Gauspasha Shaikh

Fantasy Thriller

3  

Gauspasha Shaikh

Fantasy Thriller

परीक्षा

परीक्षा

6 mins
141


      फातिमाची लगबग चालू होती.तिने ताटात नारळ, अगरबत्ती आणि साखर व्यवस्थितपणे ठेवले. त्यावर दस्तरखान झाकले आणि अय्युबला आवाज दिला,

" चल लवकर परत परीक्षेला उशीर होईल म्हणून ओरडशील "

अय्युब अंगात शर्ट घालतच खोलीतून बाहेर पडला.

" काय गरज होती आई आता दर्गाहला जायची,आता नऊ वाजलेत आणि दहा वाजता माझा पेपर आहे " अय्युबने नापसंती व्यक्त केली.

" दर्गाह आपल्या घरापासून पाच मिनिटे चालत गेलो की येतो,असा कितीसा वेळ लागेल,चल लवकर"आईने हट्ट धरला.

" पण आजच करायचं होतं का हे सगळं" अय्युब वैतागून बोलत होता.

" अरे आज तुझ्या परीक्षेचा पहिला दिवस आहे ना,मग आजच गैबी पिरचा आशीर्वाद मिळाला तुला तर किती चांगलं होईल,चल लवकर आता"फातिमाने अय्युबचा हात पकडत म्हटले.

अय्युब नाखुशीने का होईना पण फातीमाच्या सोबत दर्गाहला जायला निघाला.पाच मिनिटातच ते दर्गाहवर पोहोचले.फातिमाने नारळ फोडला,अगरबत्ती लावली आणि अय्युबची परीक्षा चांगली जाऊ दे म्हणत दुआ केली.त्यानंतर ते घरी जायला निघाले.दर्गाहच्या बाहेर येऊन पाहतात तर काय? अय्युबची चप्पल गायब!अय्युबने इकडे तिकडे नजर फिरवली.चप्पल कुठेच दिसेना.

मी येतो घरी चप्पल शोधून,तू चल पुढे म्हणत त्याने फातिमाला घरी जायला सांगितले. फातिमा घरी निघून गेली.अय्युब दर्गाह परिसरात चप्पल शोधू लागला. इतक्यात दर्गाहच्या एका आखूड भिंतीवर त्याला एक कागद फडफडताना दिसला.ते कागद त्याने उचलून पाहिले.

"अरेच्चा ! हे तर माझे हॉल तिकिट आहे,हे इथे कसे आले ?" अय्युब आश्चर्याने इकडे तिकडे पाहत म्हटले.

" बहुतेक आईने आणले असेल गैबी पिरच्या दुआ मिळविण्यासाठी आणि येथेच विसरून गेली असेल" अय्युबने विचार केला.

"पण माझी चप्पल कुणीतरी उचललेली दिसते. जाऊ दे, मरू दे,जाईन असाच पण आता बराच वेळ झाला मी दर्गाह परिसरात आहे मग येथूनच परीक्षेला जाईन,आहेच किती दूर म्हणून परीक्षा केंद्र,पायी चालत जाईन तर दहा मिनिटात येईल" अय्युब स्वतःशीच बोलत होता.

त्याने मनगटावरील घड्याळ हात वर करून पाहिले.घड्याळात नऊ वाजले होते.त्याने घड्याळ निरखून पाहिले.ते चालू होते.

   अय्युब हॉल तिकीट खिशात घालून अनवाणी पायानेच परीक्षा केंद्राकडे निघाला. काही मिनिटातच तो परीक्षा केंद्राजवळ पोहोचला. रोडच्या दुसऱ्या बाजूला असलेली त्या कॉलेजची टोलेजंग इमारत नजरेत भरण्यासारखी होती. त्याला ते कॉलेज नेहमीपेक्षा खूपच मोठे वाटत होते.त्याच्या दयानंद कॉलेजला जाताना त्याने ते राजर्षी शाहू कॉलेज कितीतरी वेळा पाहिले होते.पण आज त्या कॉलेजची इमारत वेगळीच भासत होती.तो गेटकडे जाण्यासाठी प्रयत्न करू लागला.पण ट्रॅफिक फारच भयंकर होती.त्याला रोड ओलांडताच येत नव्हते.

"इमानपूरला इतके ट्रॅफिक कधीपासून सुरू झाले? कालच तर परीक्षा केंद्र पाहायला आलो होतो,तेंव्हा तर एक्का दुक्काच वाहन दिसत होते.आज हे अचानक वेगळं वेगळं का वाटायला लागलंय" अय्युब आपल्याच तंद्रीत बडबडत होता.

शेवटी रोड ओलांडून कसा बसा तो कॉलेजच्या गेटजवळ पोहोचला.

" ए कोठे जातोस ?" कॉलेजच्या वॉचमनने त्याला अडवले.

" माझी परीक्षा आहे ह्या कॉलेजमध्ये " अय्यूबने हॉल तिकीट दाखवत म्हटले.

वॉचमनने हॉल तिकीट वाचून अय्युबकडे एक तिरकस कटाक्ष टाकला.

" हे दादरचे स्वामी कॉलेज आहे तुझी परीक्षा तर कुठेतरी इमानपूरला दिसते, तू इकडे कशाला आला ?" वॉचमनने अय्युबच्या हातात त्याचे हॉल तिकीट टेकवत म्हटले.

" काय ? मी तर गैबी पिरच्या दर्गाहवरून पायी चालत आलोय, मग दादरला कसा पोहोचू शकतो? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय,अहो माझ्या परीक्षेची वेळ होत आलीय मला जाऊ द्या ना आत"अय्युबने हात जोडत म्हटले.

"अरे कसला गैरसमज ? मी दहा वर्षांपासून इथे नोकरी करतोय,मला काना कोपरा माहीत आहे ह्या कॉलेजचा,आणि ह्या शहराचाही, तुझी परीक्षा कुठेतरी इमानपूरला आहे तू तिकडे जा... चल.. " वॉचमनने अय्युबला गेटच्या बाहेरील बाजूला ढकलत म्हटले.

वॉचमनचे उग्र रूप पाहून अय्युबने तिथून काढता पाय घेतला.त्याने मनगटावरील घड्याळ हात वर करून पाहिले.घड्याळात नऊ वाजले होते.त्याने घड्याळ निरखून पाहिले.घड्याळ चालू होते.

    अय्युब कावरा बावरा झाला होता.त्याला काही कळेनासे झाले होते. परीक्षेचा पहिलाच दिवस आणि ही काय भुताटकी चाललीय. मला रानभुला तर झाला नाही ना ? हा चकवा तर नाही ? असे प्रश्न स्वतःलाच विचारात तो तसाच अनवाणी पायाने चालत पुढे निघाला.आपले परीक्षा केंद्र जवळच कुठेतरी असायला हवे,असे त्याला वाटत होते.तो चालत राहिला.मघाशी कॉलेजच्या पुढे असणारी ट्रॅफिक आता दिसत नव्हती.समोर उंचच उंच पर्वत दिसत होते.हवा थंडगार जाणवत होती.अय्युब पुढे चालत राहिला.रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूला त्याला सफरचंदाच्या बागा दिसत होत्या.रस्ता ओबडधोबड आणि वळणदार झालेला होता.मध्येच रस्त्याच्या कडेला त्याला ओक,फर ,मॅपले अशी विविध रंगी झाडेच झाडे दिसत होती.रस्ता संपूर्ण निर्मनुष्य होता.अय्युब चालत चालत एका चेक पोस्ट जवळ पोहोचला.तिथे थोडेशे बुटके,जाडजूड आणि छोट्या छोट्या डोळ्यांचे,गुबल्या गालांचे गोरेपान जवान रायफल घेऊन उभे होते.अय्युब धावतच त्यांच्याकडे गेला.त्याने ते हॉल तिकीट त्यांना दाखवले.

" मला परीक्षेला जायचे आहे राजर्षी शाहू कॉलेजला, हे कुठे आहे मला सांगाल का प्लीज?" त्याने तिथे उभे असणाऱ्या जवानांपैकी एकाला विचारले.

" ये कॉलेज तो इंडिया मे है ,तुम इधर चीन में कैसे पहुँच गया " त्या जवानाने आश्चर्याने विचारले.

" काय..? मघाशी तो कॉलेजचा वॉचमन तर दादर सांगत होता.दादारहून थेट चीन..बापरे! काय घडतंय माझ्यासोबत ?" अय्युब विचारांत मग्न झाला.

इतक्यात दुसरा जवान त्या दोघांकडे आला आणि त्या पहिल्या जवानाला उद्देशून म्हणाला,

" क्यों मजाक करते हो बच्चे के साथ वो डर जाएगा"

अय्यूबला हायसे वाटले.त्या जवानाने त्याला प्यायला पाणी दिले.अय्युबने पाणी पिऊन त्याचे हॉल तिकीट त्या जवानाला दाखविले आणि परीक्षेला जायचे आहे हे पण सांगितले.

" बेटा तुम अभी अरुणाचल प्रदेश मे हो और ये परीक्षा केंद्र महाराष्ट्र मे कहीं इमानपुर में लगता है,तुम इधर कैसे पहुँच गए" त्या जवानाने खुलासा केला.

अय्युब पुन्हा दंग झाला. त्याला भोवळ येऊ लागली,त्याचे हृदय तीव्र गतीने धडधडू लागले. तो रडकोंडीला आला.त्याचा चेहरा पाहून तो जवान म्हणाला,

" कोई बात नही,फिक्र मत करो हम तुम्हे तुम्हारे परीक्षा केंद्र पर छोड़ देते हैं,चलो जीप में बैठो"

अय्यूब गपकन जीपमध्ये जाऊन बसला.त्याने मनगटावरील घड्याळ हात वर करून पाहिले.घडाळ्यात नऊ वाजले होते.त्याने घड्याळ निरखून पाहिले.घड्याळ चालू होते.

   जीप चार जवान आणि अय्युबला घेऊन निघाली.उंच उंच पर्वतांच्या रांगा,डोंगर दऱ्या पार करत जीप चालली होती.अचानक प्रचंड मोठा आवाज झाला.जीप हादरली.जीपच्या पुढ्यातच एक बॉम्ब ब्लास्ट झाला होता.जीपच्या ड्रायव्हरने कचकन ब्रेक दाबत गाडी थांबवली.सगळे जवान धडाधड उड्या टाकून जीपच्या मागील बाजूने रायफल सावरून बसले.एका जवानाने अय्युबला जीपच्या खाली उतरण्याचा इशारा केला.अय्युब जीपच्या खाली उतरला आणि त्या जवानाच्या पाठीमागे लपून बसला.एका धमाक्यानंतर सर्वत्र शांतता पसरली.जीपच्या पाठीमागे दडून बसलेल्या जवानांनी रायफल ताणत सगळीकडे कानोसा घ्यायला सुरुवात केली.सगळ्यांचे प्राण कानात आले होते.थोडंसं कुठं खुट्ट झालं की जवान तिकडे रायफल ताणायचे.असे तणावपूर्ण वातावरण खूप वेळ चालले.अय्युबने हळूच त्याच्या जवळच्या जवानाला विचारले,

" काय झाले आहे?"

" हमपर हमला हुआ है, लगता है प्रभाकरन के आदमी हैं " तो जवान बारकाईने चौफेर नजर दौडवत हळूच बोलला.

" कौन प्रभाकरन ?" अय्यूबने हळू आवाजात विचारले.

" अरे वही लिट्टे वाला " जवानाने खुलासा केला.

" काय..? अहो तो तर श्रीलंकेचा आणि आता तर तो जिवंत पण नाहीये आणि तो इकडे कसा हल्ला करू शकेल?

" चूप रहो " म्हणत जवानाने त्याला दूर ढकलले.

अय्युबने मनगटावरील घड्याळ हात वर करून पाहिले.घड्याळात नऊ वाजले होते.त्याने घड्याळ निरखून पाहिले.घड्याळ चालू होते.

    ब्लास्ट होऊन खूप वेळ झाला होता.सगळे जवान आणि अय्युब जीपच्या पाठीमागे चुपचाप दडून बसलेले होते.सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली होती.अधून मधून विविध पक्षांचे आवाज फक्त येत होते.जवानही पोजिशन घेऊन कंटाळले होते.आता एकमेकांना इशारे करून ते जीपमध्ये बसण्याच्या तयारीत होते.इतक्यात समोरच्या बाजूने प्रचंड गोळीबार सुरू झाला.गोळ्या जीपवर येऊन आदळत होत्या.जीपचा समोरचा भाग चक्काचूर होत होता.मग जीपमागे दडून बसलेल्या जवानांनीही इकडून गोळीबार सुरू केला.दोन्ही बाजूने घमासान सुरू झाले.गोळ्यांचा वर्षाव होत होता.तड तड आणि फड फडच्या आवाजाने अवघ्या पर्वतरांगा निनादत होत्या.कुणीही मागे हटण्यास तयार नव्हते.दोन्ही बाजूच्या रायफली एकमेकांवर तुटून पडल्या होत्या.अय्युबला जिवापेक्षा परीक्षेच्या केंद्रावर पोहोचू की नाही हीच चिंता सतावत होती.त्याने मनगटावरील घड्याळ हात वर करून पाहिले.घड्याळात नऊ वाजले होते.त्याने घड्याळ निरखून पाहिले.घड्याळ चालू होते.

    परिसरात पसरलेल्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये तुंबळ युद्धाचे पडसाद उमटत होते.संपूर्ण परिसर रायफलच्या गोळीबाराच्या आवाजाने भारून गेला होता.जवान जीव तोडून रायफल चालवत होते.इतक्यात अय्युबच्या जवळच धपकन कुणी पडल्याचा आवाज आला.अय्युब चपळाईने मागे सरकून पाहिले.त्याच्या जवळच डोक्यावर लाल रुमाल बांधलेला एक माणूस उताणा पडला होता.तो जवान तर नक्कीच नव्हता.अय्युबने काळजीपूर्वक पाहिले तेंव्हा त्या माणसाच्या कंबरेला एक टाइम बॉम्ब बांधलेला दिसला.अय्युब प्रचंड घाबरला.त्याने चौफेर नजर फिरवली.त्याच्या आसपासचे जवान आता दिसतच नव्हते.फक्त तो टाइम बॉम्बवाला माणूस आणि तोच दोघे तिथे होते.त्या माणसाच्या कंबरेला बांधलेल्या टाइम बॉम्बचे घड्याळ सुरू होते.टिक..टिक..टिक...अय्युबची भीतीने गाळण उडाली.तो किंचाळत बिछान्यावर उठून बसला.त्याने चौफेर नजर फिरवली.तो आपल्या खोलीतच होता.त्याने लावलेला अलार्म कर्कशपणे वाजत होता.

  अय्युबची आज दहा वाजता परीक्षा होती.तो रात्रभर अभ्यास करत होता. सकाळी नऊचे अलार्म लावून तो पहाटे पाचला झोपला होता.

" काय भयंकर स्वप्न होते !" असे पुटपुटत तो बिछान्यावरून उठला आणि परीक्षेला जाण्यासाठी आवरा आवर सुरू केली.

                               


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy