Gauspasha Shaikh

Tragedy

3.4  

Gauspasha Shaikh

Tragedy

दिन कुछ ऐसे गुजारता है कोई

दिन कुछ ऐसे गुजारता है कोई

8 mins
248


दिन कुछ ऐसे गुजारता है कोई

जैसे एहसान उतरता है कोई...

         होम थिएटरवर रिपीट मोडवर गुलज़ारची गज़ल चालू होती.गज़ल संपताच पुन्हा तीच गजल लागत होती.खोलीमध्ये निळ्या रंगाच्या झिरो बल्बचा अंधुक प्रकाश पसरलेला होता.खोलीतल्या ग्रंथालायतील पुस्तकांच्या रॅकबाहेर दिसणाऱ्या कडा हलक्याशा चकाकत होत्या. भिंतीवर लावलेल्या भल्या मोठया निसर्ग चित्रातील धबधब्याचे पाणी गडद निळे दिसत होते.खोलीतल्या निरव शांततेत गजल आणखीनच भर टाकत होती.करड्या राखाडी रंगाची शाल पांघरून,आराम खुर्चीत बसून जरीना डोळे मिटून शांतपणे गजल ऐकत होती.ती गजल तिच्या कानातून अंतःकरणात झिरपत होती. झोप जरीनाला आपल्या बाहुपाशात ओढत होती.तिचे डोळे जड पडत होते.हळू हळू झोपेने तिच्यावर ताबा मिळवला.ती तशीच आराम खुर्चीत झोपी गेली.गजल मात्र अजूनही चालूच होती.रात्र गडद झाली होती.शाहीदने हळूच जरीनाच्या खोलीचा दरवाजा उघडला. हलक्या आवाजाने जरीनाला उठवून तिला बेडवर नीट झोपवले.होम थिएटर बंद केले आणि आपल्या खोलीत जाऊन झोपला.

           हे नित्याचेच होते.जरीना ती एकच गजल ऐकत आराम खुर्चीत झोपी जायची आणि रात्री उशिरा तिचा मुलगा शाहिद येऊन तिला बेडवर नीट झोपवायचा.जरीनाने आता सत्तरी ओलांडली होती.तिचा एकुलता एक मुलगा शाहिद बरोबर त्याच्या आलिशान घरात ती राहत होती.सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत तिचे वेळापत्रक जवळ जवळ फिक्स होते.पहाटे उठून फजरची नमाज अदा करायची त्यानंतर कुराण पठण करायचे मग स्मार्ट टीव्ही ऑन करायचा आणि कनेक्टेड ओटीजीवर जुने फोटो पाहायचे.एखादया फोटोवर घुटमळायचे, फोटो काढलेल्या प्रसंगाची आठवण काढायची.तिचा पती रफिक बरोबर घालवलेले दिवस आठवायचे.मग दुपारची झोप घ्यायची.झोपेतून उठल्यावर असरची नमाज अदा करायची आणि तसबिह घेऊन अल्लाहचे स्मरण करत बसायचे.त्यानंतर खोलीतल्या ग्रंथालयातून एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे.रात्री जेवण झाल्यावर 'धडकन हार्ट केअर' या सेवाभावी हॉस्पिटलच्या वेबसाईटवर जाऊन आज किती ऑपरेशन्स झाली ते चेक करायचे. होम थिएटरवर गुलजारची गजल रिपीट मोडवर लावायची आणि करड्या राखाडी रंगाची शाल पांघरून आराम खुर्चीत डोळे मिटून पडायचे.

           जरीनाचे पती रफिक एक प्राथमिक शिक्षक होते.दोघांचा संसार फार सुखाचा होता.मग त्यांच्या आयुष्यात शाहिद आला.शाहीदने त्यांच्या जीवनात आणखीनच आनंदाचे रंग भरले.दोघांनी मिळून ठरवले की मुलांच्या बाबतीत आता शाहीदवरच थांबायचे.त्याचे उत्तम पालन पोषण करायचे.त्याला आयुष्यात जे व्हायचे ते होण्यास मदत करायची.ठरवल्याप्रमाणे रफीकने शाहिदला शहरातील नामवंत शाळेत दाखल केले.त्याची भरमसाठ फीस भरण्यात कसलीही अनाकानी केली नाही. शाहिद पण गंभीरपणे अभ्यास करायचा.शाळेत पहिला नंबर वगैरे काही काढायचा नाही पण चांगले मार्क्स मिळवायचा.मोठेपणी डॉक्टर होणार असल्याचं ठामपणे सांगायचा.रफिक आणि जरीनाचे आयुष्य अत्यंत शिस्तीत आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे चालले होते.

     शाहिद आता मोठा झाला होता.त्याची NEET परीक्षेची तयारी चालू होती.कॉलेजच्या व्यतिरिक्त शहरातील नामवंत खाजगी क्लासही रफिकने त्याला लावून दिला होता.ते भाड्याच्या घरात राहायचे.शाहीदला अभ्यास करायला स्वतंत्र खोली नव्हती.त्यामुळे तो हॉलमध्येच अभ्यास करत बसायचा.एके दिवशी शाहिद अभ्यास करत बसला होता तेंव्हा रफिक आनंदातच घरी आला.

" जरीना...जरीना " रफीकने मोठयाने गर्जना केली.

" क्या है ?" जरीना फडक्याने हात पुसत किचनमधून बाहेर आली.

" आपल्याला होम लोन देण्यास बँकेने होकार दिला आहे " रफिक आनंदाने बोलला.

" अरे वाह ! मग तुमच्या स्वप्नातले घर बनेल तर काही दिवसांनी " जरीनाने रफीकला प्रेमाने चिडवले.

" नाही गं,संपूर्ण घराचं माझं असं काही नियोजन नाही.मला फक्त माझी एक खोली का होईना ती एकदम खास बनवून घ्यायची आहे " रफिक म्हणाला.

" म्हणजे कशी ? " जरीनाला उत्तर माहीत असलेला प्रश्न तिने मुद्दाम विचारला.

" म्हणजे बघ एक पॉश खोली असेल,त्यात दोन भिंतीवर पुस्तकांचे रॅक असतील.त्यात माझी आवडती पुस्तके असतील एका भिंतीवर छानपैकी निसर्ग चित्र असेल.एक मऊशार बेड आणि एक आराम खुर्ची.खोलीत एक अत्याधुनिक होम थिएटर असेल. रोज रात्री जेवण झाल्यावर मी मला आदर्श शिक्षक पुरस्कारात भेटलेली करड्या राखाडी रंगाची शाल पांघरून आराम खुर्चीत बसेन आणि निळ्या रंगाचा झिरो बल्ब लावून 'दिन कुछ ऐसे गुजारता है कोई' ही माझी फेवरेट गजल ऐकत ऐकत झोपी जाईन.." रफिक धुंद होऊन आपल्याच मस्तीत बोलत होता.

त्याचे हे बोलणे ऐकून जरीना आणि शाहिद दोघेही गालातल्या गालात हसले. त्यांनी रफीकचे हे स्वप्न त्याच्या तोंडून हजारदा ऐकले होते.पण आपल्या खोलीचे असे रंगीत स्वप्न रंगवताना रफिक अगदी हरवून जात असे.त्याचे डोळे विलक्षण मोठे व्हायचे.त्याचा हा आनंदी चेहरा पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी जरीना जाणीवपूर्वकच त्याला डिवचायची.

" चला आता कागदपत्रांची पूर्तता करायला अजून बराच वेळ जाईल.मी लागतो कामाला" रफीकने शर्ट काढून हंगरला टांगत म्हटले.

        शाहीदने NEET ची परीक्षा दिली होती.त्याचा निकाल आज येणार होता.तो निकाल पाहण्यासाठी जवळच्या एका सायबर कॅफेत गेला होता.जरीना नेहमीच्या कामात गुंतली होती.रफिक त्याची बाईक घराबाहेर काढून फडक्याने पुसत बसला होता.इतक्यात शाहिद घरी आला.रफीकने त्याला हसतच विचारले,

" काय म्हणतो निकाल ?"

शाहिद काहीच बोलला नाही.तो तडक घरात निघून गेला.रफिक गंभीर झाला.तो ही त्याच्या पाठोपाठ घरात गेला.रफीकला पाहून शाहीदने हुंदके देऊन रडायला सुरुवात केली.

" माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगले अब्बू" शाहीद रडत रडत मटकन खुर्चीत बसला.

शाहीदचा निकाल चांगला लागला नाही हे एव्हाना जरीना आणि रफीकच्या लक्षात आले.

" मग त्यात रडण्यासारखं काय आहे,पुन्हा परीक्षा दे " रफीकने शाहिदच्या जवळ जात म्हटले.

" पुन्हा तो क्लासचा सगळा खर्च शिवाय एक वर्ष वाया जाईल ते वेगळं आणि तेंव्हा पण नाहीच लागला निकाल चांगला तर काय करायचे " शाहिद वैतागून बोलत होता.

" अरे एवढा पुढचा काय विचार करतो,होईल सगळं चांगलं अल्लाहच्या कृपेने" जरीनाने शाहीदकडे पाहत म्हटले.

" तुला तर सगळं सोप्पच वाटते अम्मी" शाहिद चिडला होता.

" अरे आपण खाजगी कॉलेजमधून M.B.B.S. करू, तू काही काळजी करू नको " रफीकने शाहीदला धीर देत म्हटले.

" आणि एवढे पैसे आणायचे कुठून ?" शाहिद गंभीर मुद्रा करून बोलला.

" करेन मी काहीतरी पण तू डॉक्टर होणार एवढं नक्की,आता खुश ?" रफीकने शाहीदच्या केसांत प्रेमाने हात फिरवत म्हटले.

शाहीदने स्मित केलं आणि डोळे पुसले.

              दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रफिक घरी आला तेंव्हा त्याच्या हातात एक फाईल होती.

" हे बघ मी पर्सनल लोनला अप्लाय केलंय,आता कोणतं कॉलेज घ्यायचं ते तू बघ " रफीकने शाहीदसमोर फाईल नाचवत म्हटले.

" अब्बू पण तुम्ही होम लोन घेणार होतात ना ?" शाहीदने आश्चर्याने विचारले.

" होम लोन कॅन्सल,तुझं स्वप्न महत्त्वाचं,घर काय होईल आज न उद्या " रफीकने शाहीदला समजावले.

" नाही अब्बू..मी तुमच्या स्वप्नांना तिलांजली देऊन माझे स्वप्न पूर्ण करू देणार नाही.मी करेन मिळेल तो डिप्लोमा,कोर्स वगैरे" शाहिदने स्पष्ट शब्दांत सांगितले.

" शाहिद तुझं स्वप्न हेच माझं स्वप्न आहे,तू आमच्यासाठी महत्वाचा आहेस घर नाही" रफीकने शाहिदच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले.

" मग पर्सनल लोन का ? एज्युकेशन लोन पण घेता येईल ना " जरीनाने मध्येच हस्तक्षेप केला.

" जरीना आपला शाहिद जेंव्हा स्वतःच्या पायावर उभा राहील ना तेंव्हा त्याच्या डोक्यात त्याचे आयुष्य कसे समृद्ध करायचे एवढाच फक्त विचार राहिला पाहिजे,कर्ज कसे फेडावे याची चिंता नाही!"रफिकने शाहिदसाठी योजलेली आपली योजना सुनावली.

" अब्बू मी काल फार टेन्शनमध्ये होतो त्यामुळे भलतं सलतं बोलून गेलो मला क्षमा करा पण आज मी क्लिअर आहे मला मिळेल तो कोर्स मी करेन,प्लिज होम लोन कॅन्सल करू नका" शाहिद भावनिक झाला होता.

" बेटा माझ्या एकुलत्या एक मुलाचं स्वप्नही मी पूर्ण करू शकलो नाही तर मी कसला बाप.तू चिंता करू नको तू आपलं स्वप्न पूर्ण कर.तू डॉक्टर झालास तर मी सुद्धा अभिमानाने सांगत फिरेन की मी माझ्या मुलाला डॉक्टर केलं" रफिक समजावण्याचा सुरात बोलला.

" बेटा तू आमची चिंता करू नको,अब्बू ठीक बोल रहे हैं " जरीनाने पण रफीकच्या बोलण्याला दुजोरा दिला.

शाहिद शेवटी तयार झाला.जरीना आणि रफिक खुश झाले.

            रफीकने पर्सनल लोन उचलले.शाहिदचे ऍडमिशन एका खाजगी कॉलेजच्या मॅनेजमेंट कोट्यातून घेण्यात आले.दिवस भराभरा जात होते.शाहिद मन लावून अभ्यास करत होता.पण लोनच्या हप्त्यामुळे रफिकचा पगार आता कमी येऊ लागला होता.जरीनाने आणि रफिकने काटकसर सुरू केली.घरामध्ये आता तंगी जाणवू लागली.घर सांभाळत असतानाच लोन घेण्यापूर्वीचे इन्शुरन्सचे हप्ते,इनकम टॅक्स असे खर्च रफीकला आता अनाठायी वाटू लागले होते.त्याचा ताण वाढला होता. जरीना आणि रफिक तारेवरची कसरत करत जगत होते.आपल्या परिस्थितीची झळ आपल्या मुलाला बसू नये याची ते पुरेपूर काळजी घेत होते.घरामध्ये काही कमी पडलं तर चालेल पण शाहिदला काही कमी पडू नये याची दक्षता ते घेत होते.

     शाहिदचे M.B.B.S.पूर्ण झाले.शाहिद चांगल्या गुणांनी पास झाला.शाहिदला घरच्या परिस्थितीची जाण होती.त्यामुळे आता लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का होईना पण वैद्यकीय अधिकाऱ्याची नोकरी स्वीकारावी आणि घरखर्चाला हातभार लावावा अशी त्याची मनोमन ईच्छा होती.पण रफिकने त्याला M.D.ची तयारी सुरू करण्याचा आग्रह केला.शाहिदने नाईलाजाने तो मान्य केला.त्याने M.D.च्या इन्ट्रान्सची तयारी सुरू केली.मेहनत करून इन्ट्रान्स पास केली.त्याला सायकायट्रिक डिपार्टमेंट भेटले.तेथे त्याने भरपूर अभ्यास केला आणि एक उत्तम सायकायट्रिस्ट बनून बाहेर पडला.

    रफीक आता नोकरीवरून निवृत्त झाला होता.त्याला पी.एफ.चा बराच फंड मिळाला.त्या पैशातून त्याने शाहिदसाठी एक शानदार क्लिनिक उभारले.शाहिदची प्रॅक्टिस जोमात चालू लागली.पैसा हाती खेळू लागला.त्याला आता रफिकचे स्वप्न पूर्ण करण्याचे वेध लागले पण रफीकने त्याला आधी लग्न करण्याचा सल्ला दिला.शाहिद मात्र यावेळी रफिकचे काहीच ऐकायला तयार नव्हता.आधी घर,तुमच्या स्वप्नातली तुमची खोली आणि मग माझं लग्न असाच हट्ट शाहिदने धरला.रफिकने त्याचे मन वळविण्याचे प्रयत्न केले मात्र शाहिद आपल्या निर्णयावर ठाम होता.समाजातही असंच घडत असते,आधी घर मग लग्न असा तर्क त्याने लावून धरला.त्याने घर बांधण्याआधी लग्न करण्यास नम्रपणे नकार दिला.प्रेमाने जरीना आणि रफिकला यासाठी तयार केले.शेवटी दोघेही आधी घर मग लग्न यासाठी तयार झाले. शाहिदने एका बँकेकडून होम लोन उचलले आणि एका पॉश कॉलनीमध्ये एक प्लॉट घेऊन घर बांधायला घेतले.घराचे डिजाईन बनवून घेताना त्याने रफीकचे स्वप्न असलेल्या खोलीचा प्लॅनही बनवला.रफीकच्या स्वप्नातल्या खोलीचे वर्णन त्याला तोंडपाठ होते.त्याने आर्किटेक्टला सगळे समजावले आणि घरामध्ये रफिकसाठी एका खास खोलीची रचना केली.काही महिन्यांनी घर बांधून तयार झाले.शाहिदच्या चेहऱ्यावर आपल्या अब्बूचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान झळकत होते.

       वास्तूशांतीची तारीख ठरली.सर्व नातेवाईक,शेजारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या.वास्तूशांतीचा दिवस उजाडला.लोकं घरात जमू लागली.जरीना आणि रफिकच्या पायाला दम नव्हता.आलेल्या पै पाहुण्यांची देखभाल करण्यासाठी ते सारखी धावपळ करत होते.अचानक रफिकच्या हातापायांना कंप सुटला.तो घामाघूम झाला.त्याच्या हृदयात एक कळ उठली आणि तो जमिनीवर कोसळला.जरीना व शाहिद धावत रफिककडे आले.जमलेले पाहुणे गोंधळले.आत्ताच तर धावपळ करत होते,चांगलं बोलत होते अचानक काय झालं असंच सगळ्यांना वाटत होते.अंबुलन्सने रफीकला मोठया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. होते.हॉस्पिटलमध्ये तपासणी करून रफिकला डॉक्टरांनी मृत घोषित केले.हृदय विकाराचा झटका आल्याचे निदान त्यांनी केले.आनंदाच्या दिवसाचे रूपांतर अचानक दुःखात झाले.रफिकच्या अशा अचानक जाण्याने जरीना आणि शाहिदवर दुःखाचा डोंगर कोसळला.ते धाय मोकलून रडू लागले.

     दफन विधीला ते ज्या भाड्याच्या घरात राहायचे तेथून जवळच एक छोटा दवाखाना असलेले डॉक्टरही आले होते.त्यांनी एक रहस्यमय खुलासा केला.त्यांनी सांगितले की मागील दोन वर्षांपासून रफिकला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवत होती.त्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या ते खायचे पण त्यांनी सांगितलेल्या टू डी इको,अंजिओग्राफी असल्या चाचण्या कधीच केल्या नाहीत.घरात सध्या तंगी चालू आहे करेन जरा हात मोकळा झाल्यावर,तोपर्यंत गोळ्या द्या असंच ते म्हणायचे.पण त्यांचा हात कधी मोकळा झालाच नाही आणि शेवटी त्यांना हृदय विकाराचा झटका आलेला दिसतोय.शाहिदला हे ऐकून धक्काच बसला.आपण डॉक्टर व्हावं यासाठी त्याच्या अब्बूने स्वतःच्या आरोग्याची हेळसांड केली आणि माझ्या स्वप्नपूर्तीसाठी आपली आहुती दिली हा विचार करून त्याला प्रचंड वेदना झाल्या.तो तळमळला.एक अपराधबोधाची भावनाही त्याला स्पर्शून गेली.त्याने ही हकीकत जरीनाला सांगितली.जरीना हे ऐकून पार कोलमडली.रफिकची योग्य देखभाल करण्यात आपण कसूर केला ही अपराधी भावना तिच्या अंगात हजारो सुया टोचण्याचे शल्य देऊन गेली.शाहिद आणि जरीना दोघांनाही अपराधबोध होत होता.मुळात त्यांचं काहीच चुकलं नव्हतं.खरं तर कुणाचंही काहीच चुकलं नव्हतं.नियतीने आपले रौद्र रूप दाखवले होते.

     काही दिवसांनी जरीनाने रफिकची संपूर्ण पेंशन दर महिन्याला 'धडकन हार्ट केयर' या सेवाभावी हॉस्पिटलला दान देण्याचा निर्णय घेतला आणि रफिकच्या खोलीत रफीकचे स्वप्न जगू लागली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy