गोष्ट चिऊताईची ( लघुकथा )
गोष्ट चिऊताईची ( लघुकथा )
" गोष्ट चिऊताईची "
( लघुकथा )
आज शनिवार असल्याने अर्धाच दिवस शाळा होती. दुपारच्या सुमारास टन-टन-टन-टन असा घनाघाती आवाज कानी पडताच, शाळेतल्या पोरांनी एकच गलका सुरू केला. वर्गात पुढे बसलेली मुले पटापट दप्तर उचलून शाळेच्या गेटकडे पळत सुटली. तर काही 'शाळा सुटली, पाटी फुटली',असे जोरजोरात ओरडून गोंधळ घालत होती. गेटजवळ गर्दी झाल्याने एकच धक्काबुक्की सुरु झाली. चार-पाच आडदांड पोरं मधेच उभी राहून चेंगराचेंगरी करत होती. दहावी कक्षेतील शेवटच्या बाकावर बसणारा, अतिशय वाया गेलेला मुलांचा घोळका होता तो. उगाचंच दाटीवाटी करत, मुलांना बाहेर न जाऊ देण्यासाठी, ते असं रोज करायचे. त्यात त्यांना कोणता आसुरी आनंद मिळायचा? देव जाणे! बलदंड शरीरयष्टी, काळपट राकट चेहरा, खुनशी डोळे, कपाळावर सतत आठी असलेला रम्या त्यांचा "म्होरक्या" होता.
त्यांच्याच वर्गातील साध्या भोळ्या "विनायकला" असे कुणाला विनाकारण त्रास द्यायला नको वाटायचे. तो त्या गर्दीचा भाग होणे टाळायचा. रोज सर्वांच्या शेवटी तो वर्गातून बाहेर पडायचा.
आजही सर्व मुले निघून गेल्यावर तो पाठीवर दप्तर टाकत शाळेबाहेर पडला. आपल्या नेहमीच्या वाटेने, नदीलगतचा रस्ता पार करत, तो घराकडे जायला निघाला. त्या रस्त्याला छानशी वनराई लागायची. नदी जवळच असल्याने तिथे खूप हिरवळ दिसायची. मोठमोठाली वृक्षे, विविध फळाफुलांची झाडे व छोट्या- मोठ्या झाडाझुडपांची जणू काही तिथे मांदियाळीच होती. असल्या निसर्गरम्य परिसरात बऱ्याचशा पक्ष्यांनी तिथल्या डेरेदार वृक्षांवर आपली घरटी बांधली होती. एरवी दुपारी शांत वाटणारा तो परिसर सकाळी आणि संध्याकाळी मात्र विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेला असायचा.
अशा निसर्गरम्य वातावरणात विनायक वाहत्या नदीचा गारवा अंगावर झेलत निघाला होता.
पाच-दहा मिनिटे चालून होत नाही तोच रम्यासहित त्या चार-पाच टवाळखोर पोरांचा, एकच गोंधळ त्याच्या कानी पडू लागला. त्या मुलांशी कोणत्याही प्रकारचा पंगा नको म्हणून, त्याने त्याची चाल संथ केली. त्या मुलांचा कल्ला जास्त प्रमाणात वाढला होता. ती मुले काय करत आहेत? म्हणून तो एका वडाच्या झाडाच्या आडोशा१मागून बघू लागला.
एका मध्यम उंचीच्या झाडावर चिमणीचे घरटे होते. ते घरटे पाडण्यासाठी रम्या व त्याची गॅंग झाडावर दगडे भिरकावत होती. दगडांचा मारा चुकवत तिथे एक चिमणी, खूप जोर जोरात चिवचिवाट करत होती. बहुतेक आपल्या घरट्यातील अंडी वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असावी.
रम्याने तिच्यावर बरोबर नेम धरत एक अनुकुचीदार दगड तिच्या दिशेने मारून फेकला. तो दगड तिच्या नाजूक पंखावर वार करत पलीकडे पडला. चिमणी तडफडत खाली काटेरी झुडुपात अडकून पडली. ते बोचरे काटे तिच्या अंगात आरपार घुसल्याने तिला इजा पोहचली. तिच्या पंखांमधून रक्त वाहत होते. जिवाला होणाऱ्या वेदना सहन करत, ती काट्यांमधून निघायचा प्रयत्न करत होती. त्यातून तिला मोकळा मार्ग सापडत नव्हता. प्रयत्नांची पराकाष्ठा करत, ती जीव वाचवण्यासाठी पंख फडफडवत होती. त्या बोचऱ्या काट्यांमुळे तिचे पंख अधिकच रक्तबंबाळ होत होते.
विनायक ते दृश्य लांबून पाहत होता. त्याच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. तिच्या चिवचिवाटाचे आर्त स्वर विनायकच्या काळजाला भेदून आरपार जात होते.
तिचे घरटे दगडाने पाडून उध्वस्त करत ती मुले तिथून हसत-खिदळत निघाली. एका दगडाने बरोबर नेम लावून लहानगी चिमणी हाणून पाडली म्हणून रम्या खुश होऊन स्वतःची छाती ठोकत होता. त्याच बरोबर त्याला पाठिंबा देणारी ती "द्वाड" मुले त्याच्या प्रतापासाठी त्याची पाठ थोपटत आनंद व्यक्त करत जात होती.
ती दृष्ट मुले नजरेआड होताच विनायक पळतच त्या इवल्याशा जिवाकडे धावला. ती काटेरी झुडुपे चपळाईने बाजूला करत, टोचणाऱ्या काट्यांची पर्वा न करता, तो त्या चिमणीची सुटका करायची, धडपड करू लागला. दोन चार काटे तर, त्याच्याही बोटांना टोचले. पण त्याच्या वेदनांपेक्षा, तिच्या वेदना जास्त भयंकर होत्या. ती बिचारी तडफडून, एका काटेरी फांदीवर अंग टाकून निपचित पडली होती. कशाबशा काटेरी फांद्या मोडतोड करत त्याने ती चिमणी आपल्या दोन्ही हातांनी अलगद बाहेर काढली. तिच्या जखमांना पाहून तो ही रडायला लागला. त्याने तिचे घरटे शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहिले. तर त्याचं झाडाच्या बुंध्याशी तिचे घरटे पडून तुटले होते. तिची कोवळी अंडी फुटून गेली होती. विनायकला सर्व प्रकार पाहून रम्या आणि त्याच्या टोळीचा प्रचंड राग आला. असे वाटतं होते की एक जाडजूड काठी घेऊन एकेकाला झोडपून काढावे.
तिचे घरकुल एका क्षणिक
आनंदापायी उद्ध्वस्त झाले होते. त्या चिमणीला, आपल्या नाजूक हातांनी नीट धरुन, तो तसाच घराकडे पळत सुटला. तिचा जीव कसा वाचवता येईल ? याचा विचार करत तो घराजवळ पोहचला.
त्याची आई रोजच्या प्रमाणे शेतावर कामाला गेली होती. आता चिऊ ताईसाठी काय करता येईल? हे सांगणारे कुणी नव्हते. त्याच्या झोपडीत एक छोटीशी काड्यांची टोपली ( पाटी ) त्याला दिसली. त्याने पटकन एक सुती कपडा त्यावर झाकला व हळुवारपणे त्याने त्या चिमणीला ठेवले. कापसाने तिच्या जखमा साफ केल्या. त्या लवकर भरून याव्यात म्हणून, जखम झालेल्या ठिकाणी, थोडीशी हळद भुरभुरली. इवलासा जीव तो! कण्हत अंग टाकून तसाच आडवा पडला होता. तिची अवस्था त्याला बघवत नव्हती. कुठून तरी औषधाचे ड्रॉपर आणून, त्याने तिच्या तोंडात पाण्याचा एक एक थेंब सोडला. नंतर एका वाटीत धान्याचे दाणे घेऊन आला. टोपलीसहित तिला मांडीवर घेत तो एक-एक दाणा तिला भरवायचा प्रयत्न करत होता. मायेने तिच्या अंगावरुन हात फिरवत होता. त्याच्या एकंदरीत वागणुकीवरून ती सुरक्षित ठिकाणी असल्याचे तिलाही समजून चुकले होते.
तो तिची खूप काळजी घ्यायचा. योग्य सुश्रुषा व वेळोवेळी दाना-पाणी मिळत गेल्याने ती चिमणी, लवकरच बरी व्हायला लागली होती. तिच्या पंखात, पुन्हा बळ निर्माण होत होते. ती थोडे-थोडे अंतर उडायला देखील लागली होती. पंखावर भार देत ती कधी घराच्या छतावर जाऊन बसायची तर कधी आजूबाजूच्या झाडांवरील फांदीवर जाऊन चिवचिवत असायची.
त्याची आई लोकांच्या शेतात रोजंदारीवर जायची. दिवस उजाडला की भाकर तुकडा बांधून निघायची. त्या नंतर थेट अंधारल्यावरच घरी परतायची. त्यामूळे दिवसभर तसा तो एकटाच असायचा. आता त्याच्या साथीला त्याची चिमणाबाई होती. जीवन-मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या त्या नाजूक जीवाला विनायकने जीवनदान बहाल केले होते. तो तिला जीवापाड जपू लागला होता. त्याच्या मायेपोटी तिलाही त्याचा लळा लागला.
विनायक शाळेत गेला की तिची नजर त्याला शोधत फिरायची आणि तो पुन्हा येताना दिसला की त्याच्या अंगाखांद्यावर बागडत ती चिवचिव करून आपला आनंद व्यक्त करायची. मग तो तिला तिकडे घडणाऱ्या गमतीजमती सांगायचा. ती ही त्याच्या अवतीभोवती घिरट्या घालत चिवचिव करून त्याच म्हणणं ऐकून घ्यायची. एखादया दिवशी त्याला उशीर झालाच तर त्याच्या डोक्यावर उड्या मारून-मारून त्याला हैराण करायची. घरी आपली कुणीतरी आतुरतेने वाट पाहतंय, ही भावनाच मूळात खूप सुखद असते.
बरेच दिवस झाले होते. चिमणी आता पूर्ववत झाली होती. विनायकने तिला पुन्हा त्याच जागी सोडून यायचा निर्णय घेतला. खरे तर हा निर्णय त्याच्यासाठी खूप जड होता. परंतु निसर्गाच्या सानिध्यात तिने स्वच्छंदी जगायला हवे. आपल्या साथीदारांच्या संगतीत आकाशात मुक्त विहारायला हवे असे त्याला वाटत होते. जो तो ज्याच्या त्याच्या गोतावळ्यात गेलेला बरा, नाही का.?
एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर, मनाचा हिय्या करून त्याने तिला स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि पुन्हा आल्या पावली चालू लागला. ज्या झाडावर आधी ती राहत होती, तिथेच तिला सोडून येऊ असा विचार करत तो तिच्याशी बडबड करू लागला.
" चिऊताई, आज मी तुला तूझ्या मूळ निवासस्थानी सोडतोय, बर का. पुन्हा नव्याने आयुष्य सुरू कर. एक-एक काडी जमा करून सुंदर घरटे बांध. नवीन अंडी घाल. पिल्लांना जन्म दे. तुला तुझे जुने साथीदार पुन्हा भेटतील. मस्त थव्याने उडायचं. तसा माझा हा रोजचा रस्ता आहे. शाळेतून येता जाता आपली भेट रोज होत जाईल." जड अंतःकरणाने भावूक होत तो तिला समजावत होता.
तो काय बोलतोय? हे तिला कितपत कळत होते कुणास ठाऊक! पण अधूनमधून सौम्य आवाजात चिव-चिव करत ती त्याला प्रतिसाद देत होती.
ते त्या जागी पोहचले. त्याने तिला खांद्यावरून आपल्या दोन्ही तळहातावर घेतले. हात उंच करून उडवणार तितक्यात त्याला मागून कुणीतरी घट्ट पकडले.
" इकडे दे ती चिमणी. नाहीतर खूप मार खाशील."
त्याला आपल्या दोन्ही बाहुंमध्ये घट्ट जखडून ठेवत रम्या उद्गारला.
" चिऊताई उडून जा. पळ इथून."
पाठीला हिसका मारत पूर्ण जोर लावून त्याने चिमणीला उडवले.
रम्या तिला मुठीत पकडणार तोच ती त्याच्या हातातून निसटून उंच उडून गेली. त्याला राग आला. त्याने विनायकला आडवे पाडले. लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. किरकोळ देहयष्टी असलेला विनायक त्याचा जमेल तसा प्रतिकार करत होता. पण त्याचे बळ त्या खुनशी रम्यापुढे कमी पडत होते.
त्याची चिऊताई ते पाहून चित्कारू लागली. ती रम्याच्या अंगावर चोचीने जमेल तिथे टोचे मारत होती. रम्या देखील मारता मारता तिला पकडायचा प्रयत्न करत होता. मुठभर जीव तो त्या रम्यासारख्या आडदांड देहापासून विनायकची सुटका करण्यासाठी तळमळत होता. पण त्या एकट्या नाजूक जीवाकडून अशक्य होते.
चिमणी आता इकडेतिकडे उडून मदतीच्या आर्त हाका मारू लागली. कुठे तिचे सवंगडी दिसताय का? म्हणून भिरभिरू लागली. चिमणी एक विशिष्ट आवाज काढून मदत याचना करत होती.
उंच आकाशात चिमण्यांचा थवा विहार करत होता. अचानक त्यांच्या कानी तिचा आर्त स्वर पडला. थव्याने दिशा बदलली. तिच्याकडे झेपावला. ती चिमणी रम्याच्या डोक्यावर टोचे मारून थैमान घालत होती. त्या थव्याने रम्याला घेरले. अचानक आपल्या सभोवताली एवढ्या चिमण्या कुठून व कशा आल्या? म्हणून तो भांबावला. त्याने विनायकला मारणे थांबवले. त्यांना पकडण्यासाठी त्याने हात सरसावले. आता सर्वजण रम्याला आळीपाळीने चोचीने टोचे मारून हैराण करत होत्या. त्याच्या अंगावर जागोजागी जखमा व्हायला लागल्या. विनायक तिथून सटकून दूर उभा राहिला. खूप मारहाण झाल्याने तो वेदनेने कळवळत होता.
इकडे रम्या चिमण्यांच्या माऱ्याने परेशान झाला होता. चिमण्यांच्या झुंडीने वारंवार चोचीने प्रहार करून त्याचा जीव घ्यायला सुरुवात केली होती. तो जमिनीवर गडाबडा लोळत त्यांचा प्रहार चुकवायचा प्रयत्न करत होता. चवताळलेला चिमण्यांचा घोळका त्याला खूप वेळानंतर मारून-मारून दमला. रम्याचीही ताकद संपली होती. तो वेदनांनी कण्हत निपचित जमिनीवर पडला होता. त्याची अवस्था आता मरणाहून अधिक वाईट झाली होती. त्या सर्व चिमण्या पांगल्या.
विनायकची चिमणी त्याच्या खांद्यावर येऊन बसली. चिवचिव करत ती त्याला सांत्वना देत होती. विनायक तिला कुरवाळत होता. अबोल भावना कृतीद्वारे व्यक्त होत होती.
रम्याकडे पाहून चिमणीने पंख फडफडवले व ती त्याचा अंगावर झेपावली. काही क्षणांच्या आतच रम्याने एक जीवघेणी किंकाळी फोडली. तिने आपल्या तीक्ष्ण चोचीने सरळ त्याच्या एका डोळ्यावरच वार केला होता. एका नाजूक निरपद्रवी चिमणीने त्याचा डोळा फोडला होता. "जैसी करणी तैसी भरणी" या उक्तीप्रमाणे त्याला त्याची सजा मिळाली होती.
( सदर कथा अधिक रंजक व्हावी म्हणून तिला कल्पनेची जोड दिली गेली आहे. मनोरंजनासहित एक संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. २० मार्च हा दिवस "जागतिक चिमणी दिन" म्हणून पाळला जातो. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यासाठी आपणही आपल्या परीने प्रयत्न करायला हवेत. हाच ह्या कथेचा छोटासा उद्देश आहे. ही कथा आवडल्यास जरूर कळवा. धन्यवाद.)
