भगत
भगत
"ओळखलंत का सर मला ? "
माझ्या पाठीमागून एक आवाज आला.मी नुकताच शाळेवर पोहोचलो होतो.माझी गाडी स्टँडवर लावताना मी हा आवाज ऐकला.मी मागे वळून पाहिलं.लांब भुरकट रंगांच्या केसांची जुल्फें केलेला,लांब दाढी वाढवलेला,मध्यम उंचीचा एक वीस बाविशितला तरुण माझ्यासमोर उभा होता.एका दृष्टिक्षेपात तर मी त्याला ओळखलं नाही.थोडा वेळ निरखून पाहिलं तेंव्हा लक्षात आले की अरे,हा तर गुल्पेश!
" तू गुल्पेश आहेस ना ?" मी जरा कचरतच प्रतिप्रश्न केला.
" हो सर, अचूक ओळखलंत मला तुम्ही " गुल्पेश हसत बोलला.
" ही अशी लांब लांब जुल्फें,लांब दाढी यामुळे तुला चटकन ओळखू शकलो नाही पण तुझे बोलके,पाणीदार डोळे आणि तुझ्या मोठ्या कपाळामुळे मी तुला ओळखू शकलो.तुझ्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर आजही तीच चमक आहे." मी त्याच्या डोळ्यांत पाहत म्हटले.
त्याने लाजून स्मित केलं.
" कसे आहात सर?" त्याने आपुलकीने विचारले.
" मी एकदम मस्त आहे, तू तुझं सांग"मी तितक्याच आपुलकीने त्याला म्हटलं.
" माझं छान चाललंय. मी खराडपाडा शाळेवर तुमची चौकशी केली तेंव्हा कळले की तुमची बदली शिपाईपाडा शाळेवर झाली आहे म्हणून इथे भेटायला आलो."
" छान केलंस. चल ऑफिसमध्ये बसू थोडा वेळ." मी त्याला आग्रह केला.
गाडी स्टँडवर लावून भाजीपाल्याची पिशवी हातात घेऊन मी पुढे निघालो.तो माझ्या मागेमागे चालू लागला. मेन गेटमध्ये लावलेल्या छोट्या गेटमधून वाकून आम्ही शाळेच्या पटांगणात आलो.पेव्हर ब्लॉकच्या अरुंद रस्त्यावरून चालत आम्ही शाळेच्या छोट्याशा कार्यालयात येऊन बसलो.मी सातवीच्या एका विद्यार्थ्याला भाजीपाल्याची पिशवी दिली आणि मदतनीस ताईकडे नेऊन देण्यास सांगितले. गुल्पेशला बसायला खुर्ची दिली.तो खुर्चीत बसला.मी टेबलाच्या आणि कपाटाच्यामध्ये असलेल्या अरुंद बोळीतून टेबलाच्या पलीकडील खुर्चीवर जाऊन बसलो. पाड्यावर चहा मिळणे कठीण आहे पण कोल्डड्रिंक पावलोपावली मिळतं म्हणून एका विद्यार्थ्याला बोलावून त्याला शंभरची नोट दिली आणि म्हटलं,
" एक ठंडा आणि चार ग्लास आनजोस"
मुलगा पैसे घेऊन धावतच कार्यालयाबाहेर गेला.
" मग काय करतोयस तू सध्या ? " मी उत्सुकतेने विचारले.
"सर मी भगत झालोय" गुल्पेशने त्याच्या लांब दाढीवरून हात फिरवत म्हटले.
मी अवाकच झालो.मला वाटले होते लहानपणी प्रचंड बुद्धिमान असणारा हा मुलगा एखादा अधिकारी वगैरे झाला असेल किंवा आयटीत जाऊन भला मोठा पॅकेज मिळवत असेल.पण भगत..?
" सर तुम्हाला भेटावंसं वाटलं म्हणून आलो " माझी विचारांची तंद्री मोडत गुल्पेश बोलला.
मी स्मित केलं पण विचारांनी डोक्यात एकच कल्ला केला होता.
" सर माझ्या संपूर्ण विद्यार्थी जीवनामध्ये मला मनापासून कोणते गुरुजी आवडत असतील तर ते तुम्ही आहात.मी हयातभर तुम्हाला विसरणार नाही.तुमच्या प्रेरणादायी शिकवणीची जपणूक मी माझ्या हृदयात केलेली आहे.तुम्हाला एकदा पहावं,तुमचे आभार मानावेत म्हणून मी आलोय" गुल्पेशने माझ्याकडे पाहत म्हटले.
गुल्पेशच्या बोलण्याकडे माझे लक्ष लागत नव्हते.माझा अपेक्षाभंग झाला होता.मी नुसतेच कोरडे स्मित करत मान हलवत होतो.
इतक्यात विद्यार्थी कोल्डड्रिंक्स घेऊन आला.मी शाळेतील माझ्या सहकारी शिक्षकांनाही बोलावलं.सर्वांना गुल्पेशची ओळख करून दिली.सर्वांनी मिळून कोल्डड्रिंक्सचा आस्वाद घेतला.थोड्या वेळाने गुल्पेश घरी जायला निघाला.त्याने माझा मोबाईल नंबर मागितला.मी त्याला माझा मोबाईल नंबर दिला.त्याने तो नंबर डायल करून माझ्या नंबरवर मिस्ड कॉल केला.मी माझ्या मोबाइलच्या स्क्रीनकडे बघितले.
" माझा नंबर आहे सेव्ह करा " खुर्चीतून उठत तो बोलला.
आम्ही सर्व शिक्षक त्याला गेटपर्यंत सोडायला गेलो.गेटमधून वाकून बाहेर पडून त्याने आम्हा सर्व शिक्षकांकडे पाहत स्मित केले आणि पायीच आपल्या पाड्याच्या दिशेने निघून गेला.
संध्याकाळी शाळेतून मी घरी आलो.माझ्या डोक्यात गुल्पेशचेच विचार घोंघावत होते.मी खराडपाड्याच्या शाळेवर शिक्षक असताना तो माझा विद्यार्थी होता.अतिशय हुशार,मेहनती आणि चिवट वृत्तीचा होता.सांगितलेला गृहपाठ त्याने कधीच चुकवला नव्हता.वर्गातही तो ॲक्टिव असायचा. खराडपाडा शाळेतून आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून तो तालुक्याला शिकण्यासाठी गेला.त्यानंतर त्याचे शिक्षण कुठे,काय,कसे झाले याविषयी मला कल्पना नव्हती पण वर्गातील हुशार विद्यार्थी होता तो!नक्कीच काहीतरी निराळं करत असेल असं वाटायचं.आज जेंव्हा तो भेटला आणि सांगितलं की मी भगत झालोय तेंव्हा मला धक्काच बसला.भगत हा व्यक्ती वारली आदिवासींच्या विविध धार्मिक कार्यक्रमात धार्मिक विधी पार पाडणारा व्यक्ती असतो.जमातीसाठी हा व्यक्ती फार महत्वाचा असतो.वारली व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारे विविध धार्मिक,सांस्कृतिक संस्कार भगत करत असतो.शिवाय तो गंडे दोरे घालून आजारी लोकांचा इलाजही करत असतो.मला नेमकी हीच गोष्ट खटकते.आजच्या वैद्यकीय क्रांतीच्या युगात दुर्गम पाड्यावरही अनेक उपचार सहज उपलब्ध असताना लोकं आजारी पडली की ह्या भगताकडेच जातात.भगतही मग कधी मंत्रोच्चार करून,कधी गळ्यात एखादा धागा घालून तर कधी परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींचा उपयोग करून येणाऱ्या व्यक्तीवर उपचार करत असतो.लोकांचा पण भगतावर,त्याच्या उपचारांवर अढळ विश्वास असतो.
गुल्पेशने जेंव्हा सांगितले की तो भगत झालाय तेंव्हापासून माझं विचारचक्र सुरूच होतं.एखाद्या व्यक्तीने भगत होण्यात मला काहीच समस्या नव्हती पण गुल्पेशकडून मला वेगळी अपेक्षा होती. उच्च शिक्षण घेऊन आपल्या समाजाची सेवा करण्याची किती मोठी संधी त्याच्या हातात होती!पण त्याने ती गमावली असे मला वाटू लागले.खूप वर्षांनंतर तो मला भेटला तेंव्हा मला फार आनंद झाला होता पण तो भगत का झाला असेल?त्याचे उच्च शिक्षण त्याच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अपूर्ण राहिले असेल का ?त्याला पुढे शिकण्यात रस वाटला नसेल का?उच्च शिक्षण त्याला अवघड वाटले असेल का?परंतु तो तर एक बुद्धिमान मुलगा होता,त्याला शिक्षण अवघड का वाटेल उगीच? असे विविध विचार माझ्या डोक्यात घोळत होते.सकाळी त्याने जेंव्हा सांगितले की तो भगत झालाय तेंव्हाच त्याला विचारायला हवे होते का की त्याने भगत होण्याचा मार्ग का स्वीकारला? मी शिकवलेला वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्या गळी उतरला नसेल का? मीच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यास कमी पडलो असेल का?अशा नानाविध प्रश्नांनी मला हैरान केले.सकाळी जेंव्हा तो शाळेत भेटायला आला तेंव्हाच त्याला विचारायला हवे होते का की तू भगत का झालास? तुझे शिक्षण अर्धवट राहिले का?ते अर्धवट राहिले असेल तर पूर्ण करण्यासाठी मी तुझी काही मदत करू शकतो का? असे प्रश्न त्याला सकाळीच विचारायला हवे होते का? असे विचार डोक्यात आल्याने मी अस्वस्थ झालो.अजूनही वेळ गेलेली नाही,त्याला कॉल करून बोलायला हवे.त्याची एखादी अडचण असल्यास ती दूर करायला हवी.ज्या मार्गावर तो निघाला आहे त्या मार्गावरून त्याला परावृत्त करायला हवे.असा विचार येताच मनाला थोडी शांतता लाभली.
मी गुल्पेशला कॉल केला. गुल्पेशने कॉल रिसिव्ह केला.
" नमस्कार सर,कसे आहात ?" गुल्पेशने म्हटले.
" मी छानच आहे.सकाळीच भेटलो आपण पण मला फारसे बोलता आले नाही त्यावेळी म्हणून आता कॉल केला "मी बोलण्यास सुरुवात केली.
" बोला ना सर " गुल्पेश मनमोकळेपणाने बोलला.
" गुल्पेश तुझे शिक्षण अर्धवट राहिले आहे का?पुढे शिकण्यात काही अडचण येत आहे का ?" मी मुद्द्याला हात घातला.
" नाही सर,मी उच्च शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे." गुल्पेश सहजपणे बोलला.
मी आश्चर्यचकित झालो.मला आश्चर्याचा धक्का बसण्याची ही दुसरी वेळ होती.उच्च शिक्षण पूर्ण होऊनही तो या मार्गाकडे का वळला असेल?हा प्रश्न मला बेचैन करून गेला.
" एवढं उच्च शिक्षण झाल्यावरही तू ..तू भगत का झालास?"
मी यावेळी थेटच विचारले.
गुल्पेश हसला.
" तरी मी विचार करत होतो की सकाळी तुम्ही मला हा प्रश्न का नाही विचारला?असो,तुम्ही गुरुवारी संध्याकाळी सात वाजता माझ्या घरी या आपण बोलू सविस्तर या विषयावर" गुल्पेश रहस्यमयी आवाजात म्हणाला.
" ठीक आहे येतो गुरुवारी" मी जरा विचार करतच बोललो.
मी कॉल कट केला आणि पुस्तक घेऊन वाचत बसलो.
&nb
sp; गुरुवारचा दिवस उजाडला.ठरल्याप्रमाणे मी शाळा करून संजानला घरी आलो.हातपाय धुवून चहा घेतला. पाड्यावर चाललोय म्हणून घरी सांगितले आणि खराडपाड्याच्या दिशेने बाईकवर निघालो. पाडा आठ किलोमीटर अंतरावर होता.थोड्याच वेळात मी गुल्पेशच्या झोपडीवजा दिसणाऱ्या घरी पोहोचलो.बऱ्याच वर्षांनंतर त्याच्या घरी आलो होतो.घर तसेच होते जसे पूर्वी होते. ज्वारीची धाटे किंवा बांबू एकत्र करून दोरीने करकचून बांधल्यानंतर शेणामातीच्या मिश्रणाने त्याला सारवून कुडाच्या भिंती उभ्या केलेल्या,छोटासा लाकडी दरवाजा आणि त्यावर वारली चित्रे असा एकूण घराचा थाट होता.फक्त घरातील अंगणात एक छोटीशी झोपडी एक्स्ट्रा वाढली होती इतकाच काय तो फरक जाणवला.मी घरातील अंगणात बाईक उभी केली.मला पाहून गुल्पेश झोपडीच्या खुजा दारातून वाकून बाहेर आला.अंगणातील भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली एक छोटी खाट होती.ती खाट लावून गुल्पेशने त्यावर एक बेडशीट अंथरली.आम्ही खाटेवर बसलो.त्याचे आईवडील माझ्याजवळ आले.त्यांनी माझी ख्याली खुशाली विचारली.गुल्पेशने कोल्ड्रिंक्स मागवली.कोल्ड्रिंक्स घेऊन मी खाटेच्यावर पाय घेऊन मांडी घालून बसलो.आजही खाटेवर तुम्ही असेच बसता सर म्हणत गुल्पेश हसला.संध्याकाळ होत आली होती.अंधार पडू लागला होता.गुल्पेशच्या घरी लाईटी सुरू झाल्या.बोलता बोलता मी मुद्द्याला हात घातला.
गुल्पेशला म्हणालो, "तू भगत होण्याचा मार्ग का निवडला?"
यावर त्याने त्याच्या मनगटी घड्याळाकडे पाहिले.
मला म्हणाला,"सर तुमची बाईक जरा घराच्या मागील बाजूस लावून येतो चावी द्या."
त्याचे वागणे मला गूढ रहस्यमयी वाटत होते.मी त्याला गाडीची चावी दिली.त्याने गाडी त्याच्या घराच्या मागील बाजूस पार्क केली आणि माझ्याजवळ आला.
मला म्हणाला," चला सर माझ्या खोलीत जाऊ"
तो अंगणातील त्या छोट्याशा एक्सट्रा झोपडीकडे निघाला.मी त्याच्या मागेमागे निघालो.आम्ही झोपडीत प्रवेश केला.
ती एक्सट्रा झोपडीच गुल्पेशची खोली होती.तिथे एक झीरो बल्ब जळत होता.झोपडीच्या उजव्या कोपऱ्यात एक छोटासा कट्टा बनविण्यात आला होता.कदाचित ती गुल्पेशच्या बसण्याची जागा असेल.त्या कट्ट्याच्या उजव्या बाजूला काही रंगीत धागे,लिंबू,एक दोन छोट्याशा काळया बाहुल्या अशी सामुग्री एका छोट्या टोपलीत ठेवण्यात आली होती.डाव्या बाजूला एक आडवे लाकूड बांधून त्यावर पातळ कपडा टाकण्यात आला होता.गुल्पेश त्या कट्ट्यावर जाऊन बसला आणि मला म्हणाला,
" सर त्या पातळ कापडाच्या मागे जाऊन बसा"
मी जरासा घाबरलो.आता हा काय करणार माझ्यासोबत ? असा विचार डोक्यात चमकून गेला.त्याने माझी अवस्था ओळखली असावी बहुधा!माझ्याकडे पाहून म्हणाला,
" घाबरु नका सर,मी फक्त तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे"
माझा जीव भांड्यात पडला.पण तरीही मी शासंक होतो की हा मला काय चमत्कार दाखवणार आहे? माझ्या साध्या प्रश्नाचे उत्तर तो इतक्या गूढ पद्धतीने का देतोय? मी विचार करतच त्या पातळ कापडाच्या मागे जाऊन बसलो.गुल्पेशने झीरो बल्ब बंद केला.झोपडीत गडद अंधार झाला.मग त्याने एक बटण दाबले आणि फक्त त्याच्या बसण्याच्या जागेवर प्रकाश पडेल असा बल्ब चालू झाला.तरीही तो सुध्दा एक झीरो बल्बच होता त्यामुळे हलकासा प्रकाश जाणवत होता.जिथे मी बसलो होतो तिथे तर अंधारच होता. नेमके काय घडणार आहे ते मला माहित नव्हते त्यामुळे माझी धाकधूक वाढली होती.स्वतःला शांत ठेवण्यासाठी मी दीर्घ श्वास घेऊ लागलो.थोड्या वेळाने तिथे एक कुटुंब आले.त्यांच्या सोबत एक दहा बारा वर्षांचा मुलगाही दिसत होता.मला कापडाच्या मागून स्पष्ट दिसत नव्हते,त्या कुटुंबातील लोकांचे चेहरेही धड दिसत नव्हते.
" आता काय परिस्थिती आहे मुलाची" गुल्पेशने त्या दोघा पती पत्नीकडे पाहत विचारले.
" दोन ठिकाणची भुतं दिसणं बंद झाली पण शाळेच्या जवळ असलेल्या उकिरड्यावर एक भूत दिसतं त्याला" त्या दोघा पती पत्नींनी एकमेकाकडे पाहत म्हटले.
" बाळा एक भूत अजूनही दिसतं तुला?" गुल्पेशने त्या मुलाकडे पाहत विचारले.
" हो,एक भूत शाळेच्या जवळ गेल्यावर दिसतं"तो मुलगा मान वर करून म्हणाला.
मी चमकलो. कारण हा आवाज माझ्या ओळखीचा होता.मी जरा निरखून पाहिलं.कापडाच्या मागील बाजूने पाहत असताना सुद्धा मला त्याची ओळख पटली.तो आमच्या शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी अंकुश होता.तो मागील एका महिन्यापासून शाळेत येत नव्हता.त्याच्या वर्गशिक्षकानी गृहभेट दिल्यावर त्याचे आईवडील केवळ इतकेच म्हणायचे की तो आजारी आहे,ठीक झाला की आम्ही शाळेत पाठवू.त्या विद्यार्थ्याला गुल्पेशकडे पाहून माझी उत्सुकता वाढली.
" चिंता करू नको बाळा,मी ह्या भुताचा पण तसाच बंदोबस्त करतो जसा मागील दोन भुतांचा केला होता" गुल्पेशने मुलाला अश्वासित केले.
गुल्पेशने त्याच्या उजव्या बाजूकडील टोपलीत हात घातला आणि एक छोटी काळी बाहुली बाहेर काढली.त्या बाहुलीला मुलाच्या समोर आडवे झोपवले आणि काहीतरी मंत्रोच्चार करीत त्या बाहुलीवर एका बारीक काडीने मार देऊ लागला.मुलगा त्या बाहुलीकडे पाहत होता.त्याचा एक हात आईने तर एक हात वडिलांनी गच्च पकडला होता.त्यामुळे तो स्थिर होता. गुल्पेशचे मंत्रोच्चार काही वेळापर्यंत चालू होते.शेवटी त्याने त्या बाहुलीवर एक जोराची फुंकर मारून तिच्यावर तिन वेळा काडीने वार केले.
" झाला ह्या भुताचा बंदोबस्त,आता तो तुला दिसणार नाही" गुल्पेशने त्या मुलाकडे पाहत म्हटले.
मुलाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.गुल्पेशने मग त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर एक रंगीत धागा बांधला.
" आता तुला कधीच भूत दिसणार नाही " गुल्पेशने धागा बांधून झाल्यावर मुलाच्या डोळ्यात पाहत म्हटले.
सगळे उपचार झाल्यानंतर ते कुटुंब झोपडीतून निघून गेले.गुल्पेशने माझ्या समोरील कापड हटवले.मी आणि गुल्पेश बाहेर येऊन पुन्हा खाटेवर बसलो.आता रात्र झाली होती. गुल्पेशच्या घरात एक प्रकाशमान बल्ब जळत होता.
" हे जोडपं पंधरा दिवसांपूर्वी माझ्याकडे त्यांच्या मुलाला घेऊन आलं होतं.त्या मुलाला शाळेत जाताना तीन ठिकाणी भुते दिसायची त्यामुळे त्याने शाळेत जाणे बंद केले.सुरुवातीला त्यांना वाटले की शाळेत न जाण्यासाठी हा मुलगा नाटक करतोय.त्याच्या वडिलांनी त्याला एके दिवशी जबरदस्ती शाळेत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी तो तीन ठिकाणी घाबरला आणि वडिलांना बिलगला.मग त्याचे वडील गंभीर झाले.त्याला शाळेत न सोडता माझ्याकडे घेऊन आले. मी त्यांना तीन गुरुवारचा कोर्स सांगितला.त्याला अनुसरून आज ते आले होते." गुल्पेशने सगळा मामला समजावला.
" पण यात तू भगत का झालास?या माझ्या प्रश्नाचे उत्तर कुठाय?मला कळतंय तू ह्युमन सायकॉलॉजीचा वापर करून त्यांची समस्या सोडवलीस.ते निष्पाप लोकं हे समजू शकत नाहीत" मी गुल्पेशला म्हणालो.
" हीच तर...हीच माझी समस्या होती की माझ्या समाजातील निष्पाप भोळ्या लोकांना सायकॉलॉजी समजत नाही.सर मी सायकॉलॉजीत एम.ए. केलंय.त्यानंतर समुपदेशनचे दोन कोर्स करून समुपदेशक झालो.पण माझ्या पाड्यावर राहून माझ्या लोकांची काउन्सलींग करणं इतकं सोपं नाही.माझा समाज आजही सायकॉलॉजीकल समस्यांसाठी भगताकडे जातो.त्याच्या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवतो.त्यामुळे मी विचार केला की मीच भगत झालो तर? लोकं माझ्याकडे अशा समस्या घेऊन येतील. माझ्यावर आणि न कळत माझ्या सायकॉलॉजीकल काउन्सलिंगवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांच्या समस्याही दूर होतील.मग मी एका भगताकडे जाऊन त्यांची विद्या मनोभावे शिकली.आता ह्युमन सायकॉलॉजी आणि भगताची विद्या वापरून माझ्या समाजातील लोकांच्या अडचणी दूर करतो,त्यांना उत्तम आरोग्य मिळवून देतो.समाजातील एक उच्चविद्याविभूषित व्यक्ती म्हणून मी माझ्या समाजाचं काही देणं लागतो.मी भगत होऊन माझ्या समाजाचं ऋण चांगल्याप्रकारे फेडू शकलो असतो असं वाटल्यामुळे मी भगत झालोय सर" गुल्पेश भावुक होत बोलला.
गुल्पेशच्या उत्तराने मी भारावून गेलो.त्याला एक कडकडीत मिठी मारली आणि खांद्यावर हात ठेवून शाब्बास म्हटलं.मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते आणि त्या उत्तरावर मी समाधानी होतो.काही दिवसानंतर अंकुश मला शाळेत येताना दिसला.इतर मुलांसारखा तो ही निखळ हसताना दिसला. मला अंकुशकडे पाहून गुल्पेशची आठवण येते आणि माझी छाती अभिमानाने फुगते.