Gauspasha Shaikh

Abstract Drama

3.4  

Gauspasha Shaikh

Abstract Drama

अंबीर माय

अंबीर माय

7 mins
206


  मे महिन्यात सूर्य आमच्या तांड्यावर आग ओकीत असतो.चोहीबाजूने येणाऱ्या वाऱ्याचे झोत सुद्धा कानाला पोळत असतात. आमच्या तांड्यावरील इन मिन पंधरा झोपड्यांची पाठ ह्या महिन्यात चांगलीच भाजून निघत असते.झोपड्यांत विसावलेली वृद्ध माणसे उकाड्याने कासावीस होऊन अंगणातल्या झाडाखाली बसलेली असतात.गुरे ढोरे झोपड्यांच्या भोवतालीच चाऱ्याच्या शोधात भटकत असतात.पण मराठवाड्यात ह्या काळात चारा मिळणे फारच दुरापास्त गोष्ट असते.तांड्यावरची एकमेव विहीर पार बुडाला गेलेली असते.माणसांनाच पाणी मोठ्या मुश्किलीने मिळते तिथे जनावरांची काय बिशाद ? मुकी बिचारी सगळा उन्हाळा तृष्णेत घालवतात.गडी माणसे कामावर निघून गेल्यावर बाया बिचाऱ्या अशा भयंकर उकाड्यातही झोपडीत काहीतरी कामे करतच असतात.

     आम्हा मुलांना मात्र तहान भूक काहीच जाणवत नाही.उन्हाच्या पाऱ्यातही तांड्याच्या मध्यभागी असलेल्या विशालकाय लिंबाच्या झाडावर आमचा डफाचा डाव चालू असतो.कधी त्याच झाडाखाली गिल्ली दांडू तर कधी हत्तीची सोंड असेही खेळ खेळत असतो.भूक तहान विसरून बेभान झालेल्या आम्हा मुलांच्या कानावर कधी कधी आमच्या आयांचा आवाज येऊन धडकतो पण तिकडे दुर्लक्ष करून खेळत राहणे जणू आमचा अलिखित नियमच होता.

      आज मात्र आम्ही डफ खेळण्यासाठी जमलो नव्हतो.दर रविवारी आमच्या तांड्यावर अंबीरमाय यायची.आम्ही तिच्याच येण्याची वाट पाहत होतो.आमचा तांडा आदमपूरपासून आठ दहा मैलांवर असेल.तरीही गावातील कुणी इकडे कधी फिरकला नाही.दुष्काळ सदृश्य उन्हाळ्यात तांड्यावर राहणारी माणसे कशी जगत असतील याचे सोयरसुतक गावाला कधी नव्हतेच.पण अंबीरमाय मात्र न चुकता यायची.तिच्या तांड्यावर येण्याची आतुरता आम्हा सगळ्यांनाच असायची पण गज्याला कोणाची वाट पाहणे म्हणजे शिक्षा वाटते. नेहमीप्रमाणे आजही त्याची चुळबुळ चालू होती.

 " म्या झाडावर चढून बघू का रं ?" गज्या म्हणाला.

 " तुला तर लई हउस वाटती झाडावर चढायला" संज्यानं त्याला टोमणा मारला.

" ऱ्हाऊ दे मंग,मलाच काय गरज पडली" गज्यानं आपल्या इच्छेला बळजबरीने आवर घातला.

" बघ तरी रं,आज येणार की न्हाई काय म्हाइत " बाळूने हातातील खड्याने पुढच्या एका खड्यावर नेम धरत म्हटले.

" आरं असं कसं होईल तिचा रविवार कदी चुकलाय का ?" आमच्यात सगळ्यात थोरला असलेला बज्या म्हणाला.

" व्हय गड्या खरं हाय,मी बघतोच झाडावर चढून "गज्यानं झाडाच्या खोडाला मिठी मारत म्हटले.

" जा बघ,तू काय हमचं ऐकणार हाईस व्हय "असे

बोलून बज्या खी खी हसला.मग सगळेच हसले.पण गज्याला आता परमिशन मिळाली म्हटल्यावर तो काय झाडाच्या बुडलाच कवटाळून राहणार होता काय? तो चढला भरभर झाडावर.

" आरं येतंय बग कोणतरी " गज्या झाडाच्या शेंडीवर चढून दूरवर बघत म्हणाला.

तशा आमच्या कळ्या खुलल्या.थोडया वेळानंतर ती व्यक्ती झाडाखाली जमलेल्या आम्हा मुलांनाही दिसू लागली.ती अंबीरमायच होती.सोनेरी काठ असलेले हिरवेगार लुगडे नेसलेली,गव्हाळ रंगाची, मध्यम उंचीची,पन्नाशी ओलांडलेली अंबीरमाय डोक्यावर टोपलं घेऊन आमच्या जवळ येऊन उभी राहिली.आमच्या आनंदाला पारावार उरला नाही.गज्या तर झाडावरून कधी उतरला हे आम्हाला समजलेच नाही.धगधगत्या उन्हातून भलं मोठं टोपलं डोक्यावर घेऊन चालत आल्यामुळे तिला धाप लागली होती.

" आज उशीरच झाला जरा पोरांनो " अंबीरमायने लुगड्याच्या पदराने एका हाताने घाम पुसत म्हटले.

" काय आणलीस यं अंबीरमाय आज " बज्याने एका दमात विचारून टाकले.

" आरं समजंलच की,चला मंजुळाबाईच्या घरी " म्हणत अंबीरमाय पुढं पुढं निघाली अन आम्ही सगळे तिच्या मागोमाग चालू लागलो.

     अंबीरमाय आमच्या अंगणात पोहोचली.टोपली डोक्यावरून उतरवण्यासाठी तिनं माझ्या आईला हाक मारली,"मंजुळाबाई,मंजुळाबाई होत...जरा टोपलीला हात लाव यं माय".

तशी माझी आई आमच्या झोपडीतून धावतच आली.तिनं दोन हातांनी अंबीरमायच्या डोक्यावरील टोपली खाली उतरवण्यास मदत केली.

" इज्या तुला कवापासून हाक मारते रं मी,ऐकून न ऐकल्यावणी करतुस,जा आता तांब्याभार पाणी घिऊन ये घरातून" माझ्या आईने मला बघताच हुकूम सोडला.मी घरातल्या माठातून तांब्याभार पाणी घेऊन आलो.अंबीरमायला पाणी देत हळूच तिच्या टोपलीत डोकावलो.तिच्या टोपलीत केळी,संत्री,द्राक्ष,पपई आणि दोन चार कलिगडं होती.

" इज्या जा सांग समद्याला अंबीरमाय आली म्हणून"आईने मला पिटाळले.

  द्राक्षाचा एक छोटा घड उचलून मी तांड्यावर वर्दी द्यायला पळालो.परत आलो तेंव्हा तांड्यावरील लहान मुले,बायका,वृद्ध माणसे अशी बरीच मंडळी आमच्या अंगणात जमली होती.सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

        अंबीरमाय अंगणात टोपली ठेवून माझी आई मंजुळाबाई,मथुरा आजी,कोंडा आत्या आणि काही बायकांच्या घोळक्यात गप्पा मारत बसली होती.दोन तीन पपया घेऊन आई सगळ्यांना फोडी कापून देत होती.सगळ्याजणी मोठमोठ्याने हास्यविनोद करत पपईच्या फोडी चघळत होत्या.ज्याला जे आवडेल ते फळ घेऊन आमच्या अंगणातच लोकं खात बसली होती.इटुबा आजा,शंकर नाना अशी वृद्ध मंडळी कलिंगडं घेऊन बसली होती.तंबाकूचे तोबरे थुंकून चूळ भरल्यावर त्यांनी कोयत्याने कलिंगडाच्या फोडी केल्या.इटुबा आजाचं खाणं कमी अन बोलणंच जास्त असतं.तो काहीतरी मजेदार किस्से नेहमीच सांगत असतो.आजही तो काहीतरी अवखळ किस्सा सांगत असेल.गज्या,बाळू,बज्या,संज्या,मी आणि तांड्यावरली इतर पोरं द्राक्ष आणि संत्री घेऊन बसलो.गज्या संत्र्याच्या साली दुमडून लहान लहान पोरांच्या डोळ्यात फवारे उडवीत होता.पोरं अंगणात धावत धावत कधी आपल्या आईला हाका मारीत होती तर कधी गज्याला दम भरीत होती.पुढ्यातील फळं संपली की टोपलीत पुन्हा चाचपून उरली सुरली फळं आणायची आणि फडशा पाडायचा असा उद्योग सगळेच करीत होते.अंबीरमायची टोपली अली बाबाची गुहाच होती आमच्यासाठी,कुणीही जायचे आणि खुलं जा सिम सिम म्हणत आपल्याला हवं ते घेऊन यायचे.

आमची ही आनंदनगरी दर रविवारी भरायची.कोणताही पैशाचा व्यवहार नाही की मोलभाव नाही.

  काही वेळानंतर बायकांची गप्पा गोष्टींची अन फळांच्या मेजवणीची मैफल संपली.वृद्ध माणसे आणि मुलेही हळूहळू पेंगली.सगळ्या बायका आपल्या घरी निघाल्या.कोंडु आत्या आणि अंबीर माय विहिरीवर गेल्या.कोंडु आत्या घरात पाणी भरणं सोडून आमच्या घरी आली होती.तिची घागर विहिरीवर तशीच होती.अंबीरमायने कोंडु आत्याला दोन चार घागरी पाणी शेंदून दिले.त्यानंतर ती मथुरा आजीच्या घरी गेली.तिथे ही तिने आजीला जात्यावर धान्य दळायला मदत केली.सगळ्या तांड्यावर फेरफटका मारून परत आमच्या घरी येऊन विसावली. त्यावेळी आम्ही मुलं अंगणात चंपूल खेळत बसलो होतो.ती आई बरोबर अंगणात खाट टाकून बोलत बसली.उन्हाचा तडाखा आता कमी झाला होता.तांड्यावरील लोकं आमच्या घरी पुन्हा येत होती.कुणी ज्वारी,कुणी मूग,कुणी उडीद अशा धान्याच्या एकासुडक्यात बांधलेल्या पोटल्या अंबीरमायच्या टोपलीत टाकून जात होते.अंबीरमायची रिकामी झालेली टोपली आता पुन्हा गच्च भरली होती.आईने तिला टोपली डोक्यावर घ्यायला मदत केली.भरलेली टोपली घेऊन अंबीरमाय झपाझपा पाऊले टाकत निघून गेली.

   अंबीरमाय आम्हाला कधीच परकी वाटली नाही.आमच्या तांड्यावरील इतर स्त्रियांसारखीच ती आम्हाला जवळची होती.फक्त तिच्या अंगावर घुंगटो अन केसांत मळलेले शुभ्र चमकदार चांदीचे चोटले नव्हते किंवा तिच्या नाकात भुऱ्या,दंडात वाळ्या अन शरीरावर पारंपरिक गोंदण नव्हते इतकेच! ती तांड्यावर यायची तेंव्हा तांडा चैतन्याने फुलून जायचा.बाया बापुड्यांच्या आनंदाला उधाण यायचे.पण का कोण जाणे मागील दोन आठवड्यापासून ती तांड्यावर आलीच नव्हती.असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं.तांड्यावरील रविवार सर्वांनाच तिच्याविना भकास वाटू लागला.आम्हा मुलांच्या डोळ्यातील आतुरता,चिंता प्रौढांच्या चेहऱ्यावरही दिसत होती.डफाच्या डावातही आमचे मन रमेना.चंपूल ही आम्हाला सुख देईना.कधी नव्हे इतकं ऊन आणि उकाडा आम्हाला बेचैन करीत होता.मनात एक प्रकारची अजबच हुरहूर जाणवत होती.अंबीरमाय का बरे येत नसेल तांड्यावर ? हाच विचार सगळ्यांच्या मनात घोळत होता.

    एके दिवशी कोंडु आत्या बाजार करून आली आणि लगबगीने येऊन आईच्या कानात काहीतरी कुजबुजली.क्षणात आईचा चेहरा पडला.तिच्या चेहऱ्यावरील काळजीची लकेर मला स्पष्ट दिसत होती.ती चटकन घरात गेली.मी तिच्या पाठोपाठ घरात शिरलो.आईने घरातील उतरंडीचे मडके उतरवायला सुरुवात केली.जाडजूड खापराच्या एका छोट्या मडक्यातून तिने एक रुमालाएवढ्या चिंधीत गुंडाळून ठेवलेली छोटीशी पोटली काढली.एका कापडी पिशवीत टाकली आणि घुंगटो पांघरून माझा हात धरून घराबाहेर निघाली.काय चाललंय ते मला काही समजत नव्हते.आईच्या चेहऱ्याकडे बघून मला तिला विचारायचे धाडस पण होत नव्हते.मी गुमानं तिच्यासोबत निघालो.

  ऊन डोक्यावर होतं पण वारा थंड होता.पायपीट करत आम्ही आदमपूरला पोहोचलो.मी गावात पहिल्यांदाच गेलो होतो.गावात रस्त्याच्या दुतर्फा मातीची कच्ची घरे दिसत होती.एखाद दुसरेच पक्के घर दिसायचे.गावातल्या पाऊलवाटेने चालत आम्ही एका जुनाट दिसणाऱ्या मातीच्या कच्च्या घराजवळ येऊन थांबलो.

" अंबीरमाय..ओ अंबीरमाय " आईने थरथरत्या आवाजात हाक मारली.

 घरातून एक विशीच्या आसपास असलेली तरुणी बाहेर आली.ती आम्हाला ओळखत नव्हती परंतु तिने आम्हाला घरात यायचा आग्रह केला.घराच्या छोट्या दारातून वाकत आम्ही घरात प्रवेश केला.आतील दृश्याने आमचे हृदय हेलावून टाकले.आमच्या तांड्यावर सळसळता उत्साह पेरणारी अंबीरमाय एका खाटेवर डोळे मिटून निपचित पडलेली होती.तिच्या चेहऱ्यावर ते नेहमीचे तेज दिसत नव्हते.पांघरलेल्या गोधडी बाहेर दिसणारे तिचे हात फारच अशक्त आणि कृश वाटत होते.आई गंभीर चेहऱ्याने बराच वेळ एकटक तिच्याकडे पाहत राहिली.घरात भयाण शांतता पसरली होती. अंबीरमायच्या श्वासोच्छवासामुळे होणारा सुं ...सुं..असा आवाजच तेवढा ऐकू येत होता.डोळ्याच्या कडा पुसत आई अंबीरमायच्या पायथ्याशी बसली.तिने अंबीरमायचा हात आपल्या हातात घेतला.त्या उबदार स्पर्शाने अंबीरमायने डोळे उघडले.तिच्या सुकलेल्या ओठांवर स्मित उमटले.तिच्या श्वासोच्छवासामुळे होणारा सुं सुं असा आवाज किंचितसा वाढला.तिने पांघरलेल्या गोधडीची वरखाली होणारी हालचालही वाढली होती.डोळ्यांची सावकाश उघडझाप करत ती आईकडे बघत होती.

 " धा बारा दिस झाले माय तापानं आजारी पडून पण अजून बी काई गुण येईना.." त्या तरुणीने हुंदका दाबण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या अश्रूने तिची साथ दिली नाही.आपल्या ओढणीचा एक कोपरा तोंडासमोर धरून ती रडू लागली.

आईच्या डोळ्यातही अश्रू तरंगले.आईने त्या तरुणीला छातीला कवटाळून घेतले.तशी ती हमसु हमसु रडू लागली.

" दवेखाना केला,सैलानीचा गंडा बी घातला पण वरच्यावर ती पार अशक्त व्हत चालली,आता तर तिच्या तोंडातून एक शबुद बी फुटंना,आल्या गेल्या माणसाईला निस्ती बगत ऱ्हाते." त्या तरुणीच्या आवाजातुन गाढ काळजी डोकावत होती.

    आईने त्या तरुणीच्या केसांवरून हात फिरवत पिशवीतून आणलेली छोटीशी पोटली तिच्या हातात ठेवली.त्या तरुणीने जिज्ञासेपोटी पोटलीची गाठ सोडली.त्यात एकात एक गुंडाळून ठेवलेल्या बऱ्याच नोटा होत्या.जतन करून ठेवलेल्या उडीद मुगासारखा कोंदट वास त्या नोटांना येत होता.तरुणीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.

" लई हाईत हे पैशे ..हे मी कसे.." ती तरुणी अडखळली.

" तू जुबेदाच हाईस ना ?" आईने प्रश्न केला.

"व्हय मी जुबेदाच हाय " त्या तरुणीने आपली ओळख सांगितली.

" ठेव तुजेच हाईत ते पैशे,अंबीरमायला तुझ्या लग्नाची फार काळजी व्हती.आमच्या तांड्यावर ती येयाची तवा माझ्याकडं काही नोटा ठिवायची.सांगायची माझ्या जुबेदाच्या लग्नासाठी होतील.तिच्या अब्बाला तर काई बी घोर न्हाई"आईने तिचा हात हातात घेऊन घोगऱ्या आवाजात म्हटले.

 जुबेदाने अंबीरमायकडे बघितले.अंबीरमाय डोळे मिटून निपचित पडली होती.अंबीरमायने तिला ह्याविषयी काहीच सांगितले सेल कारण तिच्या चेहऱ्यावरचा आश्चर्याचा भाव अजूनही जाणवतच होता.तिला माझ्या आईच्या प्रामाणिकपणाचे आश्चर्य वाटत होते की अंबीरमायच्या तिच्या काळजीपोटी केलेल्या बचतीचे हे काही कळत नव्हते.पण काळजीने काळवंडलेल्या तिच्या चेहऱ्यावर हलकीच एक आनंदाची लकेर मात्र उमटली होती.अंबीरमायच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवून आई जड पावलांनी घराबाहेर पडली.आलेल्या वाटेनेच आम्ही आमच्या तांड्यावर निघालो होतो पण रस्ता कटत नव्हता.तांड्यावर जाणारा नेहमीचा तो रस्ता आज वाळवंटासारखा भयाण भासत होता.

           


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract