Gauspasha Shaikh

Abstract Inspirational

3  

Gauspasha Shaikh

Abstract Inspirational

दानत

दानत

6 mins
9


कोरोनाने थैमान घातलेले होते त्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेले होते.अगदी आवश्यक कारणासाठीसुध्दा घराबाहेर पडायची भीती वाटायची.ही भीती कोरोनाची कमी आणि पोलिसांची जास्त असायची.लॉकडाऊनमुळे संजानच्या चौकाचौकात पोलीस थांबलेले असायचे.प्रत्येक गाडी अडवून ते चौकशी करायचे.त्यांना कारण सयुक्तिक वाटले तरच ते पुढे जाऊ द्यायचे नाहीतर ढोपर सुजवून टाकायचे.अशा नाजूक परिस्थितीत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा कॉल आला.


" सर आपल्याला कोरडा पोषण आहार वाटण्याचे आदेश आलेले आहेत" मुख्याध्यापकांनी कॉल करण्याचे कारण सांगितले.


" कोरडा पोषण आहार म्हणजे" मी त्यांना विचारले.


" कोरडा पोषण आहार म्हणजे तांदूळ शिजवून त्याची खिचडी बनवून मुलांना आपण द्यायचो ना?त्या ऐवजी त्यांच्या पालकांना तांदूळ आणि डाळी,तेल,मीठ वगैरे वाटप करायचे" मुख्याध्यापकांनी मला समजावले.


" पण आता तर लॉकडाऊन चालू आहे मग आपण शाळेत पालकांना बोलावू तर तिथे गर्दी होईल ना? मग सोशल डिस्टेंसिंग वगैरेचे काय?"


" तेच तर,आपण उद्या शाळेत जाऊ, सोशल डिस्टेंसिंगसाठी सहा सहा फुटाच्या अंतरावर एक याप्रमाणे वर्तुळे आखून घेऊ आणि पालकांना परवा शाळेत बोलावू" मुख्याध्यापकांनी नियोजन सांगितले.


" ठीक आहे मग उद्या जाऊ शाळेत " मी मोबाईल ठेवत म्हटले.


        मी म्हणायला म्हणून गेलो की जाऊ उद्या शाळेत पण घराबाहेर पडणे किती जिकिरीचे आहे ते मी जाणून होतो.चौकाचौकात थांबलेले पोलीस लॉकडाऊनचे रक्षक आणि लोकांसाठी मात्र (लाठी) मारक झालेले होते.बरं,एकदा आपण त्यांना आपले काम समजावून दिले आणि त्यानंतर आपल्याला ते नुसती गाडी पाहून सोडून देतील अशी आशा करणेही चुकीचे होते.कारण सगळी लोकं मास्क लावूनच वावरत होती,पोलिसही मास्क लावूनच असायचे कुणीही कुणाला ओळखण्याची काहीही सोय नाही.शिवाय त्यांच्या ड्युट्या नेहमी चेंज व्हायच्या त्यामुळे जेंव्हा जेंव्हा पाड्यावर जाण्याची वेळ यायची तेंव्हा तेंव्हा आपली ओळख पटवून देणे,आपले काम व त्यासाठी आलेला तोंडी आदेश समजावून देणे आणि पोलिसांच्या मुडनुसार परवानगी मिळणे किंवा परवानगी नाकारल्यामुळे घरी परत येणे हे नित्याचेच झाले होते.

    मी पाड्यावर जाण्यासाठी निघालो.चौक जवळ येताच धाकधूक वाढली.पोलिसांना मी माझे पाड्यावर जाण्याचे प्रयोजन समजावून सांगितले आणि काहीच अडसर न येता पोलिसांनी परवानगी दिली.मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.मी आनंदातच गाडी सुरू केली आणि पाड्यावर पोहोचलो.एक मात्र खरे की पोलिसांचा अडसर एकदा दूर झाला की पाड्यावर काहीही समस्या नाही.तेथील लोकांना कोरोना नावाचा मार्केटमध्ये नवीनच आजार आलाय आणि तो फार डेंजर आहे हे त्यांना पटायचेच नाही.ती लोकं मास्क न लावता बिंदास फिरत राहायची.त्यात आम्ही शिक्षक लोकच तेवढे मास्कधारी असायचो.सगळी लोकं मास्कशिवाय वावरतात,सोशल डीस्टन्सिंग वगैरे काही पाळत नाहीत आणि आपणच मास्क घालून वावरायचे,क्षणाक्षणाला स्यानिटिझर वापरायचे हे जरा ऑकवर्डच वाटायचे पण सरकारी नियम तर पाळावेच लागणार.असो,आम्ही शिक्षक लोकं पाड्यावर पोहोचलो.शाळेत जाऊन शाळेच्या प्रांगणात सहा सहा फूट अंतरावर वर्तुळे आखली.लोकांच्या घरी जाऊन त्यांना उद्या पिशव्या घेऊन शाळेत यायला सांगितले आणि घरी निघून आलो.

     दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत पोहोचलो तर शाळेच्या प्रांगणात पालकांनी गर्दी केली होती.त्यांच्या हातात कापडी पिशव्या होत्या.आम्ही त्यांना वर्तुळात उभे राहायला सांगून गर्दीला शिस्त दिली.तांदूळ वाटप सुरू केले.कोणाची किती मुले शाळेत आहेत आणि त्यानुसार कोणाला किती तांदूळ व इतर खाद्यपदार्थ द्यायचे हा हिशोब दाते सर करायचे आणि पालकाच्या हातात किती तांदूळ व इतर खाद्यपदार्थ द्यायचे याची चिठ्ठी देऊन आत पाठवायचे मग त्यानुसार आम्ही तांदूळ वगैरे वाटप करायचे असं चाललं होतं.इतक्यात माझी नजर दूर थांबून आमच्याकडे पाहणाऱ्या आजीकडे गेली.मी आजीला ओळखलं.शाळा चालू असताना ती शाळेच्या गेटजवळ स्टारफ्रूट, बोरे,गुलाबी जांभूळ,हिरवे जांभूळ वगैरे विकायची आणि आपला उदरनिर्वाह करायची.आता कोरोनामुळे शाळा बंद झाल्या होत्या.आजीबाई आपला उदरनिर्वाह कसा करत असेल?हा विचार मला बेचैन करून गेला.मी तांदूळ वाटपाचे काम सोडून आजीजवळ गेलो. आजी मागे हात बांधून रांगेकडे बघत होती.


" आजी बेस का ? " मी तिला ख्याली खुशाली विचारली.


" बेसूच" आजीने रूटीन उत्तर दिले.


" आता काम धंदा बंद आहे तर मग खाणे पिणे कसे चालू आहे?" मी तिच्या आशाळभूत डोळ्यात पहात म्हटले.


आजी काहीच बोलली नाही.आजीने मान खाली घातली.आजीच्या डोळ्यात अश्रू आले.मी तिच्या मागे बांधलेल्या हाताकडे वाकून पाहिले.तिच्या हातात एक कापडी पिशवी होती.ती पिशवी लपवून ती रांग संपण्याची वाट पाहत असेल कदाचित!पालकांची रांग संपल्यावर आपल्याला थोडासा तांदूळ व इतर धान्य मिळेल या अपेक्षेने ती उभी आहे हे समजायला मला उशीर लागला नाही.मला गहिवरून आले.तिला आपण तांदूळ व इतर धान्य दिले पाहिजे असे मला वाटले.पण आजीची मुले आमच्या शाळेत नव्हती त्यामुळे ती आमची पालक नव्हती.तिला मूलबाळ होत नाही म्हणून तिच्या नवऱ्याने तिला टाकून दुसरे लग्न केले होते तेंव्हापासून एक छोटीशी झोपडी बांधून ती एकटीच राहायची.ती आमची पालक नसल्यामुळे तिच्या नावाचा तांदूळ शाळेत प्राप्त झाला नसेल.मग तिला तांदूळ द्यायचे कसे? मी अस्वस्थ झालो.थोडा विचार केला.


" आजी तुझी पिशवी मला दे,मी उद्या तुला तुझ्या घरी तांदूळ आणून देईन आज जरा गर्दी आहे" मी तिची पिशवी मागण्यासाठी हात पुढे करत म्हटले.


     आजीने हळूच हात पुढे करत मला पिशवी दिली.मी तिची घडी घालून पँटच्या खिशात ठेवली.तांदूळ वाटप झाल्यावर मी घरी आलो.हातपाय धुवून पलंगावर पडलो.डोक्यात आजीचेच विचार घोळत होते.नियतीने एकटे पाडलेल्या त्या वृद्ध स्त्रीला कोणीच वाली नव्हते.हातावर पोट असणाऱ्या मजुरांची ससेहोलपट मी टिव्हीवर पाहताच होतो.आम्हा चाकरमान्यांचे बरे होते.कमी का होईना पण पगार खात्यात जमा होत होता.पाड्यावरील शेतकरी,मजूर लोकांना मदत म्हणून आम्ही शिक्षकांनी निधी गोळा करून काही वेळा महिन्याभराचे रेशन पुरविले होते.पण ती मदत अगदी तुटपुंजी होती.शिवाय आजीसारख्या लोकांना त्याचा लाभ मिळाला की नाही कोण जाणे? आजीची हतबलता मला अस्वस्थ करून गेली.मी निश्चयच केला,हे लॉकडाऊन कोरोना वगैरे ब्याद संपेपर्यंत आजीला मदत करायची आणि तिला हे कळूही द्यायचे नाही.मी तडक बाजारात गेलो.तेथून वाडा कोलम तांदूळ आणि इतर सर्व किराणा घेतला आणि आजीच्या पिशवीत भरून घरी आणून ठेवला.

    सकाळी उठून फ्रेश झालो.गाडीला किक मारली आणि पाड्यावर निघालो.आजीचे घर शाळेला लागूनच होते.आजीच्या झोपडीच्या अंगणात उभे राहून आजीला हाक मारली.आजी आखूड दारातून वाकून बाहेर आली.मी तिच्या हातात किराणा सामानाने भरलेली पिशवी दिली.आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.


" आजी हे सगळं धान्य तुला शाळेतून मिळालंय बरं का ? तुझी मुलं आमच्या शाळेत नाहीत पण तुला धान्य मिळत राहील.जेंव्हा जेंव्हा आम्ही शाळेत येऊन धान्य वाटप करू तेंव्हा तेंव्हा तू पिशवी घेऊन येत जा.आम्ही शाळेतले धान्य तुला देत जाऊ" मी आजीला आश्वासित केले.


" बरं " आजी एवढंच बोलून झोपडीत शिरली.


    आजीला मराठी फार चांगली येत नव्हती.तिला मुलांसोबत कायम गुजरातीत बोलताना मी पाहिलेले होते.माझं बोलणं तिला कितपत समजलं असेल काय माहित?माझी इतकीच इच्छा होती की मी जे काही धान्य तिला देतोय,तिनं हे समजावं की हे धान्य शाळेतर्फे मिळतंय आणि ते धान्य मिळवणं हा तिचा हक्क आहे.आजीला माझ्या भावना समजल्याच असतील कारण दोन माणसांचा संवाद भाषेविणाही शक्य आहे,असा विचार करून मी घरी निघून आलो.

       कोरोनाचा प्रादुर्भाव चांगला दोन वर्षे राहिला.या काळात जेंव्हा जेंव्हा शाळेत धान्य वाटप झालं तेंव्हा तेंव्हा मी आजीला धान्य नेऊन देत राहिलो.अखेर कोरोना हा विषय संपला एकदाचा! परिस्थिती सामान्य झाली.लोकांना कामावर जाता येऊ लागले. त्यांच्या हातात पैसा येऊ लागला.शाळाही पूर्ववत पुन्हा सुरू झाल्या.चिमुकल्या मुलांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर पुन्हा दणाणला.एके दिवशी मी वर्गात अध्यापन करीत होतो तेंव्हा कोंबड्याच्या ओरडण्याचा आवाज आला.पहिल्यांदा मी दुर्लक्ष केलं पण तो आवाज अधिकच जवळ जाणवू लागला.मी दाराकडे पाहिले तर आजी हातात कोंबडा घेऊन उभी! मी गोंधळात पडलो.ही आजी असा कोंबडा घेऊन शाळेत का आली असेल?


"आजी हा कोंबडा घेऊन इकडे कुठे ?" मी तिला विचारलं.


" तुझ्यासाठी घेऊन आले" आजी तोडक्या मोडक्या मराठीत म्हणाली.


" का ? मी काय करू याचे ?" मी अजूनही गोंधळात होतो.


" घरी घेऊन जा आणि भाजी करून खा " आजी हातवारे करून मला आपलं म्हणणं समजावत होती.


" किती पैसे देऊ याचे?"मी तर्जनीवर अंगठा घासत बोललो.


" काहीही नाही.तुला माझ्याकडून भेट आहे" आजी म्हणाली.


" पण मला अशी भेट का देत आहेस" मी तिला विचारलं


" तू मला कोरोना काळात किराणा आणून देत राहिलास तेंव्हा तुला देण्यासारखं माझ्याकडे काहीही नव्हतं. खरं सांगायचं म्हणजे आजही नाही.पण माझ्या कोंबडीची पिल्ले आता मोठी झाली आहेत. वाटलं त्यातलं एक तुला द्यावं." आजीने गुजराती मिक्स मराठीत आपला मानस बोलून दाखवला.


" पण मी जे धान्य तुला द्यायचो ते शाळेकडून येत होतं.वैयक्तिक मी तुला काही देत नव्हतो" मी तिला म्हटलं.


" शाळेतला तांदूळ आणि दुकानातला तांदूळ मी ओळखू शकत नाही का? तू ते धान्य स्वतः दुकानातून आणून मला देत राहिलास.मला कळतं सगळं " आजी म्हणाली.


आजीने आणलेली ही भेट मी स्वीकारावी की नाही असा प्रश्न मला पडला.मी तिला कोंबडा परत घेऊन जाण्यास सांगितलं.पण तिचा आग्रह फार होता म्हणुन मी ती भेट स्वीकारली.मी शाकाहारी आहे की मांसाहारी वगैरे प्रश्न तिला पडले नाहीत.तिला काहीतरी देऊन माझी परतफेड करायची होती ती तिने केली. इतरांना देण्यासाठी नेहमीच आपल्याजवळ असतं फक्त ते देण्याची दानत आपल्यात हवी.आजीने आपल्या कफल्लक जीवनातही ती दानत दाखवून दिली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract