Gauspasha Shaikh

Drama Fantasy Thriller

3  

Gauspasha Shaikh

Drama Fantasy Thriller

मुसाफा

मुसाफा

8 mins
163



        वेळ मध्यरात्रीची होती.गाव झोपेच्या कुशीत निवांत पहुडले होते.रस्ता निर्मनुष्य झाला होता.सर्वत्र किर्रर्र अंधार पसरलेला होता.रातकिड्यांचा किरकिर आवाज आता अधिकच कर्कश जाणवत होता.रात्रीच्या गडद अंधाराला चिरत मध्येच एखाद्या घुबडाचा आवाज घुमायचा.जुबैदा टॉर्चच्या प्रकाशात झपाझप चालत होती.कुठेही खुट्ट झाले की तिच्या हृदयाची स्पंदने वाढत होती.तिचा श्वास वाढला होता,त्यामुळे उरात धाप जाणवत होती.हातापायाला हलकासा कंप सुटला होता.तिचे पाय वेडेवाकडे पडत होते.तरीही सगळा धीर एकवटून ती चालत होती.गेट उघडून ती कब्रिस्तानजवळ पोहोचली.तिची घालमेल अधिकच वाढली.तिने हळुवारपणे कब्रिस्तानचे गेट उघडले.गेटच्या कुइं कुइं आवाजाने तिला घाम फोडला.हिम्मत करून ती आत शिरली.कबरींच्यामधून वाट काढत,चाचपडत ती तिच्या अब्बूजवळ पोहोचली.एका ताज्या कबरीजवळ तिचे अब्बू हातात तसबिह घेऊन काहीतरी पुटपुटत होते.

" अब्बू " जवळ जाऊन जुबैदाने हळूच हाक दिली.

" जुबैदा तू ? आता ? यावेळी " तिच्या अब्बूनी आश्चर्याने विचारले.

" कुछ खा लो अब्बू " जुबैदाने सोबत आणलेली शिदोरी उघडत म्हटले.

" नाही..मी अन्नाचा एक कणही घेणार नाही." अब्बूनी ठामपणे नकार दिला.

" अब्बू,दोन दिवस झालेत तुम्ही काहीच खाल्लेलं नाही,थोडंस खाऊन घ्या, कुणाला काहीच कळणार नाही " जुबैदाने अब्बूचे मन वळविण्याचा पुन्हा प्रयत्न केला.

" अल्लाह तर पाहत आहे ना,माझं भांडण त्याच्याशी आहे गावातील कुणा झोपलेल्या माणसाशी नाही " अब्बूने आपला निश्चय जाहीर केला.

" अब्बू माझ्यासाठी तरी दोन घास खाऊन घ्या " जुबैदाने शेवटचे हत्यार उपसले.

" बेटा,मी नक्कीच खाल्लो असतो पण मी शपथ घेतली आहे, ती शपथ मी कोणत्याही परिस्थितीत मोडणार नाही.कब्रिस्तानमध्ये स्त्रियांना येण्यास मनाई आहे.तुला इथं कुणी पाहिलं तर अवघड होईल.तू घरी जा.मी सादिकला घेऊनच घरी येईन आणि तेंव्हा तुझ्या हातचं जेवण मी नक्की खाईन " अब्बू शेवटचं बोलले.

जुबैदाच्या डोळ्यात अश्रू तरळले.तिच्या अब्बूला काहीतरी खाऊ घालण्याचा तिचा प्रयत्न फसला होता.ती जड पावलांनी घरी निघून आली.

          जुबैदाचे अब्बू,गुलामनबी हे गावातील मशिदीचे इमाम होते.त्यांना एक मुलगी जुबैदा आणि एक मुलगा सादिक अशी दोन मुलं होती.जुबैदा अठरा वर्षाची तर सादिक सोळा वर्षांचा होता.गुलामनबी आपल्या सदवर्तनामुळे गावात प्रसिद्ध होते.गावातील लोक त्यांचा अत्यंत आदर करायचे.गावात होणाऱ्या विविध कार्यक्रमांत त्यांना सन्मानाने बोलावलं जाई. इमाम साहेब पण गावातील लोकांच्या सुख दुःखात सामील व्हायचे.एक नेक आणि इमानदार माणूस अशीच त्यांची ख्याती होती.सादिक पण बापाच्या पावलावर पाऊल ठेऊन सदवर्तनी निघाला.थोरा मोठ्यांशी अदबीने वागायचा.लहान मुलांशी प्रेमाने वागायचा.गावातील लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना तो मदत करायचा.छोट्याशा वयातच तो फार समजूतदारपणे वागायला लागला होता.गावातील सगळे लोक त्याला त्याच्या नावाप्रमाणेच सादिक म्हणजे सच्चा माणूस असल्याचा निर्वाळा देत.

     दोन दिवसांपूर्वी सादिकच्या अंगात प्रचंड ताप भरला.त्याच्या अब्बूने म्हणजे इमाम साहेबांनी त्याला दुआ पठण करून पाणी प्यायला दिले आणि मगरीबची नमाज अदा करून आलो की आपण दवाखान्यात जाऊ असे म्हणाले.सादिक दुआचे पाणी पिऊन झोपला.इमाम साहेब मगरीबची नमाज अदा करायला गेले.नमाज अदा करून घरी परतल्यावर दवाखाण्याला जाण्यासाठी सादिकला उठवायला गेले पण सादिक काही उठलाच नाही.झोपेतच त्याचा मृत्यू झाला होता.सगळ्या कुटुंबासाठी तो अतीव दुःखाचा क्षण होता.सगळे धाय मोकलून रडत होते.गावातील लोकही सादिकच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त करत होते.एका सच्चा माणसाला आपला गाव मुकला अशीच सर्वांची भावना झाली होती.

         इमाम साहेबांना सादिकच्या अकाली मृत्यूचा प्रचंड धक्का बसला.सादिकच्या अशा अचानक जाण्याने ते पुरते हादरले.त्यांचे मन त्यांच्या जीवनभराच्या शिकवणी विरुद्ध बंड करून उठले.इतक्या सहृदयी,पुण्यवान मुलाला अल्लाह असे कसे अचानक दुनियेतून घेऊन जाऊ शकतो,त्याने अशी दुनियाच किती पाहिली होती.माणसाच्या चांगल्या वागण्याला काहीच अर्थ नाही काय ? कित्येक दुष्ट माणसे आज जख्खड म्हातारे होऊनही जिवंत आहेत.मग माझ्या नेक मुलाकडून असा काय गुन्हा घडला की त्याच्या वाट्याला अकाली मृत्यू यावा.त्यांचे मन विचारांच्या गांधील माशीने रक्तबंबाळ केले होते.विचारांच्या धांदलीतच त्यांनी सादिकचा दफन विधी आटोपला.घरी येऊन ते अंगणातील खाटेवर विसावले.त्यांची गंभीर मुद्रा बघून गावातील नागरिक,नातेवाईक त्यांचे सांत्वन करायला त्यांच्या जवळ गेले.आपल्या हातात नसलेल्या गोष्टींचा विचार करून काय फायदा ? ज्यांची वेळ येते ते निघून जातात.हीच दुनियेची रीत आहे.अशा काही शब्दांनी ते इमाम साहेबांचे सांत्वन करत होते.लोकांच्या सांत्वनपर शब्दांनी ते अधिकच गंभीर झाले.ते ताडकन खाटेवरून उठले.घरात गेले आणि एक बोरिया काखोटीला मारून बाहेर आले.

 " माझ्या नेक मुलाला अकाली मृत्यू देऊन अल्लाहने त्याच्यावर आणि माझ्यावर अन्याय केला आहे.ह्या अन्यायाचा जाब मी अल्लाहला विचारणार आहे.आजपासून मी सादिकच्या कबरीजवळच जाऊन राहत आहे.शपथ आहे मला सादिकची मी सादिकला परत घेऊनच घरी येईन" इमाम साहेबांनी मोठ्याने ओरडत सगळ्यांना सुनावले.

अंगणात जमलेली मंडळी,त्यांचे कुटुंबीय त्यांच्या ह्या पवित्र्याने हैराण झाले.त्यांनी इमाम साहेबांना समजावण्याचा प्रयत्न केला की एकदा अल्लाहच्या घरी गेलेला माणूस कधीच परत येत नाही.पण इमाम साहेब काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.ते कब्रिस्तानकडे निघाले.

" जोपर्यंत मी सादिकला परत आणत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही " जाता जाता ते लोकांना आपली भीष्म प्रतिज्ञा ऐकवून गेले.

 सर्वांनी त्यांना थांबविण्याचा खूप प्रयत्न केला.जुबैदा आडवी गेली.त्यांची पत्नी त्यांना विनवू लागली परंतु कुणालाच न जुमानता ते कब्रिस्तानला निघून गेले.

             इमाम साहेब सादिकच्या कबरीजवळ बोरिया अंथरून बसले.हातातील तसबिहवर अल्लाहचे स्मरण करू लागले.गावातील लोकांनी त्यांच्या भोवताली गर्दी केली.मगरीबची अजान झाली तेंव्हा इमाम साहेब मशिदीकडे निघाले.लोकं आपापल्या घरी गेली.मशिदीत मगरीबच्या नमाजची इमामत करून ते पुन्हा कब्रिस्तानला आले.बोरियावर बसून तसबिहवर अल्लाहचे स्मरण करू लागले.रात्र झाली.पोटात अन्नाचा एक कणही न घेता ते सादिकच्या कबरीजवळच झोपी गेले.दुसऱ्या दिवशीही त्यांनी तोच दिनक्रम चालू ठेवला.अजान झाली की ते मशिदीत जायचे नमाजची इमामत करायचे आणि परत सादिकच्या कबरीजवळ येऊन बसायचे.

      कुटूंबियांना त्यांचा घोर लागला.जुबैदाच्या आईने रडून रडून आकाश पाताळ एक केले होते.जुबैदाचे आपल्या वडिलांवर फार प्रेम होते.इमाम साहेबही तिला फार जीव लावायचे.रात्री ते कसे झोपले असतील ? त्यांच्या अन्नत्यागाचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होईल ? सादिक तर परत येणार नाही पण अब्बू तर घरी येतील का?ते असेच आपल्या शपथेवर अडून राहिले तर ते जिवंत तरी राहतील का ? अशा नाना प्रश्नांनी जुबैदाच्या मनात थैमान घातले.खूप विचार करून तिने निर्णय घेतला की दररोज अर्धरात्रीला कब्रिस्तानमध्ये जाऊन ती अब्बूला खायला देईल.अशावेळी कुणीच अब्बूना काही खाताना पाहणार नाही.लोकांसमोर त्यांची शपथही मोडणार नाही आणि अब्बूचे विचारचक्र थांबले की ते घरी परत येतील.तिने रात्रीला कब्रिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला.मोठया हिमतीने ती मध्यरात्री शिदोरी घेऊन कब्रिस्तानात गेली.पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.आता ती अधिकच चिंताक्रांत झाली.

    चार दिवस झाले पण इमाम साहेबांनी आपला हट्ट सोडला नाही.इमाम साहेब आता अशक्त दिसू लागले होते.त्यांच्या चेहरा कोमेजून गेला होता.हाता पायात ताकत राहिली नव्हती.नमाज अदा करतानाच्या त्यांच्या हालचाली मंदावल्या होत्या.त्यांच्या मागे नमाज अदा करणाऱ्यांना हे जाणवत होते.त्यांचा आवाजही खोल गेला होता.कब्रिस्तानातून मशिदीला जाताना त्यांना दोन जागी बसावे लागत होते.सादिकच्या कबरीजवळ बसून तसबिह पठण करण्याचीही ताकत त्यांच्यात उरली नव्हती.पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते.गावातील लोकांना त्यांची काळजी वाटू लागली होती.सादिकच्या नंतर आपण इमाम साहेबांनाही गमावून बसतो की काय?अशी भीती त्यांना सतावत होती.मशिदीत नमाज संपल्यावर लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला.पण ते कुणाचेच ऐकायला तयार नव्हते.मी सादिकला घेऊनच घरी येईन हा हेका त्यांनी अद्यापही सोडला नव्हता.

        चार दिवसांपासून काहीच न खाल्ल्यामुळे इमाम साहेबांना झोपही नीट लागत नव्हती पण ते सादिकच्या कबरीजवळ डोळे मिटून निमूट पडून राहायचे.त्यातच कधी त्यांचा डोळा लागायचा.आज रात्रीची नमाज अदा करून ते सादिकच्या कबरीवर हात ठेवून निमूटपणे डोळे मिटून पडून होते. कधी झोप लागली ते त्यांना कळलेही नाही.पहाटे फजरची अजान झाली तेंव्हा त्यांना जाग आली.त्यांनी डोळ्यावरून हात फिरवला.कब्रिस्तानच्या लिंबाच्या झाडाची छोटीशी डहाळी तोडून त्यातून एक छोटी काडी काढली.दातांनी चावून त्याचा ब्रश केला आणि दात घासत ते मशिदीकडे निघाले.मशिदीत तोंड धुवून त्यांनी वजू केला आणि नमाजची इमामत केली.नमाज अदा झाल्यावर सगळे नमाजी इमाम साहेबांशी मुसाफा करण्यासाठी म्हणजे हात मिळविण्यासाठी त्यांच्या भोवताली गोळा झाले.नमाजी मुसाफा करत होते आणि मशिदीबाहेर निघून जात होते.शेवटी एक कोमल हात त्यांच्या हातात आला.त्या हाताच्या स्पर्शात त्यांना आपलेपणा जाणवला.त्यांनी चेहऱ्याकडे बघितले आणि अत्यानंदाने ओरडले,

"सादिक..."

       इमाम साहेबांच्या अशक्त शरीरात एक प्रकारची शक्ती संचारली.त्यांनी सादिकला कडकडून मिठी मारली.

" मला विश्वास होता तू नक्कीच परत येशील " इमाम साहेबांनी मिठी सैल करत म्हटले.

" अब्बू मला तुमच्याशी काही बोलायचे आहे"सादिकने इमाम साहेबांच्या डोळ्यात पाहत म्हटले.

" घरी चल निवांत बोलू " इमाम साहेबांनी सादिकचा हात पकडत म्हटले.

" नाही अब्बू इथेच बोलू " सादिक शांतपणे म्हणाला.

" ठीक आहे,बोल " इमाम साहेबांनी सादिकला मशिदीच्या फरशीवर बसवत म्हटले.

" अब्बू माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्याल " सादिक गंभीर मुद्रा करून बोलला.

" नक्कीच " इमाम साहेबांनी आनंदातच म्हटले.

पिता पुत्रांचा संवाद सुरू झाला.

" अल्लाहने पृथ्वीवर मानवाला का जन्माला घातले "

" अर्थातच त्याची ईबादत करण्यासाठी "

" नाही अब्बू,ईश्वराने मानवाला जन्माला घातले कारण त्याची परीक्षा घेता यावी"

"कसली परीक्षा"

" मानवाला पैसा,शक्ती,सत्ता इ. देऊन त्याच्या अहंकाराची परीक्षा आणि हे सर्व न देता त्याच्या सबुरीची परीक्षा"

"म्हणजे ?"

" म्हणजे पैसा,शक्ती,सत्ता इ.दिल्यावर माणूस अहंकारी होईल का? त्या अहंकारातून तो इतर कमकुवत लोकांवर जुलूम करेल का ? ह्याची परीक्षा आणि मानवाला काहीच न दिल्यावरही तो सबुरीने वागतो का ? की इतर लोकांच्या हक्कावर डल्ला मारतो ह्याची परीक्षा."

" पण त्याला मानवाची परीक्षा घ्यायचीच का आहे ? "

" कारण ह्या परीक्षेच्या निकालात जो उत्तीर्ण होईल त्याला जन्नतमध्ये स्थान देता येईल जिथे तो अमर असेल"

" म्हणजे ही दुनिया बनवणे अल्लाहचा मूळ हेतू नाही तर सदगुणी लोकांची जन्नत बनवणे हा अंतिम हेतू आहे,असंच ना"

"हो,ही दुनिया कयामतच्या दिवशी म्हणजे सर्व मानवजातीच्या परीक्षेच्या निकालाच्या दिवशी नष्ट करण्यात येईल आणि परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या सदगुणी लोकांना जन्नतमध्ये ठेवण्यात येईल जिथे ते अमर असतील"

" हो पण हे तू मला का सांगत आहेस ?"

" अब्बू तुम्ही माझ्या कबरीजवळ बसून मला पुन्हा जिवंत करून घरी आणण्याचा हट्ट करीत आहात तेंव्हा तुमच्या लक्षात येत नाही का की तुम्ही सबुरीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होत आहात"

दोघांत शांतता निर्माण झाली.थोडा वेळ विचार करून इमाम साहेबांनी शांततेचा भंग केला.

" मग तुझी परीक्षा पूर्ण न होताच तुला मृत्यू का देण्यात आला"

" भाताची परीक्षा शितावरून कळते.शिवाय सगळ्यांच्या परीक्षेचा पेपर वेगवेगळा असतो.माझ्या परीक्षेची वेळ संपली होती म्हणून मला ह्या दुनियेतून उचलण्यात आले."

" मी पूर्णतः गोंधळलो आहे.."

" अल्लाहची हीच योजना आहे,की तो तुम्हाला दृष्टीस पडणार नाही तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता का ? अल्लाहचे अस्तित्व आहे किंवा नाही अशी गोंधळलेली परिस्थिती असतानाही तुम्ही आपल्या उच्च नैतिकतेचे प्रदर्शन करता का ? "

" परीक्षा अवघडच आहे "

" ह्या अवघड परीक्षेचे पारितोषिकही मोठेच आहे ना अब्बू आणि तुम्ही माझ्या प्रेमाखातर ह्या परीक्षेच्या अनुऊत्तीर्णतेकडे वाटचाल करीत आहात,मला तुमची काळजी वाटते आहे"

" मी काय करू मग "

" तुम्ही घरी जा आणि आपल्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची तयारी करा.माझी परीक्षा संपली आहे आता मी परत येऊ शकत नाही "

इमाम साहेब विचारमग्न झाले.सादिकने त्यांचा हात हातात घेऊन मुसाफा केला आणि हळुवार पावलाने मशिदीबाहेर निघून गेला.इमाम साहेब त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघत राहिले.

        " अब्बू...अब्बू "

जुबैदाच्या हाकांनी इमाम साहेब जागे झाले.जुबैदा पुन्हा शिदोरी घेऊन आली होती.अजून पहाट झालेली नव्हती आणि फजरची अजानही झालेली नव्हती.ते स्वप्न होते.इमाम साहेबांनी आकाशाकडे पाहिले.आकाशात एक तारा अधिकच तेजस्वी जाणवत होता.त्यांनी थोडा वेळ विचार केला आणि उठून उभे राहिले.बोरिया काखोटीला मारला आणि म्हणाले,

" जुबैदा चल आता घरीच जेवण करू "

जुबैदाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama