एक रम्य संध्याकाळ - भाग 5
एक रम्य संध्याकाळ - भाग 5
पुन्हा एकदा चिंतातुर मनाने तरंग त्याच्या बाबांना बोलला.
"बरं बाबा. मी अजूनही विचारतोय. तुमच्या सोबत येवू का.?"
" तुझी काळजी कळतेय मला. पण नको रे. जाऊ आम्ही."
"बरं. तो बाजूच्या कोपऱ्यावरचा रिक्षावाला आहे ना, तो माझ्या ओळखीचा आहे. त्याला सांगू का.? तो तुम्हाला हवं तिथे सोडायला येईल." तरंगने पर्याय सुचवला.
क्षितिजरावांनी थोडासा विचार करत मान हलवत सहमती दर्शवली.
" बरं अस कर. बोलावं त्या रिक्षावाल्याला. आईसाठी ते योग्य राहील. उगाच माझ्या मागे मागे फिरून तिची दमछाक नको व्हायला. सवय नाहीये ना रे तिला. आधीच ती कधीच घर सोडत नाही. आता कशीतरी तयार झाली आहे. जराही हाल झाले तर पुन्हा माझ्यासोबत बाहेर येणार नाही."
आता तरंग थोडा बिनधास्त झाला.
"थांबा मी जाऊन बघून येतो त्याला. आलोच मी." अस बोलून तरंग घराबाहेर पडला.
तेव्हढ्यात प्रणिकाला घेवून रायशा बाहेर हॉलमध्ये आली. आता प्रणिका आधी पेक्षा खुप जास्त सुंदर दिसत होती.
क्षितिजरावांनी तिला नखशिखांत न्याहाळले.
तिचे मोकळ्या केसांचा संपूर्ण भार आता फक्त एका क्लिपमधे अडकवला गेला होता. फॅनच्या हवेत काही सुटलेले कपाळावरचे केस सैरभैर होऊन नाचत होते. ओठांवर हलकीशी लिपस्टिक होती. कपाळावर आधीच्या गोल मोठया टिकलीची जागा नाजूकशा पण डिझाइन असलेल्या टिकलीने घेतली होती. बारीकसे हलके कानातले डोलत होते. हातात हिरव्या बांगड्या ऐवजी जाडसर कंगण होते.
ते प्रणीका मधले बदल टिपत होते. हे अगदी छोटेसे बदल पण आपल्या व्यक्तिमत्त्वावर किती मोठा प्रभाव पाडू शकतात. त्याचा अनुभव नुकताच क्षितिजरावांनी अनुभवला.
प्रणीकाच्या ते लक्षात आले. बाजूला रायशा उभी होती. प्रणिकाने लाजून खाली मान घातली. क्षितिजराव तसेच उभे होते.
"निघायचं का.?" तिने त्यांना भानावर आणत विचारले.
" हो चल पटकन. आधीच उशीर झालाय. अजून थोड लवकर आवरुन निघायला हवं होत." आता ते घाई करायला लागले.
"मी खरंच चांगली दिसतेय ना." प्रणीकाने पुन्हा एकदा सुनेला विचारले.
" हो आई. तुम्हाला नजर लागू नये म्हणुन काळा टीका पण लावला ना मी." रायशा हसून म्हणाली.
तितक्यात तरंग आला.
"बाबा बाहेर रिक्षा उभी आहे. मी सोबतच घेवून आलो."
" बरं केलं." अस बोलून क्षितिजराव चप्पल घालण्यासाठी दाराकडे सरसावले.
" आजी मी पण येवू का तुमच्या सोबत?. मला पण यायचं आहे."
इतका वेळ टीव्ही बघत असलेली लहानग्या शार्वीला आजी आजोबा बाहेर जात असल्याची चाहूल लागली. तीही त्यांच्या मागे लागली.
" अग बाळा. तिथे लहान मुलांना आणायचे नाही असे सांगितले आहे. नाहीतर तुला घरी टाकून गेलो असतो का आम्ही." क्षितिजरावांनी तिला बळेबळेच समजावले.
" हो पिल्लू. असेही संध्याकाळी तुझे पप्पा तुला त्या जवळच्या उद्यानात खेळायला घेवून जाणार आहेत आणि खाऊ पण घेवून देणार आहेत." रायशाने तिची समजूत काढली.
हे ऐकताच तिचे डोळे लकाकले व तिने अत्यानंदाने तिच्या पप्पांकडे धाव घेतली.
" हो. माझं बाळ खूप समझदार आहे. नाही म्हटले की नाही होऊन जातं. हो ना. जा पळ आता. नाहीतर तुझ ते चालू असलेलं कार्टून संपून जाईल."
हे ऐकताच ती पळाली. लहान मुलांचं बर असतं. जरास आमिष दाखवल की लगेच त्यांचं मन वळून जातो. भलेही आपण त्यांच्या इच्छा पूर्ण करो अथवा न करो पण त्यांना मोहात पाडणं फार सोपं असतं. नंतर नंतर तर ते आपण दाखवलेलं आमिष खेळण्याच्या नादात विसरून पण जातात. त्यांच्या मनात काहीच राहत नसतं .म्हणून तर म्हणतात की लहान मुलं निर्मोही, निरागस आणि कोवळ्या मनाची असतात.
आपण माञ मोहात पडलो की एकाच जागी अडकून राहतो. शिवाय जी गोष्ट आपल्याला मिळत नाही तिचाच हव्यास अधिक निर्माण होत असतो.
क्षितिजराव घरातून निघाले. प्रणिका, तरंग आणि रायशा त्यांच्या पाठोपाठ बाहेर आले.
"बरं आई बाबा, तुम्ही दोघं खूप दिवसांनी असे एकत्र बाहेर पडताय. त्यामूळे खूप एन्जॉय करा. फक्त तुम्हाला उशीर झाला किंवा काही अडचण आली तर मला फोन करा." तरंगने पुन्हा बजावले.
"आमची काळजी करू नका. मी वेळोवेळी आमचं सर्व नियोजन कळवत राहील."
क्षितिजरावांनी त्या दोघांना बोलता बोलताच इशाऱ्याने प्रणिकाला रिक्षात बस म्हणुन खुणावले.
" शार्विकडे लक्ष द्या रे." प्रणिका रिक्षात बसत म्हणाली.
पंजाबी ड्रेस मध्ये तिला एकदम मोकळं वाटत होत. एरवी साडी नेसून बाहेर जातांना साडी खूप सांभाळावी लागते. कुठे अडकली किंवा चुकून निऱ्या इकडे तिकडे झाल्या तर सगळा अवतारच एकंदरीत विस्कटलेला दिसतो. कितीही वर्षांची सवय असू दे .साडी सांभाळावी लागतेच. पाठपोट उघडे दिसू नये म्हणून सारखे सारखे दोन्ही हातांनी साडी सावरत बसावे लागते .पण अंगभर झाकलेल्या ड्रेसमध्ये कसेही बसा, काही वाटत नाही. जास्त खबरदारी घ्यावी लागत नाही. हे प्रणिकाच्या आता लक्षात येवू लागले होते. ती आता रिक्षात आरामशीर रेलून बसली.
क्षितिजरावही प्रणिका शेजारी येवून बसले.
"रिक्षा कुठे घेवू आजोबा." रिक्षावाल्याने रिक्षा चालू करत विचारले.
"बस स्टँडला घे रे मित्रा." क्षितिजरावांनी रिक्षावाल्याला सांगितले.
त्याने रिक्षा चालू केली. क्षितिजराव आणि प्रणिकाने मुलगा आणि सुनेला हात हलवून निरोप दिला. तोवर रिक्षाने वेग धरला होता.
" बस स्टँडला का चाललोय आपण.? नक्की कुठे घेवुन जाताय.?"
प्रणिकाला परत प्रश्न पडला.
"कळेल तुला.धीर धर"
इतकं ऐकल्यानंतर ती गुपचूप बाहेर गंमत बघत बसली.
हे नक्की कुठे घेवून जाताय .काहीच कळत नाहीये. सांगत पण नाहीये. मनात संशय दाटून आलाय. पण ह्यांना विचारायची सोय नाही. ह्यांचं आधीपासून असच आहे. कधी ही मनाचा थांगपत्ता लागू देत नाही. आता पोहचल्यावरच कळेल की कुठे चाललोय. जे होईल ते. जाऊ दे. ते नेतील तिथे त्यांच्या मागे चुपचाप जायचं. असे ही ते काही सांगणार नाहीत. म्हणुन आपणही आता जास्त खोलात शिरायच नाही.
तिने मनातल्या मनात सर्व धुरा त्यांच्यावर सोपवून टाकली.
कित्येक दिवसांनी ती असा मोकळा श्वास घेत होती. बाहेर पडल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटते हे तिला आता उमगत होते.
