भूत वर्तमानाचे काहीच भान राहिले नव्हते.अलीच्या आईला काय घडतंय हेच कळत नव्हते.ती दारापाशी उभी राहून नुसतीच पाहत होती.

" दादी मुझे जो चाहे सजा दे मगर बात कर ना एकबार मेरे से " अलीच्या अश्रूंनी पृथ्वी भिजत होती.

" चोरी की है तूने अली,चोर है तू,मेरे किस्मत कु चोरांच है क्या अल्लाह " हलीमाच्या भावना उचंबळून आल्या होत्या.

" तू कोई बी सजा दे दादी मगर मेरे से बात कर ना दादी....दादी..." अलीने हलीमाच्या पायात लोळण घेतली.

अलीच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरंगले.पदराने डोळे पुसत ती हुंदका दाबत होती.

दादी दादी म्हणत अली श्वास कोंडल्यागत हुंदके देऊन रडू लागला.हलीमाने अलीकडे एक कटाक्ष टाकला.अलीचा कोमल चेहरा अश्रूंनी भिजून गेला होता.हलीमाच्या हृदयाला पाझर फुटला.तिच्याही डोळ्यातून नकळ्तपणे अश्रू तरंगले.

"वो दालवे की पूड़ी दे इधर" हलीमाने काहीतरी विचार करत म्हटले.

लगेच अलीने खिशातून पूडी काढून हलीमाला दिली.हलीमाने ती पूडी उघडून त्यात थोडी साखर मिसळली आणि मालिद्याने भरलेल्या ताटावर ठेवून दिली.एक स्वच्छ लाल रंगाचा कपडा (दस्तर) ताटावर झाकला आणि उठून उभी राहिली.

" चल मेरे साथ " हलीमाने अलीचे बोट धरले.

  अली डोळे पुसत हलीमा बरोबर निघाला.दोघेही हजरत दावल मलिकच्या दर्गाहमध्ये पोहोचले.हलीमाने मलिद्याचे ताट मजारपुढे ठेवून फातेहा पठण केले आणि गावाच्या खुशालीसाठी दुआ केली.दुआ झाल्यावरअलीकडे पाहत म्हणाली,

" दावल मलिक की कसम खाके बोल तू कभी चोरी नई करींगा "

" मई कभी चोरी नई करूँगा " अलीने हजरत दावल मलिकच्या कबरीकडे पाहत म्हटले.

" तू कभी दालवा नई खाईंगा "हलिमा कठोर स्वरात बोलत होती.

अलीपुढे पेच उभा राहिला.दाळव्याची लालसा आणि प्रिय दादी यापैकी एकाची निवड त्याला करायची होती.अली अडखळला.पण स्वतःला सावरत त्याने त्याच्या दादीची निवड केली.

     मनाशी दृढ निश्चय करून त्याने चोरी केल्याबद्दल दावल मलिकच्या मजारच्या साक्षीने अल्लाहची क्षमा मागितली आणि यापुढे कधीही दाळवा न खाण्याची प्रतिज्ञा केली.अलीच्या कोवळ्या मनाच्या प्रेमाने हलीमाचे स्वाभिमानी मन पाझरले.अलीच्या गळ्यात पडून तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.आपली प्रिय दादी आता आपल्या पासून दुरावणार नाही या विचाराने अलीच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरंगले.

  हलीमाने अलीला कागदाच्या पुडीतील दाळवा साखर दर्गाह परिसरातील लोकांमध्ये वाटून देण्यास सांगितले.अली दाळवा साखर वाटायला निघाला.गावातील लोकं आता पोळ्या खायला स्वतंत्र झाले होते आणि अलीला दाळव्याच्या दुष्ट चस्क्यापासून स्वातंत्र्य मिळाले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama