STORYMIRROR

Aparna Pardeshi

Abstract Classics Inspirational

3  

Aparna Pardeshi

Abstract Classics Inspirational

एक रम्य संध्याकाळ (भाग 6)

एक रम्य संध्याकाळ (भाग 6)

4 mins
156

बस स्टँड येताच क्षितिजराव आणि प्रणिका रिक्षातून उतरले.

"प्रणिका तूझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आता तुला देतो. आपण माझ्या मित्राच्या घरी जात नाहीये. तो फक्त एक बहाना होता. आजची संध्याकाळ मी फक्त तुझ्यासाठी राखीव ठेवली आहे. आज आपण दोघच एकमेकांसोबत मस्त मजेत वेळ घालवू."

" थोडीफार शंका तर मलाही येत होती. पण इतका खटाटोप करायची गरज काय होती.?"

"तू घरातुन बाहेर पडली नसती म्हणून काहीना काही सांगणं भाग होत. आपण दोघांनी बाहेर फिरायला जायचं म्हणजे ठोस कारण हवं. नाहीतर तू माझ्या सोबत न येण्यासाठी खूप कारणे शोधून काढली असती. म्हणून हा सगळा बनाव रचला."

" अस काही नाहीये. तुमच्या मनाविरुद्ध मी कधीच वागत नाही. फक्त इतकंच की माझ्या संसारात मी खूप रमली आहे. घर सोडून कुठेच जावस वाटत नाही मला."

" हे बघ. तो आपल्या मुलाचा संसार आहे. त्याचा तो करेल. आता उतारवयात आपण आपलं बघुया. फक्त तू आणि मी. दोघांचं विश्व. आज तुला हेच पटवुन द्यायला मी खास बाहेर आणलं आहे."

"म्हणजे? नक्की काय करायचं ठरलं आहे तुमचं."

" आज सर्व तूझ्या मनासारख होईल. तुला हवं तिथे फिरायला जाऊ. तुला हवं ते खाऊ. तू फक्त सांग .रेल्वेच्या दगदगीत आपण कुठे चढउतर करत बसायचं. म्हणून तुला इथे बस स्टँडला आणलं. बोल तुला कुठे जायचं.?"

"तुम्ही ठरवलेले सर्व नियोजबद्ध असते. इथून पुढचेही नक्कीच ठरवून झाले असेल. मग आता सगळं तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या."

"अस कसं.? तू सांग ना. तुला हवं तिथे घेवून जाईल मी."

"तुमचं जे ठरलं आहे सगळं तसच होऊ द्या. त्याप्रमाणेच करा सगळं."

"बरं बाई. तुला समुद्र खूप आवडतो ना. म्हणून चौपाटीवर तुला घेवून जाणार आहे. चल ती समोर बस दिसतेय. बसने जाऊया. फारशी गर्दी नाहीये."

समोर चौपाटीची बस लागलेली पाहून दोघं लगबगीने बस मध्ये चढले. वृद्धांसाठी असलेल्या सीट वर जाऊन बसले. ते तिच्या बाजूला बसले होते.

आज काहीतरी परत नव्याने उमगल्यासारखे तिला झाले. क्षितीजराव चक्क तिच्या शेजारी बसले होते. तिला आठवलं की पूर्वी ते कुठेही प्रवासाला गेले तर क्षितिजराव तिला सीटवर बसवून नंतर स्वतः पुढे चालकाशेजारी जाऊन बसायचे. तारुण्यात त्यांना वाहनांचा खूप शौक होता. त्या कुतूहलापोटी ते पूर्ण रस्ताभर चालकासोबत मनसोक्त गप्पा मारत बसायचे. आपल्या सोबत प्रणिका पण आहे हे ते त्या नादात विसरून जातं.

प्रणिकाला प्रवास खुप आवडत असे. घरापासून त्याच त्या पसाऱ्यांमधून स्वतःला बाहेर काढत मनावरचं ओझं प्रवासात थोड तरी हलकं होत असे. कौटुंबिक वातावरणातून स्वतःला मुक्त करत मनातील वैचारिक पक्षाला स्वच्छंद विहार करू द्यायचं माध्यम म्हणजे प्रवास असे तिला वाटायचे. म्हणून कदाचित ती त्यांच्या सोबत प्रवासासाठी तयार व्हायची.

तिला खूप वेळा वाटायचं की हातात हात घालून प्रेमी युगुलांसारख गुजगोष्टी करत प्रवास करायचा. किंवा घरापासून लांब असतांना फक्त दोघांनीच खास असा वेळ प्रवासात घालवायचा. पण क्षितीजरावांना असल काही वाटायचं नाही. हे ही प्रणिकाने त्यावेळी मनोमन स्विकारले होते. कारण तिच्या लेखी ही बाब कितीही महत्त्वाची असली तरी क्षितीजरावांच्या लेखी नगण्य होती. नंतर तर तरंग जन्माला आल्यापासून तिचा पूर्ण प्रवास तरंगला सांभाळण्यात, त्याच्यावर लक्ष ठेवण्यात निघून जात असे.

"खूप दिवसानंतर दोघंच प्रवास करतोय ना." क्षितीजरावांनी तिच्याकडे बघून समाधानी होत विचारले. आता कुठे त्यांना खर वाटत होत की ते दोघेच कुठेतरी एकट्याने प्रवास करताय.

"हो." स्वतःच्याच तंद्रीतून बाहेर येत ती निर्विकार चेहऱ्याने बोलली.

"तू खुश आहेस ना" तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव न ओळखून ते स्वतःच्या धुंदीत विचारत होते.

" माहीत नाही." ती निरुत्साह दाखवत बोलली.

"म्हणजे? अग आपण खूप वर्षांनी असे जवळ बसून सोबत प्रवास करतोय."

"माझ्यासोबत तुम्ही प्रवासात असूनही नसल्यासारखी मला सवय पडली आहे. असेही तुम्ही सोबत असलात किंवा नसलात तरी मला चालत. तुम्ही आताही पुढे चालकाशेजारी जाऊन त्याच्यासोबत गप्पागोष्टी करण्यात वेळ घालवू शकतात. माझं अजूनही काही म्हणणं नाहीये. उलटून तुमचे आता आभार कसे मानावेत तेच कळत नाहीये. तुमच्यामुळे मला प्रवासात स्वतःशी हितगुज करण्यासाठी खूप एकांत मिळत गेला."

तीच उत्तर ऐकताच ते चरकले. त्यांना आठवले की ते खरंच प्रवासादरम्यान तिच्या जवळ बसत नसे. तरंग झाल्यानंतर तर मग त्यांना दोघांना अडचण होऊ नये म्हणून तरंगला तिच्याजवळ बसवून ते इतरत्र कुठेही बसून जायचे. पण तीच्या जवळ अस अगदी खेटून बसल्याच त्यांना फारस आठवत नव्हतं.

"मी ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवेलं. यापुढे मी अस कधीच करणार नाही." त्यांनी मनापासून निश्चय करून सांगितले.

"आपण आता असा कितीकसा प्रवास करणार आहोत. शिवाय आता त्याचा फायदा तरी काय.? आयुष्याच्या प्रवासात मनासारखा जोडीदार लाभला की आयुष्य अधिक सुखकर होऊन जातं. फक्त तो प्रवास जोडीदाराने कायम आठवणीत राहील असा पूर्ण केला पाहिजे. पण इथे मात्र एकच प्रवास दोघांना विभक्त राहून पूर्ण करायचा होता. फारशी ओळख न दाखवता आपापला प्रवास एकट्याने पूर्ण करायचा होता. थोडक्यात काय तर दोघांना वेगवेगळ्या स्थानी बसून एकाच जागी पोहचायचे होते. मग तो तर सहप्रवासी झाला. त्याला साथीदार तरी कसे म्हणणार.?"

तिच्या प्रश्नाने क्षितिजराव निरुत्तर झाले. तिची अगदी छोटीसी इच्छा होती. जी तिने कधी बोलून दाखवली नाही आणि आपण ही असला विचार कधी केला नाही. तिने बोलून जरी दाखवलं असतं तरी ते आपण मनावर घेतलं असतं की नाही काय माहित.

बसचा खूप खडखड आवाज चालू होता. त्यात दोघांच्या मनात खळबळ माजली होती.

अशा किती गोष्टी असतात ज्या वाटायला नगण्य वाटू शकतात पण त्यात भावना दडलेली असते. म्हणून आपल्या जोडीदाराच्या मनाला समजून घेता आलं पाहिजे.

भेटूया पुढच्या भागात. तो पर्यंत वाचत रहा.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract